जिहाद आणि क्रुसेड : आपला धर्म कोणता?

12 Jan 2025 11:52:03
Jihad And Crusade

पोप फ्रान्सिस यांनी व्हॅटिकनच्या ‘कॅनन’ कायद्यानुसार बिशप रॉड्रिग्स यांना मुंबई सरधर्मप्रांताचे विद्यमान आर्चबिशप ओस्वाल्ड ग्रेशियस यांचे वारस नेमले आहे. अर्थात कुणाला काय नेमावे हा चर्चचा अंतर्गत मुद्दा आहे. मात्र, ओस्वाल्ड ग्रेशियस किंवा बिशप रॉड्रिग्स यांच्या संदर्भात नुकतीच एक घटना घडली. या घटनेमुळे चर्चसंस्थेवर पुन्हा प्रश्न उपस्थित झाले आहेत. त्या घटनेचा आणि चर्चसंबंधित इतर वास्तवाचा मागोवा या लेखात घेत आहोत.

र्डिनल ओस्वाल्ड ग्रेशियस, बिशप जॉन रॉड्रिक्स आणि बिशप डोमिनिक सैवियो फर्नांडिस यांच्यावर सहआरोपी म्हणून, मुंबईमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. दि. २७ नोव्हेंबर २०१५ रोजी रात्री ५२ वर्षांच्या फादर लॉरेंस याने, एका अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार केला. त्याचे पालक श्रद्धावान ख्रिश्चन होते. गुन्हेगार फादर लॉरेंसला शिक्षा व्हावी म्हणून, त्यांनी चर्चसंस्थेकडे न्याय मागितला. तसेच, दि. २८ नोव्हेंबर रोजी, साल्वेशन सेंटरचे बिशप डोमिनिक सैवियो फर्नांडिस यांना भेटण्याचा प्रयत्न केला. तीनवेळा प्रयत्न करूनही ते भेटलेच नाहीत. त्यानंतर दि. २९ नोव्हेंबर रोजी पीडित मुलाच्या पित्याने, बिशप हाऊसशी संपर्क करण्याचा निर्णय घेतला. ते कार्डिनल ओस्वाल्ड ग्रेशियस यांना भेटण्यास गेले. पीडित मुलाच्या आईने कार्डिनल गे्रशियस यांना , सगळी दुर्देवी संतापजनक घटना सांगितली. तसेच, बिशप डोमिनिक सैवियो फर्नांडिस यांनी सहकार्य केले नाही, हेसुद्धा सांगितले. यावर ग्रेशियस म्हणाले की, “पादरी लॉरेंसला ते पोलिसांकडे सोपवतील.” मात्र, त्यानंतरही गुन्हेगाराला शिक्षा मिळण्याची काही चिन्ह दिसली नाहीत.

