जळगाव : मंत्री गिरीष महाजनांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी तत्कालिन पोलिस अधिक्षकांवर दबाव आणल्यामुळे अनिल देशमुखांवर सीबीआयकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर आता गिरीष महाजनांनी अनिल देशमुखांबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. ते टीव्ही ९ मराठीशी बोलत होते.
गिरीष महाजन म्हणाले की, "अनिल देशमुखांनी आणि त्यांच्या नेत्यांनी कटकारस्थान करून माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केला ही गोष्ट सत्य आहे. त्यावेळचे तत्कालिन पोलिस अधिक्षक प्रविण मुंढे हे गुन्हा दाखल करत नव्हते. मी असा खोटा गुन्हा कसा दाखल करू? असं ते म्हणायचे. पुण्यात ३ वर्ष १२ दिवस आधी घटना घडली आणि त्याविरोधात ६०० किलोमीटर लांब असलेल्या जळगाव जिल्ह्यातील निंभोऱ्यात गुन्हा नोंदवा, असं त्यांना सांगण्यात आलं होतं. पण त्यांनी ऐकलं नाही. मात्र, अनिल देशमुखांनी पोलिस अधिक्षकांवर खूप दडपण आणलं आणि त्यांच्याशी खालच्या भाषेत बोलले. त्यांना नोकरीवरून काढून टाकण्याच्या धमक्या दिल्या. त्यानंतर मी अनिल देशमुखांना भेटलो. त्यांनीही मला सांगितलं की, मी हतबल आहे. माझ्यावर आमच्या वरिष्ठ नेत्यांचं दडपण आहे. ते मला म्हणाले की, माझ्यावर खूप मोठं दडपण आहे. याबाबतीत तुम्ही शरद पवार साहेबांना भेटा. तरच मी तुमची मदत करू शकेन," असा मोठा गौप्यस्फोट महाजनांनी केला आहे.
हे वाचलंत का? - अनिल देशमुखांवर सीबीआयकडून गुन्हा दाखल
ते पुढे म्हणाले की, "त्यावेळी अनिल देशमुखांनी मला शरद पवार आणि एकनाथ खडसेंचं नाव सांगितलं. खडसे वारंवार पवार साहेबांकडे जाऊन बसतात आणि माझ्यावर त्यांचं दडपण आहे, असं त्यांनी मला सांगितलं. अनिल देशमुखांनी मला सांगितलं की, मी हतबल आहे. माझ्यासमोर बसवून त्यांना हे विचारा," असेही ते म्हणाले.