रस्ते अपघातामधील अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना मिळणार २५ हजार रुपये!

13 Jan 2025 14:29:41

nitin gadkari
 
नागपूर : (Nitin Gadkari) रस्ते अपघातामधील अपघातग्रस्तांना तातडीने रुग्णालयात नेणाऱ्या नागरिकांना केंद्र सरकारकडून ५ हजार रुपये बक्षीस स्वरुपात मिळायचे. परंतु आता बक्षिसाची रक्कम वाढवून २५ हजार रुपये करणार येणार असल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. रस्ता सुरक्षेच्या मुद्द्यावर अभिनेते अनुपम खेर यांच्या मुलाखतीदरम्यान नितीन गडकरी म्हणाले की, त्यांनी रस्ते वाहतूक मंत्रालयाला पुरस्काराची रक्कम वाढवण्याचे निर्देश दिले आहेत.
 
अपघातग्रस्तांना 'गोल्डन अवर' मध्ये मदत करणे अत्यावश्यक
 
याविषयी बोलताना नितीन गडकरी म्हणाले की, "रस्ता अपघातग्रस्तांना रुग्णालयात किंवा ट्रॉमा सेंटरमध्ये नेणाऱ्या व्यक्तीसाठी सध्याची बक्षीस रक्कम खूपच कमी आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, रस्ता अपघातानंतर १ तासाच्या आत, ज्याला 'गोल्डन अवर' म्हटले जाते, जर पीडित व्यक्तीला रुग्णालयात नेले गेले, तर त्याच्या जगण्याची शक्यता लक्षणीय वाढते. केंद्र सरकारने ऑक्टोबर २०२१ पासून बक्षिसाची तरतूद सुरू केली होती, जेणेकरून लोकांना रस्ता अपघातग्रस्तांना मदत करण्यासाठी आणि त्यांना रुग्णालयात नेण्यासाठी प्रोत्साहित केले जाईल." तसेच त्यांनी पुढे बोलताना, भारतात १० हजार विद्यार्थी हे सदोष ट्रॅफिक व्यवस्थेमुळे तर ३० हजार विना हेल्मेटमुळे दगावतात. नागपूरचे पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार आणि रोडमार्क संस्थेने ४८ ब्लॅक स्पॉट दुरुस्त केल्यानंतर अपघातांची संख्या ४८ टक्क्यांनी कमी झाल्याचेही सांगितले.
 
घरी कुणीतरी वाट बघतंय याचे भान ठेवा
 
गडकरी म्हणाले, कोरोना, युद्धामध्ये किंवा एखाद्या दंग्यामध्ये जेवढ्या लोकांचा मृत्यू झाला नसेल तेवढे मृत्यू दरवर्षी रस्ते अपघातांमध्ये होतात याची खंत वाटते. देशात आणखी उत्तम रस्ते तयार होतील. पण लोकांना शिस्त नसेल तर याचा काहीही उपयोग नाही. सिग्नल तोडणे, वेग मर्यादा ओलांडणे, हेल्मेट नसणे अशा कितीतरी चुका लोक करतात. घरी आई, पत्नी, मुले वाट बघत असतील, हे ध्यानात ठेवून गाडी चालवावी. रस्ते सुरक्षा क्षेत्रात काम करणारे राजू मानकर आणि चंद्रशेखर मोहिते यांचेही त्यांनी विशेष कौतुक केले.
 
 
Powered By Sangraha 9.0