गणेशोत्सव : अध्यात्मापासून राष्ट्रवादाकडे...

    06-Sep-2024
Total Views |

Ganeshotsav 2024
 
सार्वजनिक गणेशोत्सवामुळे हिंदू जनतेत ऐक्याची भावना निर्माण झाली आणि भारतीय जनता निर्भयतेने ब्रिटिशांच्या विरोधात संघटित होऊ लागली. लोकमान्य टिळकांनी ज्याची मेढ रोवली, तो हा सार्वजनिक गणेशोत्सव आजही सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक जागरणासाठी आणि राजकीय प्रबोधनासाठी एक व्यासपीठ म्हणून विकसित झाला आहे. आज श्रीगणेश चतुर्थीनिमित्त गणेशोत्सवाच्या अशा या अध्यात्मापासून ते राष्ट्रवादाच्या पैलूचे केलेले हे चिंतन...
 
एक वृद्ध घरासमोरच्या अंगणात आंब्याचे झाड लावीत होता. रस्त्यावरून जाणारा वाटसरू हे दृश्य बघून थबकला. त्याने वृद्धाला विचारले, “आजोबा, या वयात तुम्ही हे कष्ट का घेत आहात? खाटेवर बसून बाजारातून आणलेले आंबे का खात नाही? स्पष्टोक्तीकरिता क्षमा करा. पण, मला वाटते की या वृक्षाच्या फळांचा आस्वाद घेण्याइतके तुमचे आयुष्य उरले नाही.” मान वर न करता आपले काम चालू ठेवीत तो वृद्ध म्हणाला, “माझी नातवंडे, माझे शेजारी, पै पाहुणे या वृक्षाची फळे खाऊन आनंदित होतील, या कल्पनेनेच मला अतीव समाधान मिळत आहे. वृक्ष लावण्यासाठी हे कारण पुरेसे नाही का?” तो आम्रवृक्ष त्या वृद्धाने पुढील पिढ्यांसाठी मागे ठेवलेला वारसा होता.
गणेशोत्सव - भारतीयांचा वारसा
 
हिंदू धर्मात ‘वारसा’ ही संकल्पना केवळ संपत्तीपुरती मर्यादित नाही. ती सर्वसमावेशक आहे. नित्यनूतन शोध, सामाजिक सुधारणा, अनिष्ट प्रथांच्या निर्मूलनासाठी आणि इष्ट प्रथा, सणवार यांच्या जतनासाठी केलेले अविरत परिश्रम या सगळ्यांचा अंतर्भाव ‘वारसा’ नामक संकल्पनेत होतो. हिंदू धर्मातील गणेशपूजन आणि हिंदू संस्कृतीतील गणेशोत्सव हा भारतीयांचा वारसा आहे आणि त्याचे ते श्रद्धापूर्वक जतन करीत आले आहेत.
 
गणपतीचे बदलते स्वरूप आणि प्रतीकात्मकता
ऋग्वेदात गणांचा स्वामी म्हणून गणपतीचा निर्देश आढळतो. (ऋग्वेद २.२३.१)
गणानां त्वा गणपतिं हवामहे कविं कवीनामुपमश्रवस्तमम्।
ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पत आ न: शृण्वन्नूतिभिः सीद सादनम्॥
 
गणांचा स्वामी (ब्रह्मणः पतिः = ब्रह्मन्चा पालनकर्ता = रक्षणकर्ता = ब्रह्मणस्पति), विद्वानांमध्ये विद्वत्तम, कीर्तिवंतांमध्ये वरिष्ठ, राजाधिराज असलेल्या तुझे आम्ही आदराने आवाहन करतो. रक्षणरूपी संपूर्ण शक्तींसह येऊन तुम्ही या आसनावर विराजमान व्हावे.
 
वैदिक संस्कृत भाषेत ‘ब्रह्मन्’ शब्दाचे मंत्र, सत्य, अन्न असे निरनिराळे अर्थ आहेत. त्यामुळे ‘ब्रह्मणस्पति’ शब्दाचा एक अर्थ (मेधासंपन्न असल्यामुळे) मंत्राचे रक्षण करणारा किंवा मंत्राचा स्वामी (मंत्रदेवता) असा होऊ शकतो. ऋग्वेदाचे भाष्यकार असलेल्या सायणाचार्यांनी ‘ब्रह्मन्’ शब्दाचा अर्थ ‘अन्न’ असा केला आहे. परिणामी, ‘ब्रह्मणस्पति’ म्हणजे अन्नाचे रक्षण करणारा. हा अर्थ शब्दशः घेतल्यास गणेशाच्या हातामध्ये (अन्नाचे प्रतीक असलेला) मोदक का असतो, याचा उलगडा होतो. शिवाय, ‘अन्न’ शब्दाचा अर्थ सायणाचार्यांनी ‘श्रव’ अर्थात ‘कीर्ती’ असा केला आहे. म्हणून गणपती कीर्तिवंतांमध्ये वरिष्ठ आहे. अन्यत्र (ऋग्वेद १०.११२.९) गणपतीशिवाय काहीही करता येणे अशक्य आहे, असे म्हटले आहे. या विधानाद्वारे कार्यारंभी गणेशाचे पूजन करण्याच्या प्रथेची संगती लागते. तो धनवान आहे असे म्हटले आहे. यामुळे त्याच्या निकट त्याची शक्ती-भार्या ऋद्धि असणे संयुक्तिक ठरते. मात्र, या मंत्रात गणपती हे इंद्रदेवतेचे विशेषण आहे, हे ध्यानात घेतले पाहिजे.
 
