शिक्षक दिन विशेष

04 Sep 2024 22:52:49
teachers day special

 
दि. 5 सप्टेंबर हा भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस देशभरात शिक्षक दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. त्यानिमित्ताने शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावून, विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करणार्‍या नाशिकमधील शिक्षकांचे हे मनोगत...


पिंपळगाव बसवंत-उत्तर महाराष्ट्रातील प्रमुख शिक्षणाचे केंद्र

दि. 16 मार्च, 1980 साली माझा जन्म परभणीत आणि सर्व शिक्षणही परभणीत झाले. पुढे छत्रपती संभाजीनगर येथे प्राध्यापक म्हणून रुजू झालो. 2009 साली ‘मराठा विद्या प्रसारक’ संस्थेत रुजू झालो. ओझर येथे पहिली नेमणूक झाली. त्यानंतर 2011 साली पिंपळगाव बसवंत येथे बदली झाली. सुरुवातीला प्राध्यापक म्हणून विद्यार्थ्यांना शिकवायला सुरुवात केली. त्यानंतर ‘राष्ट्रीय सेवा योजने’चा प्रमुख म्हणून काम करत असताना महाविद्यालयाला दोन पुरस्कार मिळाले. ‘बसवंत’ नियतकालिकाला ‘उत्कृष्ट नियतकालिका’चा विद्यापीठाचा पुरस्कार मिळाला. तसेच ‘उत्कृष्ट महाविद्यालया’चा पुरस्कारही मिळाला. आम्ही केलेल्या चांगल्या कामाची पावती म्हणून महाराष्ट्र शासनाचा ‘छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले. मी ‘राष्ट्रीय सेवा योजने’चा प्रमुख असताना नारायण टेंभी, शिरवाडे वणी येथे जलसंधारणाची कामे सुरू केली. तसेच वृक्षगणनासुद्धा या गावांमध्ये सुरू केली. यातून त्या परिसरात कोणत्या झाडांची आवश्यकता आहे, याची माहिती मिळाली. शिक्षक दिन किंवा मकर संक्रांतीच्या दिवशी सगळ्या महाविद्यालयाला वाण म्हणून एक झाड देतो. असे हे उत्तर महाराष्ट्रातील शिक्षणाचे प्रमुख केंद्र म्हणून पिंपळगाव बसवंत सध्या नावारूपास आले आहे.
- डॉ. ज्ञानोबा त्र्यंबक ढगे, प्राचार्य, क. का. वाघ महाविद्यालय, पिंपळगाव बसवंत


नोकरीच्या संधी शोधून कठोर मेहनतीची तयारी ठेवावी

माझे मूळ गावं येवला तालुक्यातील जऊळके. तिथे माझे प्राथमिक शिक्षण, तर माध्यमिक शिक्षण जळगाव नेऊर येथे झाले. मी सध्या शिकवत असलेल्या पिंपळगाव बसवंत येथेच बारावीपर्यंत शिक्षण झाले. त्यानंतर मोठे भाऊ नागपूर येथे असल्याने बीएससी आणि एमएससी नागपूर विद्यापीठात झाले. शिक्षण झाल्यानंतर सुरुवातीचे तीन वर्षं जळगाव नेऊर येथे खते आणि बी-बियाण्यांचा व्यवसाय केला. त्यानंतर लक्षात आले की, गावात थांबून काही उपयोग नाही. मग शिक्षक होण्याचा विचार केला. या उद्देशाने आपल्या आयुष्याचा जोडीदारदेखील शिक्षकी पेशातील असावा, या विचाराने शिक्षक असलेल्या मुलीसोबत विवाह केला. त्यानंतर 2007 साली क. का. वाघ महाविद्यालयात रुजू झालो. 13 वर्षं विनाअनुदानित तत्वावर प्राणीशास्त्र साहाय्यक प्राध्यापक म्हणून रानवड येथे काम केले. 2017 साली ‘नेट-सेट’ परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर ‘मविप्र’मध्ये जागा निघाल्यानंतर मी पिंपळगाव बसवंत येथे प्राणीशास्त्र साहाय्यक प्राध्यापक म्हणून दि. 10 जुलै 2019 रोजी रुजू झालो. आज शिक्षक दिनाच्या निमित्ताने सांगावेसे वाटते की, विद्यार्थ्यांनी नोकरीच्या वेगवेगळ्या संधी शोधून त्यासाठी प्रयत्न केले, तर निश्चितच फायदा होईल. मात्र, त्यासाठी कठोर मेहनत घेण्याची तयारी ठेवली पाहिजे.
- प्रा. संपत रामभाऊ खैरनार, प्राणीशास्त्र विभागप्रमुख, क. का. वाघ. महाविद्यालय, पिंपळगाव बसवंत


