स्पॅमिंग करणाऱ्या संस्थांवर 'ट्राय'कडून कारवाईचा बडगा; काळ्या यादीत टाकण्याचे निर्देश

04 Sep 2024 17:42:11
entities-blacklisted-lakh-numbers-disconnected


नवी दिल्ली : 
   देशभरात स्पॅम कॉलच्या संख्येत लक्षणीय वाढ लक्षात घेता केंद्र सरकारकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण(ट्राय)ला प्राप्त झालेल्या तक्रारींवर कार्यवाही करत ५० बिगर नोंदणीकृत टेलिमार्केटियर्स(युटीएम)ना काळ्या यादीत टाकण्यात आले आहे. निर्देशांचे पालन करून अधिक कार्यक्षम टेलिकॉम परिसंस्थेत योगदान द्यावे, असे आवाहन भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने केले आहे.


दरम्यान, वर्ष २०२४ च्या पहिल्या सहामाहीत(जानेवारी ते जून) बिगर नोंदणीकृत टेलिमार्केटियर्स(युटीएम)विरुद्ध ७ लाखांहून अधिक तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत. या तक्रारींना गांभीर्याने घेत ट्रायने दि. १३ ऑगस्ट २०२४ रोजी सर्व सेवा प्रदात्यांसाठी कठोर निर्देश जारी केले होते. त्यानंतर आता एसआयपी, पीआरआय किंवा इतर दूरसंचार संसाधनांचा वापर करून बिगर नोंदणीकृत प्रेषक किंवा टेलीमार्केटरकडून प्रमोशनल व्हॉईस कॉल तात्काळ थांबवावेत असे आदेश देण्यात आले आहेत.

ट्रायच्या कार्यवाहीनुसार संसाधनांचा गैरवापर करताना आढळलेल्या कोणत्याही बिगर नोंदणीकृत टेलिमार्केटियर्स(युटीएम) ला गंभीर परिणामांना सामोरे जावे लागणार आहे. यामध्ये दोन वर्षांपर्यंत सर्व दूरसंचार संसाधने खंडित करणे आणि काळ्या यादीत टाकणे समाविष्ट करण्यात आला आहे. परिणामी, सेवा प्रदात्यांनी स्पॅमिंगसाठी दूरसंचार संसाधनांच्या दुरुपयोगाविरूद्ध कठोर पावले उचलली असून ५० हून अधिक संस्थांना काळ्या यादीत टाकले आहे.





Powered By Sangraha 9.0