वराह दर्शन : अवतार महिती आणि कथा

05 Sep 2024 20:54:46

Varah Darshan
 
दुर्जनांचे मर्दन आणि सज्जनांच्या रक्षणासाठी भगवान नारायणांनी दहा अवतार घेतले. त्यांपैकी तिसरा अवतार म्हणजे वराह होय. भगवंताच्या याच अवताराची जयंती भाद्रपद शुद्ध तृतीयेला साजरी केली जाते. वराह अवताराची कथा, वराह अवताराची देशातील मंदिरे, मूर्तींची वैशिष्ट्ये, वराह पुराण अशा विविध माध्यमांतून वराह अवताराचे समग्र दर्शन घडविणारा हा लेख...
यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत।
अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्॥
परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम्।
धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे॥
 
हे भगवद्गीतेतील भगवंताचे वचन सदोदित असेच आणि दिलेल्या वचनाला भगवंत कायमच जागतो, हा भक्तांचा विश्वास. या वचनानुसार भगवान विष्णूने घेतलेल्या तिसर्‍या अवताराचे म्हणजेच वराह अवताराचे स्वरुप, महती आणि कथा आज भाद्रपद शुद्ध तृतीयेच्या अर्थात वराह जयंतीच्या निमित्ताने आपण समजून घेणार आहोत.
 
भगवंताचा कृपाप्रसाद आपल्याला मिळावा, त्याची आपल्यावर अखंड कृपा राहावी म्हणून प्रत्येकजण शक्य होईल तसे, त्या विश्वाचा चालक, मालक असणार्‍या भगवंताचे गुणगान गात असतो. प्रत्येकालाच भगवंताविषयी मनात जे अत्यंतिक प्रेम वाटते, त्यालाच ‘भक्ती’ म्हटले आहे आणि असा या भक्तीचा महिमा विशद करणारा ग्रंथ म्हणजे ‘भागवत’ होय! या भागवतात एक कथा अशी आली आहे की, सनकादिक ऋषी म्हणजे सनक, सनन्दन, सनातन आणि सनत्कुमार अशा चार ऋषींना मिळून सनकादिक ऋषी असे म्हटले जात असे. या चारही ऋषींची उपासना, तपाचरण आणि योग्यता अशी होती की, कोणत्याही देवांच्या दर्शनासाठी येण्याची अनुमती या ऋषींना होती.
 
एकदा भगवान नारायणाच्या दर्शनासाठी वैकुंठभवनात सनकादिक ऋषी गेले असता, भगवंताचे द्वारपाल असणार्‍या जय आणि विजय यांनी सनकादिकांचा मार्ग अवरोध केला आणि त्यांच्याशी तर्क लढवू लागले. परिणामी संतप्त झालेल्या सनकादिक ऋषींनी या दोघांनाही शाप दिला की, ज्या असुरांसारख्या उन्मत्त वृत्तीचे प्रदर्शन तुम्ही केले आहे, त्याच असुरांच्या कुळात तीन जन्म तुम्हाला घ्यावे लागतील. आता ऋषींच्या शापाची निवृत्ती तो शाप भोगल्याशिवाय होणे नाही, हे जाणलेल्या जय, विजय यांनी भगवान नारायणांचा धावा केला आणि या शापातून लवकरात लवकर मुक्त करण्याची विनंती केली. त्यावेळी पतितपावन असणार्‍या नारायणांनी, प्रत्येक अवतारात तुमच्या मुक्तीसाठी अवतार घेण्याचे वचन जय आणि विजय यांना दिले आणि त्याचे पालनही केले.
 
