नाशिक-मुंबई महामार्गावर भीषण अपघात! ८ जणांचा मृत्यू

13 Jan 2025 14:22:35
 
nashik accident
 
नाशिक : (Nashik Accident) मुंबई-नाशिक महामार्गावर असणाऱ्या द्वारका उड्डाणपुलावर रविवार, दि. १२ जानेवारी रोजी सायंकाळी आयशर ट्रक आणि टेम्पोचा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात जागीच पाच जण ठार झाले असून, रुग्णालयात उपचारादरम्यान इतर तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
 
नेमकं काय घडलं?
 
नाशिक शहरातील सिडको येथील २० ते २५ रहिवाशी निफाड तालुक्यातील नैताळे या ठिकाणी एका धार्मिक कार्यक्रमासाठी गेले होते. धार्मिक कार्यक्रम आटोपून घरी परत असताना त्यांच्या गाडीला भीषण अपघात घडला. धुळ्याहून लोखंडी गजानी भरलेला आयशर ट्रक चालला होता. आयशर ट्रकचा वेग कमी करताना ट्रकचालकाने ब्रेक मारल्याने मागून भरधाव वेगात आलेला टेम्पो ओव्हरटेकच्या नादात ट्रकवर जाऊन आदळल्याची माहिती घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी दिली. ही धडक इतकी भीषण होती की घटनास्थळीच पाच जणांचा मृत्यू झाला. जखमींवर नाशिक जिल्हा रुग्णालय आणि नाशिक शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
 
मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर
 
नाशिक-मुंबई महामार्गावर झालेल्या अपघातात मृत्यू झालेल्या कुटुंबीयांप्रती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोक व्यक्त केला असून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. या अपघातातील मृतांच्या वारसांना ५ लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्यात येईल आणि जखमींचा खर्च शासनातर्फे करण्यात येईल, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.
 
Powered By Sangraha 9.0