नवी दिल्ली, दि. ४ : विशेष प्रतिनिधी : "गुन्हेगारांवर बुलडोझर चालविण्यासाठी इच्छाशक्ती हवी. दंगेखोरांपुढे नतमस्तक होणाऱ्यांना बुलडोझर कारवाई झेपणारी नाही" असा सणसणीत टोला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सपाप्रमुख अखिलेश यादव यांना लगावला आहे.
उत्तर प्रदेशात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी सुरू आहे. सपाप्रमुख अखिलेश यादव यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना लक्ष्य करून २०२७ साली बुलडोझरची दिशा गोरखपूरकडे असेल, असे म्हटले होते. त्यास मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रत्युत्तर दिले. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले, बुलडोझर हे प्रत्येकाला झेपण्यासारखे अजिबात नाही. गुन्हेगारांवर बुलडोझर चालवण्यासाठी बुलडोझरची इच्छाशक्ती लागते. जे दंगलखोरांसमोर नाक घासतात त्यांना बुलडोझर चालवताच येणार नाही. त्यामुळे इच्छाशक्ती नसलेल्यांनी बुलडोझरविषयी बोलू नये, असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला आहे.
उत्तर प्रदेशात काका आणि पुतण्याने युवकांचे भवितव्य उध्वस्त केल्याची टिका मुख्यमंत्र्यांनी केली. ते पुढे म्हणाले,"२०१७ पूर्वी ज्यावेळी नोकरभरती निघत असे; तेव्हा वसुलीसाठी काका आणि पुतण्यामध्ये स्पर्धा होत असे. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये आज नरभक्षक लांडग्यांची जशी दहशत आहे, तसेच वातावरण राज्यात होते. वसुलीसाठी राज्याची विभागणी करण्यात आली होती. सत्ता असताना विकासासाठी त्यांनी काहीही केले नाही. त्यामुळे जनतेने त्यांच्यावर विश्वास ठेवू नये",असेही मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी नमूद केले आहे.