महापुरुषांच्या जयंतीनिमित्त 'जयंती फलक' लावण्याचा शासनाचा निर्णय

10 Jan 2025 17:24:23
Mangal Prabhat Lodha

मुंबई : महाराष्ट्र शासनातर्फे मंत्रालयात, राज्यातील सर्व शासकीय कार्यालयात आणि प्रशासकीय मुख्यालयात थोर महापुरुषांची जयंती साजरी केली जाते व पुण्यतिथीनिमित्त त्यांचे स्मरण केले जाते. परंतु त्या दिवशी या महापुरुषांच्या प्रतिमेसह त्यांच्या जीवन चरित्राची माहिती देणारे फलक ठेवण्यात येत नव्हते. त्यामुळे सर्व सामान्यांना महापुरुषांच्या जीवन चरित्राबाबत योग्य माहिती मिळत नाही. ही बाब लक्षात घेऊन शासनाने थोर महापुरुषांची जयंती अथवा पुण्यतिथी असताना त्यांच्या प्रतिमेसह जीवन कार्याबाबत माहिती देणारे फलक सुद्धा लावावेत अशी विनंती कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा ( Mangal Prabhat Lodha ) यांनी राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांना पत्राद्वारे केली होती.

आज त्याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करून मंत्री लोढा यांची मागणी मान्य करण्यात आली आहे. महान विभूतींच्या जयंतीनिमित्त मंत्रालय, सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालये, शाळा व महाविद्यालये येथे त्यांच्या प्रतिमेसह जीवन चरित्राची माहिती देणारे फलक सुद्धा लावण्यात येतील. तसेच 'जयंती फलक या शीर्षकाखाली https://gad.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर सदर माहिती उपलब्ध करून दिली जाणार आहे.

Powered By Sangraha 9.0