नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारतातील संरक्षण क्षेत्र आत्मनिर्भर भारताच्या दिशेने घोडदौड करत आहे. याच पार्श्वभूमीवर भारताने स्वदेशी बनावटीचं क्षेपणास्त्र नाग मार्क-२ ची चाचणी यशस्वी करून दाखवली. सुरक्षा मंत्रालयाने माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार राजस्थानच्या पोखरण येथे, लष्करातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही चाचणी पार पडली.
नाग मार्क-२ हे एक थर्ड जनरेशन एँटी टँक, फायर अँड फरगेट क्षेपणास्त्र असून एकूण ३ फील्ड ट्रायल्स घेण्यात आल्या होत्या. या ट्रायल्समध्ये क्षेपणास्त्राने यशस्वीरित्या आपले लक्ष्य साध्य केले. या चाचणीमध्ये नाग मिसाईल कॅरीअर व्हर्जन २चा सुद्धा समावेश केला होता. सुरक्षा मंत्रालयाने माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार नाग मार्क-२ ची सबंध शस्त्र प्रणाली आता भारतीय सैन्यामध्ये समाविष्ट करण्यासाठी तयार आहे. सदर चाचणी यशस्वी झाल्यावर भारताचे सुरक्षामंत्री राजनाथ सिंह यांनी संरक्षण संशोधन आणि विकास संघटना म्हणजेच डीआरडीओचे अभिनंदन केले.