या जय आणि विजय यांनी घेतलेला पहिला जन्म कश्यप ऋषींची दुसरी भार्या दिती यांच्या पोटी झाला. कश्यप ऋषींच्या अदिती या पत्नीची संतती ही सुर, तर दितीपासून झालेली संतती असुर समजली जाते. या दितीपासून पुढे आलेल्या वंशामध्ये हिराण्याक्ष आणि हिरण्यकश्यपु असा जय आणि विजय यांचा पहिला जन्म झाला. यांपैकी हिरण्याक्षाने उग्र तपसाधना करून स्वतःच्या सामर्थ्यात इतकी वाढ केली की, या पृथ्वीचे राज्य त्याने जिंकले. त्यानंतर पृथ्वीचे साम्राज्य हाती आल्याने, उन्मत्त झालेल्या हिराण्याक्षाने अत्याचारांचा कळस गाठायला सुरुवात केली. त्याच्या पापांचा भार इतका वाढला की, त्या पापाचरणाने संपूर्ण पृथ्वी बुडाली. सर्वत्र हिराण्याक्षाच्या पापांचाच प्रसार सुरु होता आणि धर्माचरण करणार्‍यांचा उपमर्द होत होता. अशावेळी पृथ्वीवरील पापाचा भार कमी करून धर्मसंस्थापना करण्यासाठी, भक्तवत्सल श्रीहरी नारायणाच्या दशवतारांपैकी तिसरा अवतार म्हणजेच वराह अवतरित झाला. या अवतारात हिरण्याक्ष दैत्याचा वध करून, पृथ्वीवरती पुन्हा एकदा धर्माची स्थापना केली. या वराह अवतरात भगवंतानी रानडुकराचे रुप धारण केलेले आपल्याला दिसते. रानडुक्कर या प्राण्याचे वैशिष्ट्य म्हणजे, याला दोन मोठे शक्तिशाली सुळे असतात आणि त्याच्या सहकार्याने तो त्याला धोका वाटेल, अशा कशावरही आघात करू शकतो. मात्र, या सगळ्यांपेक्षा महत्त्वाची असते ती रानडुकराची लढाऊ वृत्ती! अतिशय आक्रमक अशी वृत्ती निसर्गतःच रानडुकरापाशी असून, त्याच्यासमोर आव्हान निर्माण करणार्‍या कोणत्याही प्राण्यावर चाल करून, त्याचा पराभव करण्याची हिंमत आणि शक्ती रानडुकराकडे असते. आकाराने लहान असला, तरी प्रचंड ताकद आणि पराक्रम गाजवण्याची धमक हेच या प्राण्याचे वैशिष्ट्य. अशा प्राण्याला त्याच्या या वृत्तीमुळेच दशावतारामध्ये स्थान मिळाले आहे. ज्याच्या दाबाखाली पृथ्वी बुडेल, इतक्या पापराशींचे परिमार्जन करवून न्यायाची, सत्याची, धर्माची स्थापना करणारा भगवंतांचा वराह हा अवतार भाद्रपद महिन्याच्या तृतीया या तिथीला झाला, म्हणून हा दिवस ‘वराह जयंती’ म्हणून साजरा करण्यात येतो.
 
अध्यात्मिक अंगाने या अवताराचा सिद्धांतासाठी उपयोग करायचा झाल्यास, मनुष्यजन्माला आलेल्या प्रत्येक जीवात्म्याला मायेच्या बंधनाने बांधून ठेवलेले आहे. ही माया भगवंताचेच एक रुप आहे आणि आत्मा हा त्या ईश्वराचा अंश आहे. मात्र, मायेची मोहिनी असलेल्या या जीवात्म्याला, त्याचे खरे स्वरुप ओळखता येत नाही. तो मायेच्या या चक्रात अडकून त्रिविध तापांनी पोळला जात असतो. अशा या पोळलेल्या जीवाला योग्य मार्गावर आणणे सहज शक्य आहे, अशा भगवंताची भक्ती इथे अभिप्रेत आहे.
 
भगवान वराहांची रुपे
 
भगवान वराहांची अनेक रुपे प्रसिद्ध आहेत. मात्र, भाद्रपद शुद्ध तृतीयेला ज्या रुपाची पूजा केली जाते, भगवंताच्या त्या वराह रुपाचे वर्णन करताना असे म्हटले आहे की, भव्य आकाराचा देह असणार्‍या वराहाच्या भुजा अतिप्रचंड असून त्याच्या बाहुंचे बल बघताच क्षणी लक्षात येण्यासारखे आहे. भगवान विष्णूंचा हा अवतार चतुर्भुज असून, त्याने भगवान विष्णूंचीच सर्व आयुधे धारण केली आहेत. वराहाच्या मुखावर चंद्रासारखे पांढरे शुभ्र, तरीही तितकेच बलशाली आणि तीक्ष्ण सुळे शोभून दिसतात. याच सुळ्यांच्या मदतीने भगवंतांनी पृथ्वीचा उद्धार केला. पृथ्वीचा उद्धार केल्याने या पृथ्वीच्या संरक्षणावर एकछत्री अधिकार हा भगवान वराह यांचाच आहे.
 
