बांदेकर भगिनींनी सुरूच ठेवले 'गणेश चित्र मंदिर'

06 Sep 2024 20:10:20

bandekar sisters 
 
चेंबूर : अमर महाल येथील प्रसिद्ध ‘गणेश चित्र मंदिर’ मूर्तीशाळेत यावर्षीही चेंबूरच्या राजासोबतच अनेक महत्वाच्या गणेश मूर्ती तयार करण्याचे काम होते. त्यामुळे ही मूर्तीशाळा सांभळणाऱ्या प्रतिभा, विमल, मनीषा, हेमा आणि तृप्ती या बांदेकर भगिनींवर यावर्षीही मोठी जबाबदारी होती. गेल्या वर्षी दसऱ्याच्या दिवशी त्यांच्या मूर्तीकामाचा मुहूर्त पार पडला आणि मग सुरुवातीला माघी गणेशमूर्ती आणि त्यांचे काम संपल्यावर मुख्य गणेशोत्सवातील गणेशमूर्ती घडविण्याच्या पूर्वतयारीला त्यांनी सुरुवात केली.
 
सालाबादप्रमाणे या वर्षीही चेंबूरच्या राजाची मूर्ती घडविणे हे या भगिनींसमोरील मोठे आव्हान आणि जबाबदारी होती. दसऱ्याच्या दिवशी पासूनच जेव्हा माघी गणपती तयार व्हायला सुरुवात झाली तेव्हापासूनच त्यांनी चेंबूरच्या राजाचे एक एक अवयव तयार करायला सुरुवात केली आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी मुख्य पूजा झाल्यानंतर चेंबूरच्या राजाची संबंध मूर्ती तयार करायला त्यांनी सुरुवात केली. गणेशोत्सवाला अवघे काही दिवस उरलेले असल्यामुळे ‘गणेश चित्र मंदिर’ मूर्तीशाळेत सध्या खूप लगबग सुरू आहे. जवळपास सर्वच मूर्तींचे काम आता शेवटच्या टप्प्यात आले आहे. काही मूर्त्या आगमनासाठी सज्ज आहे तर काही मूर्त्यांचे त्यांच्या मंडळांमध्ये आगमन झालेले आहे. चेंबूरच्या राजाचे सुद्धा २५ ऑगस्ट रोजी ‘गणेश चित्र मंदिर’ मूर्तीशाळेतून त्याच्या मंडळात वाजतगाजत आगमन झालेले आहे. मंडळातील मूर्त्यांसोबतच घरगुती मूर्त्याही या मूर्तीशाळेत तयार होतात त्यामुळे ७ सप्टेंबर पर्यंत त्यामुळे या सगळ्या मूर्त्यांना अंतिम स्वरूप देण्याचे काम येथील ‘गणेश चित्र मंदिर’ मूर्तीशाळेत जोमाने सुरू आहे.
चेंबूर येथील ‘गणेश चित्र मंदिर’ मूर्तीशाळेचे प्रसिद्ध मूर्तिकार बाबी बांदेकर म्हणजेच विष्णु बांदेकर यांचे २०१५ साली निधन झाली. मूर्तीकलेच्या क्षेत्रात बाबी बांदेकर यांचे मोठे नाव होते. त्यामुळे त्यांच्या निधनानंतर त्यांची या मूर्तीकलेच्या परांपरेचे आणि त्यांच्या मूर्तीशाळेचे अस्तित्व सुद्धा धोक्यात येणार असे अनेकांना वाटले होते. पण बाबी बांदेकरांच्या मुलींनी ते होऊ दिले नाही. त्यांनी त्यांच्या वडिलांची परंपरा पुढे चालू ठेवली, मूर्तीशाळेची जबाबदारी हातात घेतली. तेव्हापासून या मूर्तीशाळेतील मूर्त्या तयार करण्याचे, त्यांना रंग देण्याचे आणि त्यांची विक्री करण्याचे अशी सर्व कामे या बांदेकर भगिनीच सांभाळत आहेत.
 
“लहानपणापासूनच बाबांनी आम्हाला मूर्तीकलेची शिकवण द्यायला सुरुवात केली होती. मातीतून मूर्ती घडविण्यापासून ते त्यांना रंग देऊन त्यांना अंतिम स्वरूपात आणणे अशी सर्व काम त्यांची आम्हाला शिकवली होती. आम्हाला ही कामे शिकवत असताना मुली हे सगळं शिकून काय करणार आहेत? मुलींना याचा काय उपयोग होणार आहे? असे खोचक प्रश्न त्यांना चहूबाजूने विचारले जात होते पण बाबांनी त्याकडे लक्ष दिले नाही. त्यांनी आम्हाला शिकवणे सुरूच ठेवले. आपल्या नंतर आपला हा वारसा आपल्या मुलींनी सांभाळावा अशी त्यांची मनोमन इच्छा होती.” हेमा बांदेकर यांनी सांगितले. 
Powered By Sangraha 9.0