त्यामुळे मग पीडित मुलाच्या पालकांनी, दि. १ डिसेंबर रोजी गुन्हेगार फादर लॉरेंस विरोधात तक्रार नोंदवली. ‘पॉक्सो’ अंतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल झाला. त्यानंतर दि. ३ डिसेंबर रोजी या पालकांना फादर इमैनुएल आणि बिशप रॉड्रिग्स यांचा फोन आला. त्यांनी पालकांना बिशप हाऊसमध्ये येण्यास सांगितले. पालक तिथे गेल्यावर त्यांना बिशप जॉन रॉड्रिग्स, फादर केटी इमैनुएल आणि तीन अन्य पादरी दिसले. या सगळ्यांनी पालकांची तक्रार ऐकली. त्यानंतर त्यांनी पालकांना काही कागदपत्रांवर सही करायला लावली. ती कागदपत्रे आम्हालाही द्या, अशी पालकांनी मागणी केली. मात्र, बिशप आणि फादर यांनी ती कागदपत्रे पालकांना दिली नाहीत. चर्चसंस्थेच्या विरोधात आपण गेलो, या भितीने ते पालक घाबरले. पुढे मुलावर अत्याचार झाल्यानंतरही चर्चसंस्थेच्या संबधित उच्चपदस्थ व्यक्तींनी, गुन्हेगारासंदर्भात पोलिसांमध्ये तक्रार नोंदवली नाही म्हणून, कार्डिनल ओस्वाल्ड ग्रेशियस, बिशप जॉन रॉड्रिक्स आणि बिशप डोमिनिक सैवियो फर्नांडिस यांंना सहआरोपी ठरवण्यात आले. अर्थात थेट गुन्हेगार ठरवलेले नाही. इथे प्रश्न आहे की निरागस, श्रद्धाळू बालकावर लैंगिक अत्याचार झाला. त्या अत्याचाराविरोधात थेट कारवाई करण्याऐवजी, चर्चचे बिशप आणि कार्डिनल या घटनेकडे गांभीर्याने का पाहत नव्हते? येसूच्या मर्सीचे डोस पार गल्लीबोळात देताना, यांची दया, माया, करूणा ओसंडून वाहते, असे दृश्य असते. मग या बालकाच्या वेदनांबाबत त्यांची संवेदना कुठे गेली होती? त्यांच्या चर्चसंस्थेअंतर्गत तरी ते गुन्हेगाराविरोधात कारवाई करू शकत होते. तसे न करता, दि. २७ नोव्हेंबर ते दि. १ डिसेंबर रोजीपर्यंत या सगळ्यांनी पीडित बालकाच्या पालकांना कोणतेही सहकार्य केले नाही असेच दिसते. या घटनेमध्ये ज्यांचे नाव आले आहे ते कार्डिनल ओस्वाल्ड ग्रेशियस हे देशातील सहा कार्डिनलपैकी एक आहेत आणि रोमचे पोप फ्रान्सिस यांचे विश्वासू सल्लागारही आहेत. ओस्वाल्ड ग्रेशियस यांच्या नावावरून ती आणखीन एक घटना आठवली.

