अन्नपूर्णा ‘उमा’

08 Sep 2024 21:25:10
uma kulkarni


मुंबईस्थित उमा कुळकर्णी गेली आठ वर्षे भारतीय सैन्य आणि त्यांच्या परिवारांसाठी विविध उपक्रमांतून सैन्याप्रति आपली कृतज्ञतेची भावना प्रकट करत आहेत. उमाताईंच्या कामाचा आढावा घेणारा लेख...

दि. 15 ऑगस्ट, दि. 26 जानेवारी या दिवशी आपण विविध देशभक्तीपर उपक्रमात सहभागी होतो. आपल्या प्रत्येकालाच सीमेवर लढणार्‍या सैन्यासाठी आणि आपल्या देशासाठी काहीतरी करावे ही भावना असते. मात्र, ती कशी हे आपल्याला ठाऊक नसते. अशावेळी यासाठी उमा कुळकर्णी सारख्या समाजभान जपणार्‍या काही व्यक्ती, आपल्यासाठी दुवा ठरतात. मुंबईस्थित उमा कुळकर्णी गेली आठ वर्षे भारतीय सैन्य आणि त्यांच्या परिवारासाठी, विविध उपक्रमांतून अनेकांना सहभागी करून घेत, या देशसेवकांप्रति आपली कृतज्ञतेची भावना प्रकट करत आहे.

एम.कॉम.पर्यंत शिक्षण घेऊन उमाताई, गोवा सरकारमध्ये रिकव्हरी ऑफिसर म्हणून कार्यरत होत्या. गोवा सरकारच्या या विभागाचे कार्यालय मुंबईत असल्याने, उमाताईंना घरची जबाबदारी सांभाळत नोकरी करणे शक्य होते. मात्र, कोविडपूर्व काळात गोवा सरकारने हे कार्यालय गोव्याला हलविले. बदलीनंतरही दोन वर्षे उमाताईंनी सरकारी नोकरी केलीच, मात्र आईच्या निधनानंतर उमाताईंना कौटुंबिक जबाबदारीमुळे राजीनामा देऊन मुंबईत परतावे लागले. मुंबईत परत येत उमाताईंनी खासगी नोकरी स्वीकारली. मात्र, चार महिन्यांत कोविड महामारीमुळे उमाताईंना आपली ही नोकरीही गमवावी लागली. एकीकडे कोविडचे संकट, तर दुसरीकडे कुटुंबाची जबाबदारी होती. अशावेळी उमाताईंनी स्वतःचा केटरिंग व्यवसाय सुरु केला.

उमाताईंच्या सामाजिक भान जपण्यातून त्यांच्या ‘साईशा केटरिंग’ या नव्या व्यवसायाची मुहुर्तमेढ रोवली गेली. कोरोनाकाळात उमाताई रुग्णालयातील रुग्ण, सोसायटीमधील वयस्कर दाम्पत्य, गरजू व्यक्तींना डबे देत होत्या. सुरुवातीला काही मोजक्या डब्यांच्या ऑर्डर घेत. तत्पूर्वीच 2016 मध्ये मुंबईत अनुराधा प्रभूदेसाई यांच्या ‘लक्ष्य फाऊंडेशन’कडून आयोजित ‘एक दिया शहीदों के नाम’ या कार्यक्रमाने उमाताईंना हादरवून सोडले. आपणही सैन्यासाठी, त्यांच्या कुटुंबीयांसाठी काहीतरी करायचे असा पण करत, उमाताईंनी अनुराधा देसाई यांच्या उपक्रमात स्वयंसेवक म्हणून सहभागी होण्याचे ठरविले.

