‘सिडको’ कर्मचार्‍यांच्या मागण्यांसाठी आमदार मंदा म्हात्रे यांचा पुढाकार

17 Jan 2025 14:09:55
CIDCO and Manda Mhatre

नवी मुंबई : ‘मुंबई लेबर युनियन’ (संलग्न : हिंदू मजदूर सभा)तर्फे ‘सिडको’ महामंडळातील ३०० कर्मचार्‍यांनी विविध मागण्यांकरिता ‘सिडको’ ( CIDCO ) भवनसमोर पुकारलेल्या धरणे आंदोलनाला आमदार मंदा म्हात्रे यांनी गुरुवार, दि. १६ जानेवारी रोजी उपस्थिती दर्शवली. कर्मचार्‍यांच्या मागण्या ऐकून घेतल्या व सहव्यवस्थापकीय संचालक राहुल कर्डीले यांच्या दालनात तातडीची बैठक घेतली. या कर्मचार्‍यांचा मागण्या लवकर पूर्ण करण्यात याव्यात, असे आदेश आमदार म्हात्रे यांनी सहव्यवस्थापकीय संचालक कर्डीले व उपस्थित संबंधित अधिकार्‍यांना दिले.

यावेळी कर्डीले यांनी या मागण्यांवर सकारात्मकता दाखवत या मागण्या लवकरच पूर्ण केल्या जाणार असल्याचे सांगितले. यावेळी उपाध्यक्ष अ‍ॅड. सुरेश ठाकूर, साहाय्यक चिटणीस सुजित पाटील, शिस्त मंडळ, प्रमदा भिडवे, कार्मिक अधिकारी प्राजक्ता कुलकर्णी उपस्थित होते.

‘सिडको’ ही एक भारतीय शहर नियोजन संस्था आहे. ‘सिडको’ने नवी मुंबई शहराचे नियोजन आणि निर्मिती केली आहे. यानिर्मिती मागे कर्मचार्‍यांच्या मोठा सहभाग आहे. गेल्या १५ वर्षांपासून ‘सिडको’ आस्थापनामध्ये स्थानिक प्रकल्पग्रस्त कर्मचारी अविरत सेवा बजावित आहेत. बहुतांश कर्मचार्‍यांचे इतर ठिकाणी नोकरी करण्याचे वय निघून गेले आहे. तरी हे कर्मचारी ‘सिडको’ आस्थापनांमध्ये आपली सेवा बजावत आहेत. याच अनुषंगाने विविध मागण्यांसाठी कर्मचार्‍यांनी हे आंदोलन केले.

Powered By Sangraha 9.0