दि. ५ मार्च २०१२ रोजी मुंबईच्या चर्च ऑफ आवर लेडी ऑफ वेंलकनीमधल्या येशूच्या मूर्तीतून पाणी येत होते. गरीब, लाचार, दु:खी लोकांना सुख मिळावे, म्हणून येशू रडत होता असे मानून, हा चमत्कार पाहण्यासाठी आणि मूर्तीतून ठिबकत असलेले येशूचे अश्रू प्रसाद म्हणून प्राशन करण्यासाठी, येशूच्या भक्तांनी त्या चर्चमध्ये एकच गर्दी केली. यात हिंदू ही आघाडीवर होते. खरे खोटे पाहण्यासाठी ‘रॅॅशनालिस्ट इंटरनॅशनल’चे आणि ‘इंडियन रॅशनलिस्ट असोसिएशन’चे अध्यक्ष सनल एडमारुकू हेसुद्धा या चर्चमध्ये पोहोचले. त्यांनी शोध घेतला आणि जाहीर केले की, “येशूच्या मूर्तीच्या पाठीमागे भिंत आहे. त्या भिंतीतला मल सांडपाणी वाहून नेणारा पाईप तुटला. त्या तुटक्या पाईपचे पाणी मूर्तीतून ठिबकत बाहेर येते आहे. हे घाण मलयुक्त सांडपाणी प्रसाद आणि आशीर्वाद म्हणून लोक पित आहेत.” झाले. सनल हे बोलले आणि बाहेर त्यांना जाब विचारण्यासाठी माणसे जमा झाली. इतकेच नाही, तर त्यांच्यावर त्यानंतर अनेक गुन्हे दाखल झाले. ‘भारत अजूनही सांस्कृतिक किंवा सामाजिक स्वरूपातील स्वातंत्र्यासाठी तयार नाही’ अशी संकल्पना असणार्‍या, ‘कॅथॉलिक सेक्युलर फोरम’ने सनल एडमारूकू यांच्यावर धार्मिक भावना दुखावल्याचा ठपका ठेवला आणि भारतीय संविधानातील ‘२९५ अ’ कलम अंतर्गत गुन्हा दाखल केला. त्यावेळी केंद्रात सोनिया गांधींची काँग्रेस सत्तेत होती आणि महाराष्ट्रातही त्यांचेच राज्य होते. चर्च व्यवस्थेची व्याप्ती इतकी होती की, सनल यांना देश सोडून दुसर्‍या देशात आसरा घ्यावा लागला. चर्चप्रणित अंधश्रद्धेचा बुरखा फाडल्याबद्दल आपला कधीही जीव जाऊ शकतो किंवा आपल्याला तुरूंगात डांबले जाईल अशी त्यांना भीती वाटली. पुढे सनल एडमारुकू यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितले की, “त्यांना एक फोन आला. फोन करणार्‍या व्यक्तीने सांगितले की, बॉम्बे कॅथलिक आर्चबिशप, ओस्वाल्ड कार्डिनल ग्रेशियस यांचा निरोप आहे की, “तु जो अपराध केलास. त्याबद्दल माफी माग. माफी मागितली, तर तुझ्यावरचे सगळे गुन्हे मागे घेतले जातील.” काय गुन्हा केला होता सनल यांनी? तर येशूच्या मूर्तीतून येणारे पाणी हे मल-सांडपाणीयुक्त वाहणार्‍या तुटक्या पाईपातून ठिबकते, हे सत्य त्यांनी शोधले. हा गुन्हा होता? त्यांनी त्या घटनेतून फोफावलेल्या अंधश्रद्धेचे पितळ उघडे पाडले, हा गुन्हा होता? पण, त्यांनी जे काही केले, तो गुन्हा आहे आणि त्यांनी माफी मागितली तरच त्यांच्यावरचे गुन्हे मागे घेतले जातील असा निरोप, बॉम्बे कॅथलिक आर्चबिशप, ओस्वाल्ड कार्डिनल ग्रेशियस यांचा आहे हे सांगणारा तो फोन. अर्थात सनल यांनी माफी मागितली नाहीच. पुढे २०१४ साली मुंबई पोलीस आर्थिक अपराध शाखेद्वारा, कॅथलिक सेक्युलर फोरमचा महासचिव जोसेफ डायस यांच्यावर गुन्हा दाखल झाला. वृद्धाश्रम बनवण्यासाठी दान केलेल्या २.२ कोटी रुपयांचा त्याने दुरूपयोग केला होता. अर्थात २०१४ साली हे घडू शकले. कारण, सत्तांतराची चाहुल लागली होती. भाजपची निर्विवाद सत्ता आली.

असो. चर्चची जादू काही वर्षापूर्वी छत्तीसगढच्या भीषण दुर्गम जंगलात पाहिली होती. छत्तीसगढच्या जंगलात दिवसाही अंधार होता आणि टाचणी पडावी अशी शांतता. जंगलाच्या आत वसलेले एक गाव पूर्ण ख्रिश्चन झाले. असे का? हे जाणून घेण्यासाठी आम्ही जंगलात प्रवेश केला आणि एक शुभ्र मंदिर दिसले. मंदिराच्या बाहेर काही मुले रांगोळी काढत होते. वाहनचालकाला गाडी थांबवायला सांगितली. त्याने नकारच दिला. पण, तोपर्यंत वय वर्षे १५ ते २२-२५ वर्षांच्या सृदृढ तरुणांनी गाडीला घेरले. माझी वेशभुषा, केशभुषा पाहून, ते त्यांच्या छत्तीसगढी हिंदीत म्हणाले, “केरळाहून नन मेम आल्या का?” आम्ही म्हटले, “हो.” त्या युवकांना आनंद झाला. क्षणभरात कळले की, हे नक्षली नव्हते. तर पाड्यातले कष्टकरी युवक होते. त्यांना बोलते करण्यासाठी विचारले, “खूप चांगले झाले, तुम्ही सगळे ख्रिश्चन झालात.” यावर त्या तरुणांमधला एक तरूण म्हणाला, “कसे होणार नाही? पूर्वी काम करून घरात गेलो की, हातपाय अंग दुखायचे. मच्छर चावूनही आमची लोक मरायची. पण, जंगलात गाडी घेऊन नन आणि फादर आले. आमचे फोटो (एक्सरे) काढले. त्यात स्पष्ट दिसले की, आमच्यापैकी कुणाची किडनी तर कुणाच हदय, तर कुणाचा मेंदू फाटलेला होता. त्यामुळेच आम्ही आजारी पडत होतो, आम्ही मरणार होतो. पण, नन आणि फादर म्हणाले, “घाबरू नका. आम्ही तुम्हाला येशूची कृपा असलेले मंतरलेले पाणी देतो. ते दररोज प्या, येसू भगवानची पूजा करा. पंधरा दिवसात चांगले व्हाल.” आम्ही तसे केले. आमची अंगदुखी बंद झाली. थकवा पण गेला. ते मंतरलेले पाणी म्हणजे, अंगदुखीवरचे औषध मिसळलेले पाणी हे अनुभवांती अम्हांला ज्ञात होतेच. पुढे ते म्हणाले, “१५ दिवसानंतर नन आणि फादर यांनी परत आमचे फोटो (एक्सरे) काढले. तर काय? आमचे फाटलेले मेंदू, हदय, किडनी हाड सगळे ठिक होते. आम्ही वाचलो. ही त्या येशू भगवानची कृपा, म्हणून आम्ही सगळ्यांनी येशूचा धर्म स्वीकाराला.” अशीही येशूकृपा ऐकून काय वाटले हे काय सांगायला हवे? इथे कुणीही सहज येऊ शकत नाही. मात्र ख्रिस्ती धर्मप्रसारक आणि हिंदूद्वेष्टे लोक सुखेनैव येऊ शकत होते. अर्थात आता परिस्थिती पालटली आहे.

