वेदज्ञानाचे श्रवण आणि स्वाध्यायातून ज्ञानार्जन!

04 Sep 2024 20:35:36
vedadnyanache shravan swadhyay


वेदांचे सत्यज्ञान स्वतः अभ्यासावे व ते आपल्यापर्यंत सीमित न ठेवता, इतरांनाही सांगावे. या ईश्वरीय श्रुतिज्ञानाची शिकण्याची व शिकवण्याची आणि ऐकण्याची व ऐकविण्याची परंपरा अखंडितपणे सुरू राहिली, तर निश्चितच सार्‍या जगात वेदज्ञानाचा सुगंध दरवळेल.

मिमीहि श्लोकमास्ये पर्जन्य इव ततन:।
गाय गायत्रमुक्थ्यम्॥
(ऋग्वेद -1/38/14)



अन्वयार्थ

हे ज्ञानी माणसा, तू (आस्ये) आपल्या मुखामध्ये (श्लोकम्) वैदिक ज्ञानाने युक्त पवित्र वेदवाणीला, श्लोकाला, काव्याला (मिमीहि)निर्माण कर आणि त्या पवित्र वाणीला (पर्जन्य इव) ज्याप्रमाणे मेघ हा जलाचा वर्षाव करतो, त्याप्रमाणे हे सत्य ज्ञान (ततन) सर्वत्र पसरव आणि (उक्थ्यम्) गाण्यायोग्य, सांगण्यायोग्य (गायत्रम्) गायत्री छंदयुक्त स्तोत्र रूप वैदिक सूक्तांना (गाय) गा! शिक!! वाच!! आणि इतरांनापण ते शिकव!


विवेचन

आपल्या वैदिक संस्कृतीत श्रेष्ठ ग्रंथांच्या स्वाध्यायाला सर्वाधिक महत्त्व आहे. सद्ग्रंथांच्या वाचनाने ज्ञानवंत होऊन स्वतः आध्यात्मिक आनंदाची अनुभूती घेणे व त्यानुसार जीवनात आचरण करणे, हे श्रेयस्कर मानले जाते. या मूलभूत सत्यज्ञानाला जगात वितरित करणे, हा खर्‍या अर्थाने ज्ञानवंताचा परमधर्म होय. जे काही शिकले आहे, ते इतरांना शिकविणे हेच तर मानवाचे कर्तव्य आहे. त्यासाठीच प्रामुख्याने वैदिक पर्वात श्रावण महिन्याला आगळेवेगळे स्थान आहे.

श्रावणाचा संबंध बाह्यसृष्टी परिवर्तनाबरोबरच मानवाच्या आंतरिक सृष्टीशीदेखील आहे. या महिन्यात मेघवर्षावाने सारी सृष्टी न्हाऊन निघते व हिरवाईमुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण पसरते. जसा पृथ्वीवर जलामृताचा वर्षाव, तसाच मानवांकरिता वेदज्ञानाचा वर्षाव! जे लोक या पवित्र अशा वैदिक ज्ञानापासून वंचित आहेत व नेहमीच अज्ञानरुप अंधःकारात वावरतात, त्यांना सत्यज्ञानाची जाणीव करून देणे. हे विद्वानांचे आद्य कर्तव्य ठरते. म्हणूनच श्रावण महिन्यात वेदादी शास्त्रांच्या श्रवण व श्रावणाची परंपरा अगदीच प्राचीन मानली जाते. याच प्रक्रियेला ‘स्वाध्याय’ असेही म्हणतात.

