"महाविकास आघाडी आणि जरांगे दोघेही केवळ एकालाच..."; फडणवीस थेटच बोलले

06 Sep 2024 13:04:11
 
Devendra Fadanvis
 
मुंबई : महाविकास आघाडी आणि जरांगे हे दोघेही एकालाच टार्गेट करत आहेत. यातून त्यामागची भावना स्पष्ट दिसत आहे, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केले आहे. टीव्ही ९ मराठीच्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणावर भाष्य केलं.
 
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "१०८० पासून मराठा आरक्षणाची लढाई सुरु झाली. १९८२ साली स्वर्गीय अण्णासाहेब पाटलांनी मराठा आरक्षण देता आलं नाही म्हणून स्वत:ला गोळी मारून घेतली. १९८२ पासून २०१४ पर्यंत मधली चार वर्षे सोडल्यास काँग्रेस-राष्ट्रवादीचं सरकार होतं. पण त्यांनी कधीही आरक्षण दिलं नाही. मी मुख्यमंत्री झाल्यावर मराठा समाजाला आरक्षण दिलं. ते हायकोर्टात टिकवलं. जोपर्यंत मी मुख्यमंत्री होतो तोपर्यंत सुप्रीम कोर्टात ते टिकलं. त्यानंतर उद्धवजींचं सरकार आलं आणि ते सुप्रिम कोर्टात गेलं. त्यानंतर पुन्हा उद्धवजींनी आरक्षण दिलं नाही तर शिंदेंच्या सरकारने दिलं."
 
हे वाचलंत का? -  पुण्यातील मानाचे ५ गणपती! काय आहे इतिहास आणि महत्व? जाणून घ्या सविस्तर...
 
"एखाद्या सरकारमध्ये सरकारचे प्रमुख हे मुख्यमंत्री असतात. आमच्या सरकारमध्ये मुख्यमंत्री आहेत, मी आहे, अजितदादा आहेत. पण मनोज जरांगे पाटील केवळ माझं नाव घेतात. केवळ माझ्यामुळे मराठा आरक्षण अडलं आहे, असं ते म्हणतात. त्यामुळे जर माझ्यामुळे मराठा समाजासाठी एखादा निर्णय घेता येत नाही, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं तर मी केवळ माझ्या पदाचाच राजीनामा देणार नाही, तर राजकीय संन्यासदेखील घेईल," असे ते म्हणाले.
 
ते पुढे म्हणाले की, "ज्याप्रकारे केवळ आणि केवळ मला टार्गेट करण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्यातून यामागची भावना स्पष्ट दिसत आहे. तीन लोकांचं सरकार असताना केवळ एकालाच टार्गेट करण्यात येतंय. महाविकास आघाडी आणि जरांगे हे दोघेही एकालाच टार्गेट करत आहेत. यामागे काय आहे? मराठा आरक्षणासंबंधी घेतलेल्या बैठकीला महाविकास आघाडीचं कोणीच आलं नाही. मग त्यांची भूमिका दुटप्पी नाही का? त्यामुळे जरांगे पाटलांनी आम्हाला नालायक जरूर ठरवावं. पण ते ज्यांना लायक म्हणतात किमान त्यांनी तरी आरक्षणाबाबत त्यांची भूमिका घ्यावी. मात्र, ते घेत नाहीत. जरांगेंनी मविआच्या तिन्ही पक्षांना भूमिका घेण्यास सांगावं," असे आवाहनही त्यांनी केले आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0