भारताच्या दक्षिणेस असलेल्या प्रसिद्ध अशा श्रीनिवास तिरुपती बालाजी मंदिराचाही या वराह अवताराशी थेट संदर्भ जोडणारी एक आख्यायिका प्रसिद्ध आहे. हिराण्याक्षाचा वध केल्यानंतर भगवान वराह याच भागात एका डोंगरावर वास्तव्यास होते. त्यामुळेच त्या डोंगराचे ‘वराहचलम’ असे नामभिधान द़ृढ झाले. भगवान नारायाणांचा ‘श्रीनिवास व्यकंटेश’ हा अवतारदेखील याच भागातील. ज्यावेळी हा अवतार झाला आणि दोन अवतारांची भेट होण्याचा प्रसंग घडला, त्या भेटीमध्ये तिथेच राहण्यासाठी भगवान बालजी यांनी, वराह यांच्याजवळ राहण्यासाठी काही जमीन मागितली. त्या जमिनीची किंमत देण्याबाबत वराह यांनी विचारले असता, जमिनीच्या बदल्यात काही देण्यास असमर्थता श्रीनिवास यांनी दाखवली. त्यावेळी श्रीनिवास यांनी भविष्यात त्यांच्या दर्शनासाठी येणारी भक्तमंडळी आधी भगवान वराह यांची पूजा करतील, त्यांना नैवेद्य दाखवतील आणि मगच माझे दर्शन घेतील, असे वचन दिले आणि असे न करणार्‍यांना माझ्या दर्शनाचे फळ मिळणार नाही, असेही सांगितले. त्यामुळे आजही तिरुमला येथे व्यंकटेशांचे दर्शन घेण्याआधी वराहस्वामींचे दर्शन घेण्याची परंपरा आहे. तसेच व्यंकटेशांना नैवेद्य दाखवण्याच्या आधी तो वराहस्वामी यांना दाखवण्यात येतो.
 
वराहपूजनाची परंपरा
 
भारतात वराहपूजन हे फार पूर्वीपासून सुरु असून, देशातील विविध भागांत भगवान वराहांची मंदिरेदेखील आढळून येतात. तामिळनाडूमधील श्रीमुष्नम येथे ‘भू- वराहस्वामी’ मंदिरदेखील प्रसिद्ध आहे. कर्नाटकात ‘भू-वराहनाथ’ नावाने भगवान वराहांचे एक प्रसिद्ध मंदिर आहे. तसेच राजस्थान, उत्तर प्रदेश येथील वराहांची मंदिरेदेखील प्रसिद्ध आहेत. मध्य प्रदेशातील खजुराहो येथेदेखील भगवान वराह यांचे मंदिर आहे.
 
भगवान वराह यांच्या मूर्ती विविध रुपात आढळून येतात. त्या साधारणपणे ‘नृवराह’, ‘यज्ञवराह’ आणि ‘प्रलयवराह’ अशा स्वरुपात आढळतात. त्यांपैकी नृवराह मूर्ती ही अर्धमानवी रुपात असते. या मूर्तीमध्ये देह हा मानवाचा असतो, तर मुख हे वराहाचे असते. याला काही ठिकाणी ‘भू-वराह’ तर काही ठिकाणी ‘महावराह’देखील म्हटले जाते. मूर्तिशास्त्रानुसार ‘नृवराह’ याची मूर्ती अलीढ स्थानात असून, यामध्ये डावा पाय स्थिर असतो, तर उजवा पाय थोडासा पुढे असतो.
 
‘यज्ञवराह’ मूर्तीमध्ये संपूर्ण शरीर हे वराहाचेच असते. यामध्ये वराहाच्या पाठीवर असणार्‍या झुलीवर विष्णूंची मूर्ती किंवा दशावतर कोरलेले असतात. तसेच मूर्तीच्या पायाशी शेषनाग असून चारही पायांजवळ शंख, चक्र, गदा आणि पद्म ही विष्णूप्रतिके असतात.
‘प्रलयवराह’ मूर्ती हीसुद्धा अर्धमानवी स्वरुपामध्ये असून दोन पायांपैकी एक पाय हा कासवावर, तर दुसरा पाय शेषनागाच्या डो़क्यावर असतो, तर चार हातांपैकी एक हात कमरेवर असतो, तर एका हातात गदा, एका हातात कमळ दाखवलेले आढळते आणि एका हातात पृथ्वीदेखील असते, तर काही ठिकाणी भूदेवी पायाशी नमस्कार करतनादेखील दिसते.
 
