समाज ‘उन्नती’चा वसा!

05 Sep 2024 21:10:54

Mansa
घरातील वारकरी संप्रदायाच्या वारशामुळे लहानपणापासूनच जनसेवेचे संस्कार अंगी बाणलेल्या कुंदाताईंनी ‘उन्नती सोशल फाऊंडेशन’च्या माध्यमातून समाजकार्याचा वसा घेतला आहे. त्यांच्याविषयी...
शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या कुंदाताई भिसे यांना लहानपणापासूनच वारकरी संप्रदायाचा वारसा लाभलेला. त्यामुळे अध्यात्म आणि सेवा असे हातात हात घालून त्यांनी हे संस्कार रूजविताना, गोरगरीब, गरजूंच्या सेवेचे कार्य सुरू केले. संत गाडगे महाराज, संत तुकडोजी महाराज यांच्या शिकवणीनुसार त्यांनी माणसात देव दिसावा, या निर्मळ भावनेपोटी समाजकार्याचा वसा घेतला. ज्या समाजात आपण राहतो, त्या समाजातील गरजूंना मदतीचा हात देऊन, मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ज्या व्यक्ती मनापासून प्रयत्न करतात, त्यांपैकी एक म्हणजे डॉ. कुंदाताई भिसे.
 
पुण्याजवळील पिंपळे-सौदागर येथे आनंदा आणि भानुमती काटे या शेतकरी दाम्पत्याच्या पोटी त्यांचा जन्म झाला. वारकरी संप्रदायाचा वारसा लाभलेल्या कुंदाताईंना लहानपणापासून सांस्कृतिक आणि सामाजिक कार्याची आवड. संगीतामुळे त्यांना काम करण्याची ऊर्जा मिळते, तर समाजकार्यातून आनंदाची अनुभूती घेत त्यांची वाटचाल सुरू आहे. सृदृढ समाज ही आपल्या देशाची एक ओळख असून, त्यादृष्टीने एकूणच समाजोन्नतीसाठी आपल्यापरीने योगदान देण्याच्या उद्देशाने त्यांनी स्वतःला समाजसेवेत झोकून देण्याचा निर्णय घेतला. सुदैवाने या कामी त्यांचे पती संजय भिसे यांचे कुंदाताईंना मोलाचे सहकार्य लाभत आहे.
 
सामाजिक बांधिलकीचे नाते जपण्याचा एक भाग म्हणून कुंदाताईंनी ‘उन्नती सोशल फाऊंडेशन’ नावाची संस्था स्थापन केली. गेल्या पाच ते सहा वर्षांपासून या संस्थेच्या माध्यमातून त्यांचे समाजकार्य प्रामाणिकरित्या सुरु आहे. कुंदाताईंच्या मनातील समाजोन्नतीची तळमळ लक्षात घेऊन, संजयजींनी त्यांना प्रोत्साहन देण्याचे ठरवले. दोघांनी मिळून सहा वर्षांपूर्वी ‘उन्नती सोशल फाऊंडेशन’ ही संस्था स्थापन केली. समाजसेवा क्षेत्रातील कुंदाताईंचे प्रेरणास्थान असलेले डॉ. प्रकाश आमटे यांच्या हस्ते ‘उन्नती’ या संस्थेचे उद्घाटन करण्यात आले. स्व. आ. लक्ष्मण जगताप यांची यावेळी विशेष उपस्थिती होती. पिंपळे-सौदागर आणि लगतच्या परिसरात गेल्या पाच ते सहा वर्षांपासून ‘उन्नती’च्या माध्यमातून विविध सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा, आरोग्य, पर्यावरण यांच्याशी निगडित अनेक उपक्रम या दाम्पत्याने मिळून हाती घेतले.
 
