संघ हा राजकीय पक्ष नाही, मग संविधान कसं बदलणार?

17 Jan 2025 18:40:50

Ramesh Patange RSS

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (RSS Samvidhan) 
"राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा काही राजकीय पक्ष नव्हे, संविधान दुरुस्ती करायची असेल तर ते काम राजकीय पक्षाचे आहे. पूर्णपणे संविधान बदलून टाकता येत नाही. मग संघ कसा काय संविधान बदलणार? असा आरोप करणे म्हणजे सर्वात मोठा विनोद आहे.", असे प्रतिपादन ‘हिंदुस्तान प्रकाशन संस्थे’चे अध्यक्ष पद्मश्री रमेश पतंगे यांनी केले. छत्रपती संभाजीनगर गुरुवार, दि. १७ जानेवारी रोजी समर्पण कार्यालयात 'आम्ही संघात का आहोत...' हे रमेश पतंगे लिखित पुस्तक प्रकाशित करण्यात आले. त्यावेळी झालेल्या एका मुलाखतीमध्ये बोलत होते.

हे वाचलंत का? : महाकुंभादरम्यान किन्नर आखाड्याची 'अघोर काली साधना'

दरम्यान 'धर्म भगवान महाविराचा' हे पुस्तकही प्रकाशित करण्यात आले. यावेळी प्रांत संघचालक अनिल भालेराव, पश्चिम क्षेत्र कार्यकारिणी सदस्य हरीश कुलकर्णी व देवगिरी प्रांत कार्यकारिणी सदस्य डॉ. दिवाकर कुलकर्णी उपस्थित होते. हरीश कुलकर्णी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर डॉ. दिवाकर कुलकर्णी यांनी रमेश पतंगे यांची मुलाखत घेतली.

रमेश पतंगे पुढे म्हणाले की, "संघ समजून घ्यायचा असेल तर केवळ पुस्तक वाचून कळणार नाही. त्यासाठी संघात यावे लागेल. संघाविषयी अनेक अपप्रचार पसरवण्यात येतात. श्रीगुरुजी यांच्या साहित्यातील सोयीचे व अर्धवट संदर्भ घेऊन संघविषयी संभ्रम निर्माण केला जातो. या आरोपांमध्ये काही तथ्य नसते. संघ संविधान बदलणार हा तसाच आरोप. परंतु यासारखा दुसरा विनोद आणि गाढवपणा नाही. आरोप करणारे आपली वैचारिक पातळी यातून दाखवत असतात. संविधानात दुरुस्ती करता येते पण संविधान बदलणे अशक्य आहे. यावर न्यायालयात अनेक दीर्घ चर्चा झाल्या आहेत. संविधानाच्या मूलभूत संरचनेला कोणीही धक्का लावू शकत नाही. त्यामुळे या आरोपात काही तथ्य नाही."

Powered By Sangraha 9.0