पुण्यातील मानाचे ५ गणपती! काय आहे इतिहास आणि महत्व? जाणून घ्या सविस्तर...

    06-Sep-2024
Total Views |
 
Ganpati
 
पुणे : शनिवार, ७ सप्टेंबरपासून गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे. त्यासाठी सध्या सगळीकडेच गणपतीच्या आगमनाची लगबग सुरु आहे. यावर्षी काय विशेष करायचं? मुर्ती कशी असेल? कोणता मुहुर्त चांगला असेल? हे जाणून घेण्यासाठी भक्तांची धडपड सुरु आहे. पुण्यातही गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. पुण्यातील मानाचे ५ गणपती कोणते आणि त्यांचं इतिहास आणि महत्व याबद्दल जाणून घेऊया.
 
पुण्याचे पाच मानाचे गणपती पुढीलप्रमाणे :
 
१) कसबा गणपती
 
पुण्यात अर्थात संपूर्ण महाराष्ट्रात पुण्यातील कसबा गणपतीला मानाचं स्थान आहे. कर्नाटकमधून आलेल्या ठकार नावाच्या कुटुंबाने कसबा गणपतीची स्थापना केली. पुण्यात गणपतीची मुर्ती सापडल्याची बातमी कळल्यानंतर माता जिजाऊंनी कसबा गणपतीचे मंदिर बांधले. कसबा गणपतीला पुण्याचे स्थानिक दैवत मानले जाते. गणपती विसर्जनाच्या दिवशी सर्वात आधी कसबा गणपतीला विसर्जनाचा पहिला मान दिला जातो.
 
हे वाचलंत का? -  लाडकी बहीण योजनेचा १.६० कोटी महिलांना फायदा! 'या' तारखेपर्यंत भरा अर्ज
 
२) तांबडी जोगेश्वरी गणपती
 
पुण्याचा दुसरा मानाचा गणपती म्हणजे तांबडी जोगेश्वरी गणपती. भाऊ बेंद्रे यांनी बुधवार पेठेतील तांबडी जोगेश्वरी या गणेश मंडळाची स्थापना केली. तांबडी जोगेश्वरी ही देवी पुण्याची ग्रामदेवता मानली जाते. याच देवीच्या नावाने हा गणपती ओळखला जातो. दरवर्षी पारंपारिक पद्धतीने तांबडी जोगेश्वरी गणपतीची स्थापना आणि विसर्जन केले जाते.
  
३) गुरुजी तालीम गणपती
 
गुरुजी तालीम गणपती हा पुण्यातील तिसरा मानाचा गणपती मानला जातो. हिंदू आणि मुस्लिम ऐक्याचं प्रतिक म्हणून या गणपतीची स्थापना करण्यात आल्याचा इतिहास आहे. भिकू शिंदे, नानासाहेब खाजगीवाले, रुस्तुमभाई नालबंद यांनी या गणपतीची स्थापना केली होती. विविध फुलांची आरास करून या गणपतीचे आगमन होते. तसेच रंगीबेरंगी फुलांनी सजवलेल्या रथात गणपतीचे विसर्जन केले जाते.
 
४) तुळशीबाग गणपती
 
तुळशीबाग गणपती हा पुण्यातील चौथा मानाचा गणपती असून १९०१मध्ये या गणपती मंडळाची स्थापना करण्यात आली. तुळशीबाग परिसरातील व्यापारी समूहाने या गणपतीची स्थापना केल्याचं सांगण्यात येतं. आकाराने मोठी असलेली गणपतीची मूर्ती आणि आकर्षक देखाव्यांसाठी हा गणपती प्रसिद्ध आहे. या मंडळाने पहिल्यांदा फायबरच्या गणपती मुर्तीची स्थापना केली होती.
 
५) केसरीवाडा गणपती
 
लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला होता. त्यांच्या केसरीवाड्यातील गणपतीला पुण्यातील पाचवा मानाचा गणपती मानला जातो. १८९४ पासून केसरीवाड्यातील गणेशोत्सवाची सुरुवात झाली. या गणेशोत्सवातील विशेष बाब म्हणजे केसरीवाड्यातील गणपतीची विसर्जन मिरवणूक पालखीतूनच काढण्याची परंपरा आहे.