वरील मंत्रात आपणास सत्यज्ञान ग्रहण करून ते इतरांना वितरित करण्याचा संदेश मिळतो. हा मंत्र स्वाध्याय करण्यासाठी प्रेरणा देतो. ‘स्वाध्याय’ शब्दाचे अनेक अर्थ होतात. त्यांपैकी एक महत्त्वपूर्ण अर्थ म्हणजे श्रेष्ठ ग्रंथांचे अध्ययन! कशाचा स्वाध्याय, तर ईश्वरीय अमृतवाणी वेदांचा! कारण या जगात वेदांशिवाय ज्ञानाचे आगर इतर कोणतेही ग्रंथ होऊ शकत नाहीत. मनुस्मृतीत महर्षी मनू म्हणतात, ‘वेदोऽखिलो धर्ममूलम्!’ म्हणजेच सर्व प्रकारच्या पवित्र कर्मांचे मूळ हेच वेद आहेत. ते पुढे म्हणतात, ‘जे ज्ञानी विद्वान वेदांचे दररोज अध्ययन करीत नाहीत व इतर कामांत आपला अमूल्य वेळ व्यर्थ घालवितात, नको ती कामे करतात व कसेबसे जीवन जगतात, ते सर्व आपल्या कुटुंबासह स्वतःदेखील शूद्रत्वाला प्राप्त होतात.’

महर्षी कपिल म्हणतात, ‘बुद्धिपूर्वा हि वाक्यकृतिर्वेदे!’ म्हणजेच वेदांमधील सर्व मंत्र व रचना या बुद्धिपूर्वक आहेत. त्यात बुद्धिविसंगत असे काहीही नाही. इतकेच काय, तर महर्षी व्यासदेखील म्हणतात, ‘सृष्टीच्या प्रारंभी स्वयंभू परमेश्वराने वेदरुपी दिव्य वाणीचा प्रादुर्भाव केला आहे. ही वाणी अनादी व नित्य असून तिच्याच माध्यमाने जगातील सार्‍या प्रवृत्ती कार्यरत आहेत,’ तर 19व्या शतकातील थोर वेदज्ञ महर्षी दयानंद सरस्वती म्हणतात, ‘वेद हे सर्व विद्यांचे मूळ ग्रंथ आहेत. या वेदज्ञानास शिकणे व शिकविणे आणि ऐकणे व ऐकविणे हे प्रत्येक ज्ञानी माणसाचे परमकर्तव्य आहे.’

वरील मंत्र छोटा असला, तर आम्हा सर्वांना वेदज्ञान आत्मसात करण्यास प्रवर्त करतो व ते इतरांपर्यंत पोहोचविण्यास प्रेरणा देतो. इथे अलंकारिक भाषेत ज्ञानी व विद्वान माणसास संबोधित करताना म्हटले आहे, हे मानवा, तू आपल्या मुखामध्ये श्लोक निर्माण करून तो धारण कर! श्लोक म्हणजे सामान्य श्लोक नव्हे, तर तो वेदमंत्रच आहे. कारण व्याकरण शास्त्रात श्लोक या भ्वादी गणातील धातूचा अर्थ प्रशंसा करणे, पद्यरचना करणे, ज्ञानाला छंदात मांडणे असे अनेक अर्थ होतात. इथे श्लोक या शब्दाचा लौकिक अर्थ न घेता, वैदिक अर्थ घ्यावयास हवा. श्लोक म्हणजेच ज्ञानयुक्त मंत्र! वेदमंत्र म्हणतो, ‘आस्ये श्लोकम् मिमीहि!’

हे मानवा! आपल्या मुखात वेदज्ञानाने युक्त अशी सत्यवाणी निर्माण कर. म्हणजेच विद्याभ्यास करून आपल्या जिभेच्या अग्रभागावर वेदज्ञानाच्या रसाने युक्त श्लोक (मंत्र, स्तोत्र) उत्पन्न कर.

