स...सिंगापूरचा, स...सेमीकंडक्टरचा!

05 Sep 2024 21:46:33

India And Singapore Semi Conductor Development
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सिंगापूर दौर्‍यात दोन्ही देशांमध्ये सेमीकंडक्टर क्षेत्राच्या विकासासाठी झालेले करार केवळ उद्योजकीय दृष्टिकोनातून नव्हे, तर राष्ट्रीय सायबर सुरक्षेच्या दृष्टीनेही तितकेच महत्त्वाचे. भारताने अलीकडे सेमीकंडक्टर हब होण्याच्या दिशेने निश्चित पावले उचलली आहेतच. पण, या क्षेत्रात आत्मनिर्भरता प्राप्तीसाठी भारताला आणखीन लांबचा पल्ला गाठायचा आहे.
पक्षीय संबंधांना बळकटी देताना, भारत आणि सिंगापूरने दोन महत्त्वपूर्ण क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करणार्‍या करारांवर नुकतीच स्वाक्षरी केली. या करारांमध्ये सेमीकंडक्टर आणि आरोग्यसेवा क्षेत्राचा समावेश आहे. दोन्ही राष्ट्रांमधील सहकार्य वाढवणे, गुंतवणुकीला, नवकल्पनांना चालना देणे हे या करारांचे उद्दिष्ट. चीनमधील सेमीकंडक्टर उद्योग ‘कोविड’ साथरोगाच्या काळात विस्कळीत झाल्यामुळे त्याचा फटका संपूर्ण जगाला बसला. या पार्श्वभूमीवर हा उद्योग अत्यंत महत्त्वाचा असाच. सेमीकंडक्टर उद्योग हा आधुनिक तंत्रज्ञानाचा आधारस्तंभ, असे म्हटले तरी फारसे चुकीचे ठरणार नाही. स्मार्टफोनपासून अगदी प्रगत संगणकीय प्रणालींपर्यंत सर्वांना तो शक्ती देणारा हा उद्योग. या क्षेत्राचे धोरणात्मक महत्त्व ओळखून, भारत आणि सिंगापूर यांनी सेमीकंडक्टर उत्पादन आणि संशोधनासाठी सहयोग करण्यास वचनबद्धता दर्शवली आहे.
 
सेमीकंडक्टर घटकांचा विकास आणि उत्पादन सुलभ करण्यासाठी भारतीय आणि सिंगापूरच्या कंपन्यांमध्ये संयुक्त उपक्रमांची स्थापना करण्यात आली आहे. या सहकार्यामुळे सिंगापूरच्या प्रगत उत्पादन क्षमतेचा आणि भारताच्या वाढत्या बाजारपेठेचा फायदा एकमेकांना होईल, अशी अपेक्षा. दोन्ही देश सेमीकंडक्टर तंत्रज्ञानातील नाविन्यपूर्णतेला चालना देण्याच्या उद्देशाने संशोधन आणि विकास उपक्रमांमध्ये गुंतवणूक करतील. यामध्ये संशोधन केंद्रे आणि ‘इनोव्हेशन हब’ निर्माण करणे प्रामुख्याने समाविष्ट आहे. ते अत्याधुनिक सेमीकंडक्टर निर्माणासाठी प्रयत्न करतील. साथरोगाच्या कालावधीत, विविध कारणांमुळे जागतिक स्तरावर विस्कळीत झालेल्या सेमीकंडक्टर पुरवठा साखळीची लवचिकता वाढवणे हे या करारांचे उद्दिष्ट
 
अलीकडच्या वर्षांत, आरोग्यसेवा क्षेत्राला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले. या क्षेत्रातील भारत आणि सिंगापूरमधील करार अनेक प्रमुख घटकांवर लक्ष केंद्रित करणारा आहे. दोन्ही देश टेलीमेडिसिन उपक्रमांवर सहकार्य करतील, तसेच आरोग्यसेवा प्रवेश आणि वितरण सुधारण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ घेतील. करारांमध्ये संशोधन, विकास आणि उत्पादन यावर लक्ष केंद्रित करून फार्मास्युटिकल्स आणि बायोटेक्नोलॉजीमधील सहकार्यावर भर दिला आहे. त्याचा उद्देश अत्यावश्यक औषधे आणि लसींचे उत्पादन वाढवणे हा आहे. त्यामुळे भविष्यातील आरोग्य संकटांसाठी दोन्ही देश अधिक चांगल्या प्रकारे तयार होतील. दोन्ही देश सार्वजनिक आरोग्य उपक्रमांवर एकत्र काम करणार आहेत. समान आरोग्यविषयक आव्हानांना तोंड देण्यासाठी हे सहकार्य महत्त्वपूर्ण ठरावे.
 
