मुंबई, दि.४ : प्रतिनिधी : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर सीबीआयकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंत्री गिरीश महाजन यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी जळगावच्या तत्कालीन पोलीस अधीक्षकावर दबाव टाकल्याचा आरोपात त्यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच अनिल देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर आगपाखड केली आहे. कारण तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अनिल देशमुख यांच्या विरोधात पुरावे असणारा एक पेनड्राइव्ह विधानसभेत सादर करत गिरीश महाजन यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या खोट्या गुन्ह्याची पोलखोल केली होती.
दरम्यान, महाविकास आघाडीसरकार असताना तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आमदार गिरीश महाजन यांना अटक करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केला होता. विरोधी पक्षनेते असणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी त्यावेळी तत्कालीन एस.पी. प्रवीण मुंडे आणि विशेष सरकारी वकील असणारे प्रवीण चव्हाण यांच्या दोघांतील रेकॉर्डिंगचा एक पेन ड्राईव्ह देखील विधानसभा अध्यक्षांना दिला होता. याच प्रकरणांमध्ये अनिल देशमुख यांच्याविरोधात सीबीआयकडून गुन्हा दाखल करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर येते आहे. हा गुन्हा दाखल होताच अनिल देशमुख यांनी ट्विट करत देवेंद्र फडणवीसांवर आगपाखड केली.
चित्रा वाघ यांचे प्रत्युत्तर
अनिल देशमुखांच्या या ट्विटला भाजप नेत्या चित्र वाघ यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. चित्रा वाघ म्हणाल्या, "१०० कोटींची वसुली मनसुख हिरेनची हत्या, लादेन उर्फ वाझे, हेही तेव्हा तुम्ही तथ्यहिनच म्हणाला होतात ना? राज्यात गुंतवणूक येऊ नये म्हणून उद्योगपतींच्या घरांसमोर स्फोटके पेरण्याचे काम कोण करीत होते? हे विकृत आणि घाणेरडे राजकारण कोण करीत होते? थेट महाराष्ट्राच्या अस्मितेशी गद्दारी कोण करीत होते? पापं करायची आणि काही झाले की आमच्या नेत्याचे नाव घ्यायचे, हा तर आता महाराष्ट्रात पायंडाच पडला आहे. निवडणुकीत दोन हात होऊनच जाऊ द्या, यंदा जनता तुम्हाला घरी बसविल्याशिवाय राहणार नाही…!," असा इशाराच वाघ यांनी अनिल देशमुखांना दिला.