मुंबई : पापं करायची आणि काही झाले की, आमच्या नेत्याचे नाव घ्यायचे हा महाराष्ट्रात पायंडाच पडला आहे, अशी टीका भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवर केली आहे. अनिल देशमुखांवर सीबीआयकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावरून त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांविरोधात ट्विट करत निशाणा साधला. त्यानंतर आता यावर चित्रा वाघ यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले आहे.
चित्रा वाघ म्हणाल्या की, "१०० कोटींची वसुली, मनसुख हिरेनची हत्या, लादेन उर्फ वाझे, हेही तेव्हा तुम्ही तथ्यहिनच म्हणाला होतात ना? राज्यात गुंतवणूकच येऊ नये म्हणून उद्योगपतींच्या घरांसमोर स्फोटके पेरण्याचे काम कोण करीत होते? हे विकृत आणि घाणेरडे राजकारण कोण करीत होते? थेट महाराष्ट्राच्या अस्मितेशी गद्दारी कोण करीत होते," असा सवाल त्यांनी केला.
हे वाचलंत का? - पवारांनी टोचले ठाकरेंचे कान! मुख्यमंत्रीपदाचा चेहऱ्यावरुन केली स्पष्ट भूमिका
त्या पुढे म्हणाल्या की, "पापं करायची आणि काही झाले की, आमच्या नेत्याचे नाव घ्यायचे हा तर आता महाराष्ट्रात पायंडाच पडला आहे. निवडणुकीत दोन हात होऊनच जाऊ द्या. यंदा जनता तुम्हाला घरी बसविल्याशिवाय राहणार नाही," असा सूचक इशाराही चित्रा वाघ यांनी अनिल देशमुखांना दिला आहे.