विद्यार्थ्यांनी देशपातळीवर महाविद्यालयाचे नाव मोठे केले
 
माझे मूळ गाव दिंडोरी तालुक्यातील वलखेड. पिंपळगावच्या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विविध क्रीडा स्पर्धेत नावलौकिक मिळवला आहे. तसेच नौकानयन स्पर्धेत आमच्या महाविद्यालयातील दोन विद्यार्थ्यांनी देश पातळीवर नाव कमावले आहे. तसेच क्रीडा प्रकारात देशाचे नाव उज्ज्वल करणार्‍या खेळाडूंच्या नावाने महाविद्यालयाच्या मैदानावर झाड लावले आहे. यामध्ये लता मंगेशकर, मिल्खा सिंग यांच्या नावाने एक झाड लावले आहे. त्याचप्रमाणे कोरोना काळात ऑलिम्पिक स्पर्धेचे यशस्वी आयोजन केलेल्या जपानचे तत्कालीन पंतप्रधान शिंजो आबे यांच्यामुळे कोरोनाचे संकट एक वर्ष आधी टळले. त्यांच्या नावाने देखील झाड लावण्यात आले आहे. ही माहिती जपान येथील वकिलातीमध्ये सांगितल्यानंतर त्यांनाही आनंद झाला. तसेच मिल्खा सिंग यांच्या मुलाला झाड लावल्याची माहिती मिळाल्यानंतर ते देखील नाशिकमध्ये आल्यानंतर प्रत्येक वेळी भेट देणार असल्याचे सांगितले. तसेच विद्यार्थ्यांनी क्रीडा प्रकारात पुढे जाण्यासाठी महाविद्यालयाकडून प्रोत्साहन दिले जाते. त्यांनी शिक्षणाबरोबरच खेळातदेखील प्राविण्य दाखवले, तर याचा पुढे जाणून निश्चित फायदा होईल. त्याचप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या ‘एक पेड माँ के नाम’ या अभियानांतर्गत मी माझ्या आईच्या नावाने एक झाड लावले आहे.
- प्रा. हेमंत पाटील, शारीरिक शिक्षण विभागप्रमुख, क. का. वाघ महाविद्यालय, पिंपळगाव बसवंत


विद्यार्थ्यांसमोर आदर्श निर्माण करणे गरजेचे
 
माझा जन्म धुळे शहरात दि. 19 फेब्रुवारी 1967 रोजी झाला. तसेच माझे प्राथमिक शिक्षण धुळे शहरात आणि वरिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण धुळे आणि नाशिक येथे झाले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर माझी नेमणूक पिंपळगाव बसवंत येथील महाविद्यालयात झाली. मी 1989 साली महाविद्यालयात रुजू झालो. त्यावेळी उपलब्ध असलेल्या नोकरीच्या संधी ओळखून मी शिक्षकी पेशा स्वीकारण्याचा निर्णय घेतला. सध्याचे महाविद्यालयीन शिक्षण खूप आव्हानात्मक झाले आहे. तंत्रज्ञानात झालेले बदल, विद्यार्थ्यांना उपलब्ध होणारी शैक्षणिक साधने, तसेच महाविद्यालयात उच्च प्रतीचे शिक्षण दिले गेले नाही तर, शैक्षणिक व्यवस्था कुचकामी ठरणारा घटक होऊ शकतो. चांगले शिक्षण दिले गेले, तरच चांगले भवितव्य घडवता येईल. ‘भौतिकशास्त्र’ हा विषय समजण्यासाठी खूप अवघड आहे. 30 वर्षांपूर्वीचा विचार करता, आता नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करुन मुलांना शिकवणे सोपे जाते. ‘राष्ट्रीय शिक्षण धोरण, 2020’ हे खूप चांगले आहे. ते योग्य पद्धतीने राबविले जाणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनी आपले भविष्य चांगल्या पद्धतीने घडवण्यासाठी मेहनत घेणे गरजेचे आहे. आजची स्थिती जर बघितली तर, समोर दिसणारे आदर्श आपण देऊ शकत नाही. समाजाने विचार करण्यासारखी गोष्ट आहे की, आपण जर विद्यार्थ्यांसमोर आदर्श निर्माण करू शकत नसलो, तर चांगली पिढी निर्माण होणार नाही.
- प्रा. नरेंद्र उत्तम पाटील, भौतिकशास्त्र विभाग प्रमुख, क. का. वाघ. महाविद्यालय, पिंपळगाव बसवंत