आपल्या मुखी ज्ञान साठविण्याकरिता तितक्याच प्रमाणात उत्तमोत्तम सद्ग्रंथांच्या वाचनाची गरज असते. ज्ञानसाधना केली तरच ज्ञान वाढते. या ज्ञानार्जन प्रक्रियेलाच ‘स्वाध्याय’ असे म्हणतात. वैदिक शास्त्रांचे श्रवण व श्रावण म्हणजेच ऐकणे व ऐकविणे हा स्वाध्यायाचाच एक भाग! याच कारणामुळे 12 महिन्यांतील श्रावण महिना अतिशय मोलाचा! याच श्रावणाशी वेदमंत्राचे नाते जडले आहे. प्रत्येकाने वेदादी शास्त्रांचे अध्ययन करणे हे आपल्या जीवनाबरोबरच समाजाच्या कल्याणासाठीदेखील अत्यंत मोलाचे ठरते. शतपथ ब्राह्मणग्रंथात म्हटले आहे, स्वाध्याय करणारा मानव सुखाने झोपतो व त्याचे मनदेखील स्थिर राहते. स्वाध्यायशील व्यक्ती ही खूपच चिकित्सक असते. त्याच्यात इंद्रियांचा संयम होतो व एकाग्रता वाढीस लागते आणि प्रज्ञा म्हणजे बुद्धीदेखील प्रतिभाशील बनते.

विचारवंत ज्ञानी माणसाने प्रखर स्वाध्यायाच्या बळावर आपल्या मुखामध्ये विविध प्रकारच्या ज्ञान-विज्ञानाने परिपूर्ण अशी वाणी निर्माण करावी. पण त्यानंतर त्याने शांत बसू नये. ते ज्ञान आपल्यापर्यंत मर्यादित न ठेवता, प्राप्त ज्ञानास इतरांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करावा. संतांनीदेखील म्हटले आहे,

जे जे आपणांसी ठावे,
ते ते इतरांशी सांगावे!
शहाणे करून सोडावे
सकळ जन!!
यासाठीच मंत्राचा मध्यवर्ती आशय आहे,
 
पर्जन्य इव ततन:!
आकाशात मेघ दाटून आले की, ते जोमाने संपूर्ण धरणीवर बरसतात, त्याप्रमाणे ज्ञानी माणसाने आपल्याकडे जे काही ज्ञान आहे, त्याची तीव्र वेगाने सर्वांवर वृष्टी करावी! या वसुंधरेवर मेघांचा जितक्या जोमाने वर्षाव होतो, तितकाच आनंद या सृष्टीतील असंख्य जीवांना होतो. जर विद्वान व ज्ञानी मंडळींनी आपल्या मुखातून ज्ञानामृताचा वर्षाव केला, तर प्रजा खूप सुखावेल. कारण, जनतेला भौतिक धनवैभवापेक्षा अत्यधिक आनंद हा शाश्वत विचार व ज्ञानानेच होत असतो. जिथे ज्ञानाची पराकाष्ठा असते, तेथे शाश्वत आनंदाची मांदियाळी लाभते. कारण, या विश्वात ज्ञानासारखी पवित्र व श्रेष्ठ अशी कोणतीच गोष्ट नाही. म्हणूनच तर योगेश्वर श्रीकृष्णांनीदेखील गीतेत एक म्हटले आहे,


न हि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते!
याच पवित्र ज्ञानाच्या आधारे माणूस हा श्रेष्ठ मानव म्हणून देवत्वाकडे वळतो. दान देण्यासारख्या बर्‍याच गोष्टी असल्या, तरी ज्ञानाचे दान हे सर्वात मोठे मानले आहे. शास्त्रांनी सांगितले आहे, ‘सर्वदानेषु ब्रह्मदानं विशिष्यते!’ म्हणजेच सर्वदानामध्ये ब्रह्मदान अर्थात ज्ञानदान सर्वश्रेष्ठ आहे. त्याबरोबरच कोणते ज्ञान श्रेष्ठ आहे? तर वेदज्ञान हेच सर्वोत्तम मानले जाते. याच वैदिक ज्ञानाच्या वितरणाने सारे जग सर्वार्थाने सुखी व समृद्ध होऊ शकते. वेदांचा महिमा प्रारंभीच वर्णिला आहे.