ओडिशामध्ये तर अतिशय वेगळा अनुभव आला. अंध, डोक्यावर जन्मतच केस नसलेला, किरकोळ शरीरयष्टीचा बघता क्षणीच दया यावी असा अनाथ मुलगा. तो हिंदू होता. आईवडिलांच्या पश्चात ही त्याने शिवभक्ती कायम ठेवली होती. मात्र, गावातलाच एक पाद्री त्याला नेहमी चर्चमध्ये येण्यासाठी जबरदस्ती करत असे. तो पाद्री त्याला म्हणे, फक्त एकदा ये चर्चमध्ये, माझ्यासोबत चर्चमध्ये फोटो काढ. मुलगा नकार देत राहिला. तर त्या पाद्रीने त्याला जबरदस्तीने चर्चमध्ये नेण्याचा प्रयत्न केला. तरीही तो बधला नाही. तर पादरीने त्याला मारहाण केली. पादरी या अनाथ मुलाला चर्चमध्ये नेऊन फोटो काढण्याचा प्रयत्न करत होता. कारण, परदेशातील त्याच्या दात्यांना त्याला दाखवायचे होते की, तो ओडिशामध्ये गरीब अनाथ लोकांसाठी काम करतो. या अंध मुलासोबत फोटो काढून पाठवला, तर अनाथ आणि पाहता क्षणीच दया येणार्‍या भणंग मुलासाठी, त्याला ते लोक भरभरून दान देणार होते. हे सारेच क्रुर आणि भयंकर. हो महाराष्ट्रातही धर्मांतरासाठी खोट्या चमत्कार आणि फसवणुकीच्या ही खूप घटना पाहिल्या आहेत. या पार्श्वभूमीवर बिशप आर्चबिशप कार्डिनल आणि चर्चसंस्थेच्या सर्वशक्तिमान पोपपदी कुणीही व्यक्ती नियुक्त झाली, तर त्यात काय फरक पडणार आहे का? असे वाटते. खरे तर इस्लामसाठी जिहाद आणि ख्रिश्चनांसाठी कु्रसेड हा त्यांचा धर्म आहे. या अनुषंगाने आपला धर्म कोणता? सर्व धर्म समभाव, सहिष्णूता आहेच, मम मंत्रः समानताही आहेच, पण त्याआधी धर्म आहे-मम दीक्षा हिंदू रक्षा!

९५९४९६९६३८
Powered By Sangraha 9.0