प्रभावी शिक्षणासाठी शिक्षकांची संख्या वाढवावी लागेल

माझा जन्म दिंडोरी तालुक्यातील गोंडेगाव येथे दि. 2 एप्रिल 1974 साली झाला. माझे पहिली ते चौथीपर्यंतचे शिक्षण मूळ गावीच झाले, तर पाचवी ते सातवीपर्यंतचे शिक्षण मुखेड येथे झाले. त्यानंतर आठवी ते दहावीचे शिक्षण पिंपळगाव बसवंत येथे पूर्ण केले. त्यानंतर अकरावी ते पदवीपर्यंतचे शिक्षण पिंपळगाव बसवंत येथील महाविद्यालयात झाले, तर ‘एमएससी’चे शिक्षण नाशिक येथील बीवायके महाविद्यालयात झाले. 2022 साली मी ‘पीएचडी’ पूर्ण केली. अगदी पहिल्यापासून शिक्षकी पेशाकडे माझा ओढा होता. मात्र, दरम्यानच्या काळात मी सहा वर्षं तलाठी म्हणूनदेखील काम केले. पण, तिकडे मन रमले नाही म्हणून राजीनामा देऊन 2005 साली पुन्हा प्राध्यापक झालो. आज शिक्षक दिनानिमित्त सांगावेसे वाटते की, विद्यार्थ्यांच्या मनात काही संकल्पना असतील, तर त्यांना मूर्त रूप देण्यासाठी मार्गदर्शन करण्यात येते. तसेच महाविद्यालयात मुलाखती घेतल्या जातात. त्यातून त्यांना नोकरीच्या संधी उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न केला जातो. त्याचप्रमाणे नवीन तंत्रज्ञानाची ओळख विद्यार्थ्यांना कशी होईल, यासाठी प्रयत्न केला जातो. सध्याची नवीन शिक्षण पद्धती जुन्या शिक्षण पद्धतीपेक्षा अधिक चांगली आहे. मात्र, या शिक्षण पद्धतीची प्रभावीपणे अंमलबजावणी करायची असेल तर, शिक्षकांची संख्या देखील वाढवावी लागणार आहे.
 - प्रा. डॉ. अरुण मुरलीधर भगरे, रसायनशास्त्र विभाग प्रमुख, क. का. वाघ. महाविद्यालय, पिंपळगाव बसवंत


शिक्षणामध्ये वेगवेगळे प्रयोग व नवनवीन तंत्रज्ञानाची गरज

माझा जन्म दि. 1 जून 1974 सालचा. मी मूळचा संगमनेर तालुक्यातील सिंदोडी गावचा रहिवासी. माझे प्राथमिक शिक्षण गावच्याच शाळेत, तर माध्यमिक शिक्षण वीरभद्र विद्यालयात झाले. पदवीचे शिक्षण संगमनेर येथील महाविद्यालयात झाले. त्यानंतर ‘सेट’ व ‘पीएचडी’चे शिक्षण पुणे विद्यापीठातून पूर्ण केले. घरची आर्थिक परिस्थिती बेताचीच. त्यात आम्ही चौघे भाऊ, इतर तिघे शिकलेच नाही. भावांनी शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले. मला कुस्तीची आवड होती. मात्र, कुस्तीत पोटापाण्याची सोय होणार नसल्याने तो विषय मागे पडला. शिक्षणाशिवाय पर्याय नाही हे लक्षात आले. प्रवाहात आले की, लोकं पण चांगले भेटतात. ‘एमए’चे शिक्षण संगमनेरमध्ये नसल्याने पुणे विद्यापीठात जावे लागले. 1999ला पहिली स्पर्धा परीक्षा दिली. मात्र, दोन वर्ष निकालच लागला नाही. त्यानंतर समोर एकच पर्याय होता. तो म्हणजे शिक्षक होण्याचा, त्यातून खूणगाठ बांधली की, ‘नेट-सेट’ परीक्षा उत्तीर्ण करायची आणि प्राध्यापक व्हायचे. 2003 साली ‘सेट’ परीक्षा उत्तीर्ण झालो. 2004 साली दिंडोरीतील वणी येथे रुजू झालो. मधल्या काळात 17 महिन्यांसाठी सटाणा येथे बदली झाली. पुन्हा वर्षभर वणीला गेलो. त्यानंतर जानेवारी 2024 साली पिंपळगाव बसवंत येथे भूगोल विभागाचा प्रमुख म्हणून रुजू झालो. शिक्षक दिनानिमित्त हेच सांगावेसे वाटते की, आजचा काळ परंपरागत राहिला नसून स्पर्धा खूप वाढली आहे. शिक्षणामध्ये वेगवेगळे प्रयोग करण्याची गरज आहे. नवनवीन तंत्रज्ञान वापरण्याची गरज आहे.
- प्रा. पोपट सावळीराम कुदनर, विभाग प्रमुख, भूगोल विभाग, क. का. वाघ महाविद्यालय, पिंपळगाव बसवंत


(संकलन : विराम गांगुर्डे)
Powered By Sangraha 9.0