मंत्राच्या उत्तरार्धात भगवंताचा संदेश मिळतो, ‘उक्थ्यम् गायत्रं गाय!’ जे काही सांगण्याजोगे असते, त्याला ‘उक्थ्यम्’ म्हणतात. या जगात बर्‍याच ज्ञानतत्वांचे प्रसारण होत आहे. एतद्देशीय असोत की विदेशी, त्यांच्या धर्मग्रंथात प्रतिपादित केलेले विचार हेच तरणोपाय आहेत व त्यांचेच ज्ञानग्रंथ श्रेष्ठ आहेत, असे सांगण्याचा त्यांचा अट्टहास असतो. आपल्या विचारांच्या प्रचारासाठी ते रात्रंदिवस प्रयत्नशीलदेखील असतात. त्यांच्या दृष्टीने या जगाला सुख व शांतता ही केवळ त्यांच्या आद्य प्रवर्तकांनी सांगितलेल्या विचारांनीच लाभू शकते. पण, निसर्गचक्राचे विज्ञान व आधुनिक नवतंत्रज्ञान यांच्याशी त्यांचा ताळमेळ बसत नाही. पण, वेदांचे विशुद्ध तत्वज्ञान हे मात्र खर्‍या अर्थाने विज्ञानाधिष्ठित आहे. तर्काच्या कसोटीवर घासून वेदविचार समग्र विश्वासाठी कल्याणकारी व जगण्यासाठी नवसंजीवनी आहेत. म्हणूनच ही ज्ञानविद्या उत्तम प्रकारे प्रतिपादन करण्यायोग्य आहे. असे हे सुयोग्य ज्ञान छंदोबद्ध रितीने विविध मंत्रांतून व सुक्तांतून अभिव्यक्त होते.

इथे गायत्री छंदाचा उल्लेख केला आहे. नानाविध मंत्र हे विविध छंदांतून प्रकट होतात. इथे प्रातिनिधिक स्वरूपात गायत्री छंदाचे प्रतिपादन केले आहे. प्रत्येक छंदात निश्चित अक्षरे व वेगवेगळ्या मात्रा असतात. त्यामुळे वेदपाठ करण्याची पद्धतसुद्धा वेगवेगळी असते. याच कारणामुळे वेदमंत्रात कोणासही बदल करता येत नाही अथवा त्यात मनगढंत असे कपोलकल्पित मिसळता येत नाही.

म्हणूनच तर वेदमंत्र हे आजपर्यंत जशास तसे आहेत. त्यात कोणासही प्रक्षेपण करता आले नाहीत. व्याकरण, छंद, निरुक्त इत्यादी वैदिक अंगभूत ग्रंथांमुळे वेदमंत्रांचे रक्षण झाले आहे. मंत्रात आदेश मिळतो की, वैदिक पंडितांनी गायत्रीसह इतर छंदांनी युक्त स्तोत्ररूप वैदिक सूक्तांचे गायन करावे. यामुळे एकतर वेदांचे रक्षण होते आणि त्यामुळे वेदांचा यथावत उपदेशदेखील सामान्य लोकांना प्राप्त होतो. याच उपदेशाने त्यांचे जीवन समृद्ध होऊन जीवन सफल ठरते. वेदमंत्रांचे अर्थ कठीण भासत असतील, तर मंत्रांच्या भावार्थावर प्रकाश टाकणारे विवेचनपर ग्रंथ तरी अवश्य अभ्यासावे. जेणेकरून वेदज्ञानाचा सत्य आशय कळण्यास मदत होईल. वेदांचे सत्यज्ञान स्वतः अभ्यासावे व ते आपल्यापर्यंत सीमित न ठेवता, इतरांनाही सांगावे. या ईश्वरीय श्रुतिज्ञानाची शिकण्याची व शिकवण्याची आणि ऐकण्याची व ऐकविण्याची परंपरा अखंडितपणे सुरू राहिली, तर निश्चितच सार्‍या जगात वेदज्ञानाचा सुगंध दरवळेल आणि जगातील नानाविध सामाजिक, राष्ट्रीय व वैश्विक समस्यांचे निराकरण होईल!

प्रा. डॉ. नयनकुमार आचार्य
9420330178
Powered By Sangraha 9.0