स्कंद पुराण, नारद पुराण आणि ब्रह्मवैवर्त पुराणात गणेश देवतेला महत्त्वाचे स्थान दिले आहे. ‘विघ्नहर्ता गणपती’ ही संकल्पना मध्ययुगीन पुराणांनी प्रस्थापित केली. गाणपत्य संप्रदायामुळे गणपतीचे माहात्म्य वाढीस लागले. मुद्गल पुराण आणि गणेश पुराण हे या संप्रदायाचे अधिकृत साहित्य होय.
 
आदि शंकराचार्यांनी (आठवे शतक) पञ्चायतन पूजा रूढ केली. त्यात मध्यभागी गणेश देवता असून शिव, दुर्गा, विष्णू आणि सूर्य या अन्य देवता असतात. वैष्णव, शैव तसेच शाक्त पुराणांमध्ये पञ्चायतन पूजेचे वर्णन आढळते.
गणेशाचे मूर्त रूप ‘गजानन’ अथवा ‘गजवदन’ असे आहे. भारतीय परंपरेत हत्ती शक्ती, बुद्धी, आनंद आणि आधिपत्य यांचे प्रतीक आहे. त्याची सोंड म्हणजे स्थूल आणि सूक्ष्म यात भेद करण्याची आणि त्याचे बारिक डोळे लक्ष केंद्रित करण्याची क्षमता दर्शवितात. त्याचे सुपासारखे कान (‘शूर्पकर्ण’ गणपत्यथर्वशीर्षम्-‘शूर्पकर्णकं रक्तवाससम्...’) तो कृषिदेवता असल्याचे आणि बहुश्रुत असल्याचे निदर्शक आहे. गणेशमूर्तीचे पार्थिव स्वरूप पृथ्वीशी-भूमातेशी असलेल्या त्याच्या संबंधाचे द्योतक आहे. संत ज्ञानेश्वरांनी ॐ गणपतीचे प्रतीकात्मक स्वरूप आहे, असा सिद्धांत मांडला.
 
राजमान्यता
 
गणपती पेशव्यांचे कुलदैवत असल्यामुळे पेशवे आणि त्यांच्या सरदारांनी गणपतीच्या वार्षिक उत्सवाचा संपूर्ण भारतात प्रसार केला. बाजीराव पेशव्यांच्या पराभवानंतरदेखील बडोदा, ग्वाल्हेर, इंदूर, सांगली, जमखिंडी, औंध येथे गणपतीच्या सार्वजनिक उत्सवाची परंपरा चालू राहिली.
 
लोकमान्य टिळकांची दूरदृष्टी-अध्यात्म आणि राजकारणाचा संगम
 
ब्रिटिश राजवटीत पुण्यातील प्रमुख व्यक्तींनी हिंदूंना त्यांचे सणांबद्दलचे प्रेम कोणत्याही दबावाविना मनमोकळेपणे व्यक्त करण्यासाठी गणपती उत्सव हा सार्वजनिक कार्यक्रम म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. टिळकांनी ‘केसरी’मध्ये त्याचे समर्थन करणारा लेख लिहिला. शिवाजी उत्सव आणि गणेशोत्सवाच्या आयोजनासाठी टिळकांनी दमदार प्रचार केला. कारण, भारतीय मनाची नाडी ओळखून राजकीय जागृतीला आध्यात्मिक जागृतीची जोड दिल्यास ती जनजागरणाचे योग्य साधन ठरेल, अशी अटकळ त्यांनी बांधली होती. टिळकांनी १८९५-९६ मध्ये भारतीयांचा आत्मसन्मान आणि राष्ट्रवादाची भावना ज्वलंत करण्यासाठी शिवजयंती उत्सवाचा प्रारंभ केला. अशा उत्सवांमुळे जनतेला राष्ट्रासाठी कार्य करण्याचे बळ लाभेल, असे त्यांचे मत होते. राष्ट्रवाद हा एक विचार आहे, एक भावना आहे, जी अनुभूतीचा विषय आहे, असे ते म्हणतात.
 
