सिमेंटच्या जंगलात न रमता स्वतःचे जंगल उभे करून तिथे झाडे, पशु-पक्षी यांच्यासोबत वास्तव्य करून निसर्गात रममाण झालेल्या नाशिकच्या मोनल नाईक यांच्याविषयी...
मोनल आनंद नाईक यांचा जन्म १९६४ साली नाशिकमध्ये झाला. वडील सरकारी नोकरीला, तर आई गृहिणी. वडिलांची नोकरीनिमित्ताने सातत्याने बदली व्हायची. मोनल यांचे इयत्ता सहावीपर्यंतचे शिक्षण चाळीसगाव येथील आनंदीबाई बंकट हायस्कूलमध्ये झाले. पुढे इयत्ता सातवीचे शिक्षण लासलगावातील श्री महावीर विद्यालयातून झाले. पुढे इयत्ता आठवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण नाशिकमधील सारडा कन्या विद्यामंदिरमधून पूर्ण केले. चित्रकलेची आवड असल्याने चित्रकला महाविद्यालयात प्रवेश घेण्याची इच्छा होती, मात्र ती पूर्ण न झाल्याने अखेर इयत्ता अकरावीला कला शाखेला प्रवेश घेतला. एचपीटी महाविद्यालयातून त्यांनी पदवी मिळवली. त्यानंतर पुण्यात त्यांनी एमए चित्रकला पूर्ण केले. लहान मुलांची शिकवणी यादरम्यान त्या घेत होत्या. चित्रकलेत निसर्गचित्रण हा त्यांच्या आवडीचा विषय.
उद्योजक आनंद नाईक यांच्याशी विवाह झाल्यानंतर मोनल या नाशिकला स्थायिक झाल्या. कॉम्प्युटर डिप्लोमा, निसर्गोपचाराचे धडेही त्यांनी घेतले. नाशिकपासून २९ किमी दूर तळवाडे येथे जवळपास साडेआठ एकर जमीन विक्रीस होती. तेव्हा मोनल आणि आनंद यांनी जमीन खरेदी करण्याचे निश्चित केले. सुरुवातीला तिथे झाडे लावण्याचा विचार केला. परंतु, नंतर त्याचठिकाणी राहायला जाण्याचा निश्चय दोघांनी केला. निसर्गाची आवड असल्याने या जागेवर स्वतःचे जंगल तयार करण्याचे पक्के झाले. सुरुवातीला म्हणजेच १९९२ साली मोनल यांनी साग, निलगिरी अशी झाडे लावली. प्रारंभी काही लोकांकडून झाडे उपटून टाकणे, कुंपण तोडणे, झाडे पळवून नेण्याचे प्रकारही समोर आले. मात्र, मोनल यांनी माघार न घेता, झाडे लावण्याचा सपाटा सुरू केला. कधी या रोपवाटिकेतून त्या रोपवाटिकेत अशी त्यांची भटकंती सुरू झाली. त्यावेळी त्यांना सामाजिक वनीकरणाची खूप मदत झाली. निवृत्त वन अधिकारी कुसुम दहिवेलकर यांचेही त्यांना मार्गदर्शन मिळाले. यातूनच त्यांना दुर्मीळ प्रजातीतली झाडे मिळाली.
काही पुस्तके वाचल्यानंतर व पूर्ण अभ्यास करून मोनल यांनी देशी झाडे लावण्यास सुरुवात केली. याठिकाणी त्यांनी घरही बांधले. जेव्हा त्या नाशिकला होत्या, तेव्हा मोनल आणि पती आनंद दोघेही झाडांना पाणी घालण्यासाठी पहाटे तळवाडेला जात होते. पाण्यासाठी याचठिकाणी विहीर खोदली. मोठे तळेही खोदले आहे. २००२ साली पावसाळ्यापूर्वी मोठ्या प्रमाणावर झाडे लावली. भगवान शंकरावरील भक्तीमुळे त्यांनी या जंगलाला ‘शतार्चि’ असे नाव दिले आहे. तीन हजारांहून अधिक झाडे ‘शतार्चि’मध्ये आहेत. यामध्ये औषधी, फुलांची, शोभेची, फळांची असंख्य झाडे आहेत. तसेच, अनेक वेलींचे प्रकारही आहे. गारंबी, माधवीलता, मालती अशा वेली, यांसह फणस, तुती, डाळिंब, काजू, आंबा, नारळ, केळी, ब्लॅकबेरी, आवळा अशी असंख्य फळांची झाडे आहेत. राज्यफूल ताम्हणही जंगलात आहे. अग्निमंथ, पाषाणभेद, अडुळसा, कृष्ण तुळस अशा औषधी वनस्पती आहेत. मसाल्याची झाडेही आहेत.
अगदी कापराचे झाडही या जंगलात आहे. सीताअशोक, मखाना, कमळाचे विविध प्रकार अशी ६० हून अधिक फुलांची झाडे आहेत. धूळकिड्यांची घरे, मुंग्यांची वारुळे असून झाडांसाठी सेंद्रीय खताचाच वापर केला जातो. बिबट्यामुळे प्राणी पाळणे त्यांनी थांबवले असून, सध्या त्या गायी आणि कुत्रेपालन करतात. आंब्याची बाग शॉर्ट सर्किटने दोनदा जळली होती. जेवढ्या वेळा जळली, तेवढ्याच वेळा त्यांनी पुन्हा नव्याने उभी केली. मार्च ते ऑगस्ट हा पक्ष्यांच्या विणीचा काळ. या काळात ते कोणत्याही शिबिराला परवानगी देत नाहीत. सुरुवातीला ते शिबिराला परवानगी द्यायचे. मात्र, अनेक पक्ष्यांचा अधिवास धोक्यात आल्यानंतर ते शिबिरांना ऑगस्टनंतरच परवानगी देतात. अनेक पक्ष्यांची घरटीही जंगलात आहेत. बुलबुल, साळुंकी, जंगलमैना अशा अनेक पक्ष्यांचा येथे नेहमी वावर असतो. हिर्डी गावातील ग्रामस्थांचे नाईक कुटुंबीयांना मोठे सहकार्य मिळाले. मोनल यांना आता विविध शाळा, महाविद्यालयांमध्ये व्याख्यानासाठी बोलावले जाते.
“एकदा झाड उभे केले, की त्यावर पुन्हा घाव घालायचा नाही, हे तर ठरलेलेच. परिसरात भातशेती मोठ्या प्रमाणावर होते. निलगिरी प्रचंड पाणी शोषून घेते. शेवटी शेतकर्याचेही भातशेतीवरच पोट आहे. त्यामुळे सगळी निलगिरी काढण्याचा निर्णय आम्ही घेतला. जमिनीतून उत्पन्न घेण्याचा कोणताही हेतू नाही. ही जागा आत्मिक समाधानासाठीच विकसित केली आहे. अनेकजण आमच्याकडे आल्यानंतर त्यांच्या शेतात राहायला गेली आहेत. निसर्गाशी एकरूप राहता आले पाहिजे. जंगलात येऊन शांततेत राहण्यासारखा दुसरा आनंद नाही,” असे मोनल सांगतात.
नाईक कुटुंब आधी नाशिकमध्ये शरणपूर रोड परिसरात राहायचे. पण, या सिमेंटच्या जंगलात हे कुटुंब रमलेच नाही. त्यामुळेच त्यांनी स्वतःचे जंगल उभे केले आणि शहर कायमचे सोडले. निसर्गात रममाण झालेल्या मोनल नाईक यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून मनःपूर्वक शुभेच्छा!