नवी दिल्ली : अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प ( Donald Trump ) यांच्या शपथविधीला भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर सोमवार, दि. २० जानेवारी रोजी अमेरिकेच्या दौर्यावर जाणार आहेत. शपथविधी आयोजन समितीने यासाठी भारताला निमंत्रण पाठवले आहे.
जयशंकर ट्रम्प प्रशासनात सामील झालेल्या मंत्र्यांची आणि इतर देशांतील नेत्यांचीही भेट घेतील. डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे ४७वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेणार आहेत. कमला हॅरिस यांचा पराभव करून त्यांनी अध्यक्षपदाची निवडणूक जिंकली आहे. या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांना ३१२ इलेक्टोरल मते मिळाली, तर कमला हॅरिस यांना केवळ २२६ मते मिळाली. निवडणूक जिंकण्यासाठी उमेदवाराला २७० इलेक्टोरल मतांची आवश्यकता असते.
अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डीसी येथे सोमवार, दि. २० जानेवारी रोजी दुपारी १२ वाजता ट्रम्प यांचा शपथविधी होणार आहे. या दरम्यान अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश जॉन रॉबर्ट्स त्यांना पदाची शपथ देतील. २१व्या शतकात पहिल्यांदाच एखादा अमेरिकन राष्ट्राध्यक्ष सुटीच्या दिवशी पदाची शपथ घेणार आहे. ट्रम्प यांच्याशिवाय जे. डी. वन्स उपराष्ट्रपतिपदाची शपथ घेणार आहेत.