हरितालिका हा मूळ संस्कृत शब्द. या शब्दाची फोड केल्यास हरित आणि अलिका असे दोन वेगळे शब्द मिळतात. हर म्हणजे हरण करणे, घेऊन जाणे. 'हरिता' म्हणजे 'जिला नेले ती' आणि 'लिका' म्हणजे 'सखी'. पार्वतीला शिवप्राप्तीसाठी तिची सखी तपश्चर्येसाठी अरण्यात घेऊन गेली म्हणून पार्वतीला 'हरितालिका' असे म्हणतात.
हरितालिका तृतीयेची कहाणी
हरितालिका कथा ही भविष्य पुराणातील हरगौरीसंवादात आली आहे. हरितालिकेच्या कथेनुसार, पूर्वकाळात पार्वती हिने पर्वत राजा हिमालय याची कन्या 'शैलपुत्री' म्हणून जन्म घेतला. लहान असताना तिने महादेवांशी विवाह करण्याची इच्छा आपल्या वडिलांकडे बोलून दाखवली होती. जेव्हा ती उपवर झाली तेव्हा हिमालयाने नारदमुनींच्या सल्ल्याने तिचा विवाह भगवान विष्णूंसोबत करण्याचे ठरवले. परंतु पार्वतीने मनोमन महादेवांना पती म्हणून वरले होते. पण ती हे असे प्रत्यक्ष आपल्या पित्याला सांगण्याचे धाडस करू शकली नाही. अशावेळी तिने सखीकडून आपल्या वडिलांना निरोप पाठवला, "तुम्ही जर माझी लग्नगाठ विष्णूंशी बांधली तर मी प्राणत्याग करेन," इतक्यावरच न थांबता ती सखीच्या मदतीने घरातून पळून गेली व शिवप्राप्ती व्हावी म्हणून एका अरण्यात जाऊन शिवलिंगाची पूजा करण्यास आरंभ केला. या पूजेच्या दिवशी भाद्रपद मासातील तृतीया तिथी होती व हस्त नक्षत्र होते. पार्वतीने मनोभावे शिवलिंगाची पूजा केली आणि दिवसभर कडक उपवास करून जागरण केले. तिच्या या कठोर तपाने शिव प्रसन्न झाले आणि त्यांनी पार्वतीच्या विनंतीला मान देऊन सहचारिणी म्हणून तिचा स्वीकार केला अशी आख्यायिका आहे.
हरितालिका व्रताचे महत्त्व
हरितालिका हे हिंदू धर्मातील महिलांसाठी आणि कुमारीकांसाठी सांगितलेले एक धार्मिक व्रत आहे. पतीविषयी असणारी आपली सद्भावना व प्रेम व्यक्त करण्यासाठी तसेच इच्छित पती मिळावा यासाठी हरितालिकेच्या व्रताचे पालन करण्यात येते. इच्छित किंवा शिवशंकरासारखा वर मिळावा म्हणून विवाह इच्छुक मुलीही हरितालिकेचे व्रत करतात. या दिवशी उपवास करून पार्वती आणि तिची सखी यांच्या मातीच्या मूर्तींसोबतच शिवलिंगाचीही पूजा केली जाते. व्रतात आठ प्रहर उपवास केल्यानंतर अन्नसेवन करण्यात येते. या व्रतामुळे जीवनात येणारी सुखसमृद्धी लाभण्यासाठी व्रताचे विधिपूर्वक पालन करण्यास सांगण्यात येते.
हरितालिका हे व्रत भारतभर केले जाते. उत्तर भारताच्या बहुतांश भागात जसे की बिहार, झारखंड, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, उत्तराखंड, सिक्कीम आणि राजस्थानमध्ये हे व्रत केले जाते. दक्षिण भारतात अनेक ब्राह्मण कुमारीका हे व्रत करतात. तमिळनाडूमध्ये माघ शुद्ध द्वितीयेपासून तीन दिवस गौरी उत्सव चालतो. तेथे कुमारीका आणि सौभाग्यवती स्त्रियांही हे व्रत करतात. तसेच ही हरितालिका तृतीया नेपाळच्या टेकडी प्रदेशातदेखील उत्साहात साजरी केली जाते.