स्वातंत्र्य दिन, तसेच प्रजासत्ताक दिनानिमित्त देशभक्तीचा जागर करणारी सायकल रॅली, देशभक्तीपर गीतगायन स्पर्धा यांव्यतिरिक्त पिंपळे-सौदागर परिसरातील हातावर पोट असणार्‍या लोकांसाठी जागोजागी शुद्ध पिण्याच्या पाण्याची मोफत सुविधा, आसपासच्या सोसायट्यांतील ज्येष्ठ नागरिकांना निवांत बसण्यासाठी बाकडे, वाचण्यासाठी वर्तमानपत्र उपलब्ध करून देणे, शिक्षक दिनानिमित्त परिसरातील शिक्षकांचा सत्कार करणे, आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन, महिला दिनी कर्तृत्ववान महिलांचा सत्कार, वाचनसंस्कृती वाढीस लावण्यासाठी ‘विठाई वाचनालया’ची स्थापना, समाजप्रबोधनाचा एक भाग म्हणून कीर्तन महोत्सव, कलावंतांच्या कलेला प्रोत्साहन देण्यासाठी दिवाळी पहाट, बंधू-भगिनींमधील नाते घट्ट करणारा राखीपौर्णिमेचा सण, दिव्यांगांचा विवाह सोहळा असे अनेक उपक्रम ‘उन्नती’च्या माध्यमातून त्यांनी हाती घेतले आहेत.
 
काळानुसार आवश्यक असणार्‍या गोष्टी उपलब्ध करताना त्यांनी सध्याच्या सर्वत्र भेडसावणार्‍या आणि मानवी आरोग्य आणि जीवनपद्धतीत अडचण ठरू पाहणार्‍या गोष्टींवर कटाक्षाने लक्ष केंद्रित केल्याचे निदर्शनास येते. यासाठी त्यांना आपल्या परिवारातील सदस्य आणि समाजातील हितचिंतकांची मोलाची साथ लाभत असते. आईवडिलांचे संस्कार सार्थकी लावत, त्यांनी मानवी जीवन आणि पंचतत्वांचे महत्त्व लक्षात घेता विविध उपक्रम राबविले. यामध्ये नदी स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, पाणीटंचाईवरील उपाययोजनेचा एक भाग असलेल्या कूपनलिका खोदणे, गणेशोत्सवात इको-फ्रेंडली गणेश उपक्रमांतर्गत दरवर्षी शाडू मातीपासून तयार करण्यात आलेल्या पर्यावरणपूरक हजारो श्री गणेश मूर्तींचे वाटप, पक्ष्यांसाठी अन्न-पाणी पिण्याची व्यवस्था, इलेक्ट्रॉनिक वाहनांसाठी चार्जिंग सेंटर असे अनेक उपक्रम ‘उन्नती’च्या माध्यमातून त्यांनी हाती घेतले आणि यशस्वीपणे पूर्णही केले आहेत. त्यांच्या या कार्याचा गौरव करीत आणि दखल घेत, त्यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. मात्र, जनसेवेचे जे समाधान मिळते, त्यातून लोकांच्या चेहर्‍यावरील आनंद हाच खरा पुरस्कार असल्याचे कुंदाताई प्रांजळपणे कबूल करतात.
 
हे सर्व उपक्रम राबविताना त्यांना काही अडचणींचाही सामना करावा लागला. मात्र, प्रामाणिकपणे काम करण्याचा दृढनिश्चय असल्याने समोर आलेल्या आव्हानांवर मात करीत त्यांची वाटचाल यशस्वीपणे सुरु आहे. समाजकार्यात डॉ. प्रकाश आमटे आणि राजकीय क्षेत्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून कुंदाताई ८० टक्के समाजकारण करीत आहेत. आगामी काळात सत्तेत सहभागी होऊन शासकीय योजना गोरगरिबांपर्यंत पोहोचवणे हे त्यांचे ध्येय आहे. त्यांच्या या कार्याला दै. ‘मुंबई तरुण भारत’तर्फे शुभेच्छा.
 
 
लेखक - अतुल तांदळीकर
 
Powered By Sangraha 9.0