काय आहे ऋषिपंचमीचे महत्त्व? जाणून घ्या एका क्लिकवर..

    06-Sep-2024
Total Views |

RISHI
 
भाद्रपद हा महिना मुख्यतः गणेशोत्सवासाठी ओळखला जातो. या महिन्याच्या तृतीयेला हरितालिका पूजनाची परंपरा आहे. यानंतर चतुर्थीला श्रीगणेशाचे पूजन केले जाते आणि त्यानंतर येणारी भाद्रपद शुक्ल पंचमी ही ऋषिपंचमी म्हणून ओळखली जाते. श्रावणातील व्रत-वैकल्यांप्रमाणे ऋषिपंचमीचे व्रतही स्त्रियांनी करावयाचे एक व्रत आहे.
 
भारतीय पुराणात होऊन गेलेल्या महान ऋषींविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीचा हा दिवस. या महान ऋषींमध्ये कश्यप, अत्री, भारद्वाज, विश्वामित्र, गौतम, जमदग्नी आणि वसिष्ठ या सप्तर्षींच्या समावेश आहे. या सात ऋषींना ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे अंश मानले जाते आणि त्यांना वेद आणि धार्मिक ग्रंथांचे रचनाकार देखील म्हटले जाते.
 
या प्रसंगी सात ऋषी आणि वसिष्ठांची पत्नी अरुंधती एक अशा एकूण ८ सुपाऱ्या मांडून ही पूजा केली जाते. या व्रताचे पालन करताना स्त्रियांना उपवास करणे विहित आहे, परंतु पुरुषांनाही त्यांच्या पत्नीच्या कल्याणासाठी उपवास करण्याची परवानगी आहे. या प्रसंगी अनुयायांकडून ब्राह्मणांना दक्षिणा अर्पण केली जाते , असे मानले जाते की सात ऋषींच्या पूजेमध्ये ते अनुकूल आहे. केरळच्या काही भागात हा दिवस विश्वकर्मा पूजा म्हणूनही साजरा केला जातो . माहेश्वरी समाज हा दिवस रक्षाबंधन म्हणून साजरा करतात.
 
या दिवशी बैलांच्या कष्टाचे कोणतेही अन्न खाल्ले जात नाही. वर्षातून किमान एक दिवस तरी स्वतः कष्ट करून मिळवलेले अन्न खावे, असे यामागील शास्त्र असल्याचे सांगितले जाते. ‘स्वकष्टार्जित’ या शब्दाला ऋषींनी प्रतिष्ठा दिलेली आहे. जीवनाच्या सर्वांगीण विकासासाठी ऋषींनी सांगितलेल्या ज्ञान सिद्धांताचे वाचन, चिंतन, मनन पुढच्या पिढीने करत राहावे, याची आठवण करून देण्यासाठी ऋषिपंचमी साजरी केली जाते.
 
ऋषिपंचमीला याच भाज्या करतात
 
महाराष्ट्राप्रमाणे नेपाळमधील महिलाही हे व्रत करतात. ऋषिपंचमीला एक विशिष्ट प्रकारची भाजी केली जाते. अळूची पाने, सुरण, वाल, लाल भोपळा, मटार, भेंडी, पडवळ, शिराळं, मक्याचे कणिस, काकडी, कोवळा माठ या भाज्या वापरून ही भाजी तयार केली जाते. यांतली कोणतीही भाजी बैलाच्या श्रमाची नसते.