वराह पुराण
 
आपल्याला सर्वसाधारणपणे चार वेद, सहा शास्त्रे आणि १८ पुराणे ही आकडेवारी तोंडपाठ असते. या १८ पैकी वराह पुराण एक आहे. या पुराणातील श्लोकांची एकूण संख्या ही २४ हजार इतकी आहे. आपल्या तिसर्‍या अवतारात, म्हणजेच वराह अवतारात भगवान नारायणांनी भूदेवी पृथ्वीला हे पुराण सांगितले, असे मानले जाते. या पुराणाची सुरुवात वराह आणि पृथ्वी यांच्यातील संवादाने झालेली आहे. यामध्ये त्रेतायुग आणि सत्ययुगाची वर्णने आली आहेत. भगवान विष्णूंच्या वराह अवताराची ही कथा असून, यामध्ये त्याआधीच्या दोन असलेल्या मत्स्य आणि कुर्म अवतारांचा उल्लेखदेखील आढळतो. तसेच यामध्ये शिव आणि शक्तीच्या कथेचादेखील समावेश आहे. पूर्व आणि उत्तर भागांत हे पुराण विभागलेले असून, पूर्व भागात भक्ती कशी करावी, विष्णूपूजेचे महत्त्व, पूजेचा विधी, कीर्तन माहात्म्य, तसेच अनेक तीर्थक्षेत्रांच्या भेटींचे महत्त्व विशद केले आहे. तसेच यामध्ये भगवंताची भक्ती करताना ३२ प्रकारची पातके घडतात, त्यांचे सविस्तर वर्णन करण्यात आले आहे. तसेच अशी पातके कळत अथवा नकळत घडल्यास, त्या पापांचे परिमार्जन कसे करावे, याविषयी मार्गदर्शनदेखील वराह पुराणात आढळून येते. तसेच, यमलोकाचे वर्णनदेखील यामध्ये करण्यात आले आहे, तर उत्तर भागात पुलस्त्य आणि पुरुराज यांच्यातील संवाद असून पुराणाच्या शेवटी फलश्रुती सांगितली आहे.
 
वराहाची ‘वाराही’
 
अद्वैत सिद्धांतानुसार मानवाचे शरीर हे पुरुषतत्वाचे असून त्याच्यात असणारी चेतना म्हणजे स्त्रीशक्ती होय. असे स्त्री आणि पुरुषतत्वाचे द्वैत संपून जोवर अद्वैत प्रवास सुरु आहे, तोवर या कुडीत राम आहे, असे म्हणता येते. देवतांच्या ठायीही अशाच चेतना असतात, ज्या आपल्याला ‘सप्तमातृका’ म्हणून ज्ञात आहेत. ज्यामध्ये महेशाची ‘माहेश्वरी’, विष्णूची ‘वैष्णवी’, नरसिंहाची ‘नारसिंही’ तशीच वराहाची ‘वाराही’ होय!
 
‘दुर्गासप्तशती’मध्ये या सप्तमातृकांचे वर्णन आले असून शुम्भ आणि निशुम्भ या राक्षसांशी लढताना त्यांनी गाजवलेल्या पराक्रमाची कथा त्यात सांगितली आहे. वाराही देवता ही देवी भगवतीच्या सैन्याची सेनापती आहे. १२ महिन्यांची १२ नवरात्र सांगितलेली आहेत. त्यांपैकी गुप्त नवरात्र, शारदीय नवरात्र इत्यादी नवरात्र जवळपास सगळ्यांनाच माहीत असतात. मात्र, वाराही देवतेचे प्राकट्य हे आषाढ शुद्ध पंचमीस झाल्याने, आषाढातील नवरात्रास वाराही नवरात्र म्हटले जाते. वाराही ही देवता उपासना करताना साधकालादेखील साहाय्यभूत होणारी देवता आहे. वराह ही देवतासुद्धा त्याच्या चेतनेनुसार भक्तांच्या रक्षणासाठी तत्काळ धावून जाणारी आहे.
 
अशा या वीर, शत्रूपीडेतून भक्तांची मुक्तता करण्यासाठी वाटेल ते धाडस करणारा, भक्तकाजकल्पद्रुम असणार्‍या अशा या भगवान नारायणांच्या तिसर्‍या अवताराची पूजा, त्यांच्या जयंती निमित्ताने संपूर्ण भारतभर उत्साहात साजरी केली जाते. भक्ताच्या रक्षणासाठी क्षणाचाही विलंब न लावता धावून येणार्‍या भगवान नारायणांना एकदा नारदांनी प्रश्न विचारला की, “भगवंता, आपले नेमके वास्तव्य कुठे असते? वैकुंठात की अन्य कुठे?” त्यावर उत्तर देताना भगवान नारदांना सांगतात,
 
नाहं वसामि वैकुंठे योगिनां हृदये न च।
मद्भक्ता यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारद॥
 
अर्थात, हे नारदा ना मी वैकुंठात असतो, ना योगीजनांच्या हृदयात. जिकडे माझे भक्त माझी भक्ती करतात, त्यांच्याजवळ मी तिष्ठत उभा असतो आणि याचा अनुभव सर्व संतांनीदेखील घेतला. जसा तो अनुभव संतांना मिळाला, तसा तो आपल्यालाही मिळेल, याच वराह जयंतीनिमित्त शुभेच्छा!
(मूर्तिशास्त्र संदर्भ : डॉ. वैभव कीर्ती
चंद्रकांत दातरंगे)
 
लेखक - कौस्तुभ वीरकर 
Powered By Sangraha 9.0