मंडपासाठी खोदकाम नको, पालिकेचे मंडळांना निर्दश

05 Sep 2024 18:17:24
bmc on Ganeshotsav

मुंबई :
एकीकडे मुंबई महापालिकेकडून रस्त्यावरील खड्ड्यांमुळे गणेशभक्तांची गैरसोय होऊ नये यासाठी खड्डे बुजवण्याची मोहिम हाती घेण्यात आली आहे. मात्र दुसरीकडे अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून मंडपाचे खांब रोवण्यासाठी खड्डे खोदले जातात. त्यामुळे पालिकेने मंडपासासाठी रस्त्यांवर खड्डे खोदू नयेत, अशी सूचना दिली आहे. तसेच मंडपासाठी खड्डे खोदल्याचे आढळल्यास प्रतिखड्डा दोन हजार रुपयांचा दंड आकारण्यात येणार असल्याचे पालिका प्रशासनाने सांगितले आहे.

पालिकेने नुकतेच गणेशोत्सव माहिती पुस्तिकेचे प्रकाशन केले. त्यामध्ये या सूचना केल्या आहेत. त्यानुसार प्रतिबंधित असलेल्या वस्तुंच्या जाहिराती करण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच मंडपाच्या १०० मीटरच्या परिसरात फक्त जाहिराती करता येणार आहेत. त्याचबरोबर प्राधिकरणाने ठरवलेल्या पातळीनुसार आवाजाची मर्यादा असावी, असे ही पुस्तिकेत स्पष्ट करण्यात आले आहे.

दरम्यान यासंदर्भातील तक्रारींचे निवारण करण्यासाठी प्रत्येक विभागात सहाय्यक आयुक्तांकडून तक्रार निवारण अधिकारी नेमले जाणार आहेत. या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून नागरिकांच्या तक्रारीचे निवारण होईल. तसेच दूरध्वनी किंवा लेखी स्वरुपात ही तक्रार नोंदवता येणार आहे. यासोबतच गणेशोत्सव कालावधीत गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी आराखडा आखून तो आराखडा मंडपाच्या मुख्य प्रवेशद्वारावर लावण्याचे निर्देश पालिकेकडून देण्यात आले आहेत.

Powered By Sangraha 9.0