असं आहे गणेश चतुर्थीचं हिंदू संस्कृतीत महत्त्व...

06 Sep 2024 17:32:14
 
shriganesha
 
हिंदू पंचांगानुसार प्रत्येक महिन्यात दोन चतुर्थी येतात, पहिली शुक्ल पक्षात तर दुसरी कृष्ण पक्षात येते. दर महिन्याला येणाऱ्या कृष्ण पक्षातील चतुर्थीला संकष्ट चतुर्थी म्हणतात, तर शुक्ल पक्षातील चतुर्थीला विनायक चतुर्थी म्हणतात.
 
विशेषतः भाद्रपद महिन्यात शुक्ल पक्षात येणारी चतुर्थी ही 'श्रीगणेश चतुर्थी' म्हणून ओळखली जाते. यादिवशी श्रीगणेशाची स्थापना करून पुढचे दहा दिवस गणेशोत्सव साजरा केला जातो. असे मानले जाते की विनायक चतुर्थीच्या दिवशी मध्यान्हकाळात गणेश पूजन केले जाते. सामान्यपणे विनायक चतुर्थीचा उपवास मध्यान्हच्या वेळी म्हणजेच दुपारी सोडला जातो. गणेश चतुर्थीचा हा सण चातुर्मासात येतो. यादिवशी गणेशाची स्थापना होते आणि दहा दिवसानंतर अनंत चतुर्दशीला गणेश मुर्ती विसर्जीत केली जाते. दहा दिवसांचा हा उत्सव मोठ्या थाटामाटात आणि जल्लोषात साजरा केला जातो.
 
समर्थ रामदासांनी मनाच्या श्लोकामधून श्रीगणेशाचे माहात्म्य सांगितले. "गणाधीश जो ईश सर्वां गुणांचा" असे पहिल्याच ओळीत प्रथम श्री गणेशाला वंदन करून त्यास सर्व गुणांचा ईश असे संबोधले.
 
भगवान शंकर आणि पार्वती पुत्र गणेश हे बुद्धीचे दैवत आहे. तसेच हिंदू धर्मात भगवान श्री गणेशाला प्रथम पूजेचा मान आहे. कोणतेही शुभकार्य आरंभिले असल्यास सर्वात आधी गणपतीची पूजा केली जाते. कारण गणपती विघ्नहर्ता आहे. गणपतीची अनेक नावं आहेत त्यापैकीच हे एक नाव. गणपती हा विघ्नहर्ता असल्याने भविष्यात येणाऱ्या विघ्नांचे म्हणजे संकटांचे तो निवारण करेल ही भावना त्यामागे असते.
 
गणेश जन्माची आख्यायिका
 
पार्वतीला स्नानासाठी जावयाचे होते. परंतु तेथे आसपास पहारा देण्याकरिता कुणीच नव्हते. तेव्हा पार्वतीने आपल्या अंगावरील मळाने एक मूर्ती तयार केली व तिच्यात प्राण फुंकून ती जिवंत केली. याच मूर्तीला तिने दारावर पहारेकरी म्हणून नेमले आणि सांगितले की, कोणालाही आतमध्ये येण्याची परवानगी देऊ नकोस. असे सांगून पार्वती स्नानासाठी स्नानगृहामध्ये गेली. काही वेळाने भगवान शंकर तिथे आले आणि ते आतमध्ये जाऊ लागले. तोच त्या पहारेकऱ्याने त्यांना अडवले. त्यावर भगवान शंकर क्रोधित झाले आणि त्यांनी रागाच्या भरात त्या पहारेकऱ्याचे शिर धडावेगळे केले. पार्वती जेव्हा स्नान करून बाहेर आली तेव्हा घडलेला प्रकार पाहून तिचा राग अनावर झाला. ते धडावेगळं शिर पाहून तिने पूर्ण ब्रम्हांड हादरवून सोडले. सर्व देवमुनी अगदी ब्रम्हदेवापासून सगळे पार्वतीची समजूत घालण्याचा प्रयत्न करतात. पण पार्वती कोणाचं काहीही ऐकून घेत नाही. तेव्हा शंकर आपल्या गणाला आदेश देतात की, पृथ्वीतलावर जाऊन सर्वात आधी जो प्राणी दिसेल त्याचं शिर कापून घेऊन ये. गण बाहेर पडल्यावर सर्वात आधी त्याला एक हत्ती दिसला. त्याचं शिर घेऊन तो शंकरांकडे आला. भगवान शंकरांनी ते शिर धडाला लावले आणि त्या मूर्तीला जिवंत केले. हाच पार्वतीचा मानस पुत्र गज (हत्ती) आनन (मुख) म्हणजेच गजानन होय. शंकर देवाने त्याला गणांचा ईश म्हणजे देव म्हणून गणेश नाव दिले. हा दिवस चतुर्थीचा होता. त्यामुळे या चतुर्थीला श्रीगणेश चतुर्थी म्हणून महत्त्व आहे.
 
 
 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0