भारत आणि सिंगापूर यांच्यातील करारांचे दोन्ही देशांसाठी महत्त्वपूर्ण आर्थिक परिणाम अपेक्षित आहेत. सेमीकंडक्टर आणि आरोग्य क्षेत्र लक्षणीय वाढीसाठी सज्ज असून, हे करार देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांकडून गुंतवणूक आकर्षित करणारे आहेत. भांडवलाचा हा वाढता ओघ रोजगार तर निर्माण करेलच, त्याशिवाय दोन्ही राष्ट्रांमध्ये आर्थिक विकासाला चालना देईल, असे निश्चितपणे म्हणता येते. तंत्रज्ञान विकास आणि संशोधन, उत्पादनक्षेत्रातील सहकार्य तंत्रज्ञान हस्तांतरण सुलभ करणारे ठरणार आहे. ज्ञान आणि कौशल्याची देवाणघेवाण विशेषतः भारताच्या सेमीकंडक्टर तसेच आरोग्यसेवेत नवकल्पनांना संधी देणारे ठरेल. भारतीय कंपन्यांना सिंगापूरचे प्रगत तंत्रज्ञान आणि कौशल्ये मिळवता येतील, तर सिंगापूरच्या कंपन्या जगातील सर्वात मोठ्या १४० कोटी लोकसंख्येच्या बाजारपेठेत प्रवेश करू शकतील. हे परस्पर फायदेशीर संबंध आर्थिक विकासाला चालना तर देतीलच त्याशिवाय स्पर्धात्मकता वाढवतील. आशिया-प्रशांत क्षेत्रात वाढलेल्या भौगोलिक-राजकीय तणावाच्या काळात हे करार झाले आहेत, हे महत्त्वाचे. विशेषत: विस्तारवादी चीनला रोखण्यासाठी भारत-सिंगापूर एकत्र येत आहेत. सेमीकंडक्टर आणि आरोग्यसेवा यांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रात परस्पर सहकार्याची भूमिका घेत, ही दोन्ही राष्ट्रे जागतिक पुरवठा साखळीतील प्रमुख खेळाडू म्हणून उदयास येत आहेत.
 
सेमीकंडक्टर क्षेत्र अनेक कारणांसाठी महत्त्वपूर्ण आहे. स्मार्टफोन, संगणक, टॅब्लेट आणि घरगुती उपकरणे यांसह अक्षरशः सर्व इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये सेमीकंडक्टर हा आवश्यक घटक. हा उद्योग आर्थिक वाढीसाठी महत्त्वपूर्ण योगदान देतो. नावीन्याबरोबरच तो रोजगार निर्माण करणारा आहे. तसेच ऑटोमोटिव्ह, दूरसंचार, आरोग्यसेवा आणि ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स यांसह विविध क्षेत्रांना तो समर्थन देतो. कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), मशीन लर्निंग, इंटरनेट ऑफ थिंग्ज (आयओटी), आणि 5जी तंत्रज्ञान यांसारख्या तांत्रिक प्रगतीच्या केंद्रस्थानी सेमीकंडक्टर आहेत. सेमीकंडक्टर पुरवठा साखळी अतिशय क्लिष्ट असून, ती जागतिक स्तरावरची आहे. अनेक देशांमध्ये डिझाईन, उत्पादन आणि वितरण यांचा यात समावेश आहे. यातील व्यत्ययांमुळे विविध उद्योगांवर गंभीर परिणाम होऊ शकतात. म्हणूनच, यात अधिक लवचिकता येणे आणि परस्पर सहकार्याची गरज अधोरेखित होते. राष्ट्रीय सुरक्षेमध्येही सेमीकंडक्टर महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात, कारण त्यांचा वापर संरक्षण प्रणाली, संप्रेषण तंत्रज्ञान आणि सायबर सुरक्षा यांमध्ये केला जातो. जग अधिक टिकाऊ तंत्रज्ञानाकडे वाटचाल करत असताना, ऊर्जा-कार्यक्षम उपकरणे आणि प्रणाली विकसित करण्यासाठी सेमीकंडक्टर अत्यंत महत्त्वाचे असेच आहेत. ते अक्षय ऊर्जा, इलेक्ट्रिक वाहने आणि स्मार्ट ग्रिड तंत्रज्ञानामध्ये प्रगती सक्षम करतात.
 