2018 मध्ये उमाताई पहिल्यांदा एका पॅराप्लेजिक सैनिकाला भेटल्या. शत्रूशी दोन हात करतानाची घटना या सैनिकाच्या तोंडून ऐकताना, उमाताईंच्या अंगावर शहारा आला. मुंबईत उपचारासाठी आल्यावर या सैनिकांना बाहेरचे जेवण जेवावे लागते हे उमाताईंना कळले. हे कळताच उमाताईंनी त्या वीर सैनिकाच्या क्षुधातृप्तीची जबाबदारी स्विकारली. उमाताई म्हणातात, या सैनिकांनी वयाच्या 22व्या वर्षी सीमारेषेवर शत्रूंशी दोन हात केले. या ऋणातून आपण कधीच मुक्त होऊ शकत नाही. मात्र या सैनिकांसाठी थोडी मदत म्हणून मी हे कार्य स्वीकारले. 2018 पासून, आजतागायत मी त्यांच्या संपर्कात आहे. ते मुंबईत येतात, तेव्हा त्यांना भेटायला अनेक लोक येतात. याच कारणाने इतर वीरमाता, लष्करातील अधिकारी, जवान, अनेक वीरपत्नी यांच्याशी ओळख होत गेली. यातूनच एक साखळी तयार होत गेली.

आज मुंबईसारख्या मोठ्या शहरात येणार्‍या वीरपत्नी, वीरमाता यांना बँक, उपचार अशा अनेक कामांत अडथळे येतात. या अडचणींवर मात करण्यासाठी उमाताई काम करतात. नाशिकमध्ये सैन्यातील हुतात्मा वीरमाता आणि वीरपत्नींचे एक मोठे संघटन आहे. या संघटनेतील महिलांसाठी दरवर्षी ‘हळदी-कुंकू’ उपक्रम घेण्यास उमाताईंनी सुरुवात केली. हा उपक्रम सुरु करताना ,अनेकांचा विरोध होता. मात्र उमाताई म्हणतात, श्रीकृष्णाने गीतेत अर्जुनाला सांगितले आहे की, जर तुझा युद्धभूमीत मृत्यू झाला तर, स्वर्गाचे राज्य भोगशील आणि जर तू जीवंत राहिलास तर, पृथ्वीवर राज्य भोगशील. रणांगणावर प्राण सोडणारे आपले जवान हे अमर आहेत. मग त्यांच्या पत्नी विधवा कशा? त्यांचे हे विधान सर्वानाच पटले.

गेली दोन वर्षे वीरपत्नींसाठी ‘हळदी-कुंकू’ हा उपक्रम घेतला जातो. रक्षाबंधन सणालाही उमाताई महिलांना आवाहन करून, सैन्यांना राखी बांधायला घेऊन जातात. अनेक उपक्रमांतून वर्षाचे 12ही महिने उमाताईंमुळे अनेकांना या सैनिकांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी मिळते. यंदाच्या वर्षी उमाताई कारगिल शहीद यात्रेत सहभागी झाल्या. कारगिल युद्धात सहभागी महाराष्ट्रातील 25 जवानांच्या घरी जाऊन, त्यांच्या घरची माती आणि प्रत्यक्ष कारगिल युद्धभूमीवरील मातीचा एकत्रित एक कलश तयार करायचा. या कलशाची स्थापना करायची, असा हा उपक्रम होता. यामध्ये सांगली, सातारा आणि कोल्हापूर येथील जवानांच्या घरी उमाताईंनी भेट दिली.

उमाताई म्हणतात, आज राज्यभरातूनच नव्हे तर देशभरातून अनेक वीरपत्नी, वीरमाता माझ्याशी फोनवरून, समाज माध्यमांवरून जोडल्या गेलेल्या आहेत. कित्येकांना तर मी कधीही भेटले नाही, पण त्यांचे आशीर्वाद माझ्या आणि माझ्या मुलीच्या पाठीशी आहेत. अनेक महिला तर त्यांच्या कौटुंबिक गोष्टीदेखील मन मोकळे करण्यासाठी मला फोन करून सांगतात. अनेक वीरपत्नींच्या मुलांना शाळेत प्रवेश घेणे, दवाखान्यात उपचार घेणे, या महिलांना प्रशिक्षित करून स्वावलंबी करणे, यांसारख्या विविध उपक्रमांतून या सैनिक कुटुंबीयांना मदत करण्याची संधी देव मला देतो. माझे संपूर्ण आयुष्यच कृतार्थ झाल्याची भावना मला नेहमीच असते. देशाच्या सीमेवर लढणार्‍या जवानांप्रति कृतज्ञतेच्या भावनेतून कार्यरत उमाताईंच्या हातून असेच सत्कार्य घडो, यासाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून शुभेच्छा!



Powered By Sangraha 9.0