ब्रिटिश वसाहतवादी राजवटीला विरोध करण्यासाठी त्यांनी शिवजयंती आणि गणेशोत्सवाचा उपयोग यशस्वीपणे केला. परिणामी, सर्वसामान्य जनमानसांत राष्ट्रवादाची ज्वलंत भावना जागृत झाली. वैदिक इंद्रोत्सव, पौराणिक जन्माष्टमी, दुर्गापूजा यांसारख्या उत्सवांपैकी गणेशोत्सवाची निवड टिळकांनी का केली असावी, याचा शोध घेतला असताना असे लक्षात येते की, गणपती ही देवता समन्वयाचे प्रतीक आहे. म्हणून तिच्या उत्सवाद्वारे समाजातील उच्च आणि निम्न स्तरांमधील लोकांमध्ये समन्वयाचे बीज पेरणे व ते वाढीस लावणे, हे टिळकांचे लक्ष्य होते. गणेश देवता समन्वयाचे प्रतीक असल्याचा तर्क पुढील कारणांमुळे सुसंगत ठरतो. (१) अन्नधान्याची नासाडी करणार्‍या मूषकाला गणपतीने पायाशी ठेवले. अर्थात नमविले. शिवाय, त्याचा आणि पिकांची हानी करणार्‍या अन्य प्राण्यांचा कर्दनकाळ ठरणार्‍या सर्पाला मेखलेच्या रूपात धारण केले. मूषक आणि सर्प दोघांनाही देहावर धारण करून त्याने उपकारक आणि उपद्रवी प्राण्यांना आश्रय दिला. त्याचबरोबर सुष्टांचे उन्नयन आणि दुष्टांचे निर्दालन करण्याचा संकेतही दिला. (२) गणेश गजवदन अथवा ‘गजानन’ आहे. ‘गजवदन’ या सामासिक शब्दाची फोड ‘गजस्य वदनम् इव वदनं यस्य सः’ - ‘हत्तीच्या वदनासारखे ज्याचे वदन आहे असा तो’ अशी होते. मस्तकासाठी हत्ती हा प्राणी आणि देह मानवाचा अशी मूर्ती मनुष्य आणि मनुष्येतर प्राण्यांचा समन्वय दाखविते. जो मानवी देहात वास करतो, तोच आत्मा अन्य जीवांतही वास करतो. असा मनुष्य आणि मनुष्येतर जीवांच्या समन्वयाचा अर्थ आहे. (३) गणेश देवता जीवात्मा आणि सगुण ब्रह्म/परमात्मा यांतील समन्वयाचे प्रतीक आहे. (गणपत्यथर्वशीर्षम्-त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि। त्वं साक्षादात्माऽसि नित्यम्।) (४) गणेश देवता सर्व महाभूतांतील समन्वयाची निदर्शक आहे. (गणपत्यथर्वशीर्षम्-त्वं भूमिरापोऽनलोऽनिलो नभः॥) (५) ‘त्वं चत्वारिवाक्पदानि।’ हा मंत्र परा, पश्यन्ती, मध्यमा आणि वैखरी या चार प्रकारच्या वाणींतील समन्वयाचा बोधक आहे. (६) ‘त्वं शक्तित्रयात्मकः।’ हा मंत्र ज्ञानशक्ती, इच्छाशक्ती आणि क्रियाशक्ती या शक्तींमधील समन्वयाचे प्रतिपादन करतो. (७) गणपत्यथर्वशीर्षम् स्तोत्रातील ‘त्वं ब्रह्मा त्वं विष्णुस्त्वं रुद्रस्त्वमिन्द्रस्त्वमग्निस्त्वंवायुस्त्वं सूर्यस्त्वं चन्द्रमास्त्वम्...’ हा मंत्र गणेश देवता सर्व देवतांच्या समन्वयाचे प्रतीक आहे असे दर्शवितो.
गणेशोत्सवाचे सांस्कृतिक महत्त्व लक्षात घेऊन टिळकांनी ‘केसरी’मध्ये त्याचे स्वरूप कसे असावे, याविषयी विवेचन केले. (केसरी, ३.९.१८९५) कालिदासाच्या ‘मालविकाग्निमित्रम्’ नाटकातील ‘नाट्यं भिन्नरुचेर्जनस्य बहुधाप्येकं समाराधनम्।’ (अंक १. श्लोक क्र. ४.) ‘नाट्य वेगवेगळी आवड असलेल्या लोकांना एकत्र आणण्याचे साधन आहे,’ हे वचन नमूद करून त्यांनी नृत्य आणि नाट्याचा समावेश गणेशोत्सवात करावा, असे सुचविले.
आपले उत्तरदायित्व
 
सार्वजनिक गणेशोत्सवामुळे हिंदू जनतेत ऐक्याची भावना निर्माण झाली आणि भारतीय जनता निर्भयतेने ब्रिटिशांच्या विरोधात संघटित होऊ लागली. लोकमान्य टिळकांनी ज्याची मेढ रोवली, तो हा सार्वजनिक गणेशोत्सव आजही सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक जागरणासाठी आणि राजकीय प्रबोधनासाठी एक व्यासपीठ म्हणून विकसित झाला आहे. त्याचा उपयोग सजगतेने, आपापसातील मतभेद बाजूला ठेवून ‘भारत-एक राष्ट्र-एक अस्मिता-उदयोन्मुख जागतिक प्रेरणास्थान’ ही प्रतिमा निर्माण करण्यासाठी आणि ती प्रत्यक्षात आणण्यासाठी झटणे, हे प्रत्येक सुबुद्ध नागरिकाचे आद्य कर्तव्य आहे.
 
लेखिका - प्रा. कला आचार्य