भारताने आपल्या सेमीकंडक्टर क्षेत्राचा विकास करण्यासाठी अनेक महत्त्वाची पाऊले उचलली आहेत. इलेक्ट्रॉनिक्सवरील राष्ट्रीय धोरण 2019 साली सादर करण्यात आले. त्याचे उद्दिष्ट सेमीकंडक्टरसह भारतातील इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन परिसंस्थेला चालना देणे हेच आहे. हे धोरण गुंतवणुकीला आकर्षित करणे, उत्पादन क्षमता वाढवणे आणि नवकल्पना वाढवणे यावर लक्ष केंद्रित करणारे आहे. केंद्र सरकारने देशांतर्गत उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी योजना सुरू केली आहे. ती देशांतर्गत तसेच विदेशी गुंतवणुकीला प्रोत्साहन देऊन, विशिष्ट उत्पादन लक्ष्य पूर्ण करणार्‍या कंपन्यांना आर्थिक प्रोत्साहन देणारी आहे. तसेच सेमीकंडक्टरच्या उत्पादनाला चालना देण्यात आली आहे. ते संशोधन आणि विकासामध्ये गुंतलेल्या नवोद्योगांसाठी निधी आणि संसाधने प्रदान करणारे आहे. भारत आपली क्षमता वाढवण्यासाठी आघाडीच्या जागतिक सेमीकंडक्टर कंपन्यांसोबत भागीदारी करत आहे.
 
भारताने सेमीकंडक्टर क्षेत्राच्या विकासासाठी अनेक धोरणात्मक कृतींचा विचार केला पाहिजे. यात उत्पादनासाठी अधिक अनुकूल वातावरण तयार करण्यासाठी धोरणे आखण्याची गरज आहे. नियामक प्रक्रिया सुलभ करणे, कर प्रोत्साहन देणे आणि धोरणाच्या दिशेने दीर्घकालीन स्थिरता सुनिश्चित करणे यांचा यात समावेश होईल. पायाभूत सुविधांमधील गुंतवणूक सेमीकंडक्टर फॅब आणि संबंधित उद्योगांच्या स्थापनेला मदत करणारी ठरेल. भारत आपले सेमीकंडक्टर क्षेत्र मजबूत करू शकतो, तसेच त्याची जागतिक स्पर्धात्मकता वाढवू शकतो आणि अर्थव्यवस्थेच्या एकूण वाढीस हातभार लावू शकतो.
 
सेमीकंडक्टर क्षेत्र राष्ट्रीय सुरक्षेसाठी आत्यंतिक महत्त्वपूर्ण आहे, विशेषत: सायबर धोके आणि भू-राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर त्याचे महत्त्व अधोरेखित होते. पॉवर ग्रिड, दळणवळण प्रणाली आणि लष्करी उपकरणांसह, महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधांच्या कार्यासाठी सेमीकंडक्टर अविभाज्य अशा असतात. सेमीकंडक्टर तंत्रज्ञानातील काही तांत्रिकतेचा वापर करत, त्याचा दुरुपयोग होऊ शकतो. सायबर हल्ल्यांची शक्यता बळावते. असे हल्ले अत्यावश्यक सेवांमध्ये व्यत्यय तर आणतातच, त्याशिवाय राष्ट्रीय सुरक्षेशी ते तडजोड करणारे ठरतात. भारताच्या इलेक्ट्रिक ग्रिडला चीनने यापूर्वी लक्ष्य केले होते. म्हणूनच, भारताची स्वतःची पूर्णपणे सुरक्षित आणि विश्वासार्ह सेमीकंडक्टर पुरवठा साखळी उभी राहणे किती गरजेची आहे, हे ठळकपणे सांगणारी आहे. विदेशी स्रोतांवर अवलंबून राहण्यापेक्षा भारतात त्यांचे उत्पादन होणे किती आवश्यक आहे, हे त्यातून स्पष्ट होते.
 
सायबर युद्धाचा समावेश आधुनिक युद्धशास्त्रात होतो, जिथे माहिती आणि तंत्रज्ञान निर्णायक भूमिका बजावतात. सेमीकंडक्टर तंत्रज्ञान सुरक्षित करणे, हे युद्धाच्या या नवीन प्रकारात महत्त्वपूर्ण असेच आहे. जागतिक पुरवठा साखळी विशिष्ट प्रदेशांवर, विशेषतः पूर्व आशियावर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे. तैवान सामुद्रधुनी तणावासारख्या घटना ती विस्कळीत करू शकतात. तंत्रज्ञान क्षेत्रात आज भारत वेगाने भरारी घेत असला, तरी तांत्रिक कौशल्यांच्या बाबतीत अजूनही त्याला बराच मोठा टप्पा गाठायचा आहे. त्यासाठी कौशल्य विकास योजना राबविण्याची गरज आहे. सध्याचे अभ्यासक्रम उद्योगाच्या आजच्या निकषांप्रमाणे विकसित करण्याची आवश्यकता आहे. त्या अनुषंगाने तांत्रिक कौशल्य विकासाला चालना द्यायला हवी. तसे झाले तरच, भारत सेमीकंडक्टर हब म्हणून विकसित होईल आणि राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्नही उद्भवणार नाही. म्हणूनच, भारताने या क्षेत्रात ‘आत्मनिर्भर’ होणे अत्यंत आवश्यक आहे.
Powered By Sangraha 9.0