_202501181710510499_H@@IGHT_350_W@@IDTH_696.jpg)
मुंबई : सैफ अली खानला अतिदक्षता विभागातून सामान्य विभागात हलवण्यात आल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे. त्याच्या प्रकृतीचा अंदाज घेऊन लवकरच त्याला रुग्णालयातून घरी पाठविण्यात येणार असल्याचेही सांगण्यात येत आहे. अभिनेता सैफ अली खानवर गुरुवार दि. १६ जानेवारी रोजी जीवघेणा हल्ला झाला. रक्तबंबाळ अवस्थेतच एका रिक्षाने त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्याच्यावर लीलावती रुग्णायलात उपचार सुरू आहेत. हल्लेखोराने सैफवर सहा वार केले. त्यापैकी दोन वार अधिक गंभीर होते, त्यामुळे सैफवर शस्त्रक्रिया करावी लागली होती.
सैफ अली खानच्या प्रकृतीबद्दल निवेदन लीलावती रुग्णालय प्रशासनाने जारी केले आहे. दरम्यान, सैफवर शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर नितीन डांगे म्हणाले, “सैफवरील दोन्ही शस्त्रक्रिया यशस्वी झाल्या आहेत. त्याची प्रकृती आता बरी आहे. दुखीही कमी झाली आहे.
आम्ही त्याला सध्या विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे. त्याला कुणीही भेटू नये, अशी सक्त ताकिद देण्यात आली आहे. जखमा ताज्या असल्याने संसर्गाचा धोका आहे. पुढील आठवडाभर त्याला जास्तीत जास्त विश्रांती घेण्यास सांगितले आहे. आठवडाभर कमी हालचाल करण्याचा सल्लाही देण्यात आला आहे. सैफच्या मणक्यालाही दुखापत झाली होती. आम्ही त्यावर शस्त्रक्रिया केली असून त्याची प्रकृती आता उत्तम आहे”. हल्ल्यात, सैफच्या कण्यामध्ये चाकू घुसला आणि तो तुटला, तुटलेल्या चाकूचे टोक शस्त्रक्रियात काढण्यात आले आहे. सैफच्या मानेलाही गंभीर जखम झाली असून, सध्या सैफवर उपचार सुरू आहेत.
कधी मिळणार रजा?
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, सैफला लवकरच रुग्णालयातून घरी पाठविण्यात येईल. पण सैफ काही दिवस चालू फिरू शकणार नाही. सैफच्या जखमा अद्याप बऱ्या झालेल्या नाहीत, त्यामुळे अभिनेत्याला त्याच्या कुटुंबातील सदस्यांव्यतिरिक्त इतर लोकांना भेटण्यास मनाई करण्यात आली आहे, असेही त्यांनी सांगितले.
सैफ एखाद्या जखमी सिंहासारखा आला!
डॉक्टरांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सैफ रुग्णालयात दाखल झाला तेव्हाची माहिती दिली. रिक्षातून उतरल्यानंतर सैफ जखमी अवस्थेत रुग्णालयात आला. “मी सैफ अली खान आहे. लवकर उपचार सुरू करा!”, असे तो ओरडत आत आला, असे त्यांनी सांगितले.