दुसऱ्या कसोटीत चाहत्यांना टी-२०चा फील; टीम इंडियाने रचला नवा विक्रम

30 Sep 2024 17:53:09
test match ind vs ban


मुंबई :     दोन दिवसांनी पावसाने विश्रांती घेतल्यानंतर कानपूर येथील दुसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने आघाडी घेतली आहे. टीम इंडियाने पहिल्या डावात २८५/९ वर आपला डाव घोषित केला असून ५२ धावांची आघाडी घेतली. त्यानंतर दिवसअखेर बांगलादेशने २ बाद २६ धावा केल्या असून २६ धावांनी पिछाडीवर आहे. या सामन्यात टीम इंडियाने मोठा रेकॉर्ड केला असून कसोटी सामन्यात सर्वात जलद ५० धावा करणाऱ्यांच्या यादीत भारत अव्वल स्थानी आहे.




दरम्यान, कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद ५०आणि १०० धावा करणाऱ्या संघांच्या यादीत अव्वल स्थानावर आहे. दुसऱ्या कसोटीत चौथ्या दिवशी, टीम इंडिया सलामीवीर रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल यांनी कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात वेगवान संघ अर्धशतक करण्याचा विक्रम केला आहे. दि. ३० सप्टेंबर रोजी कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर टीम इंडिया ने अवघ्या १८ चेंडूत संघासाठी ५० धावा केल्या आहेत. विशेष म्हणजे हसन महमूदविरुद्ध आलेल्या पहिल्याच षटकात यशस्वी जैस्वालने सलग तीन चौकार मारून भारताच्या डावाची सुरुवात केली. यानंतर रोहित शर्माने दुसऱ्या षटकात सलग दोन षटकार मारत संघाच्या धावसंख्येत भर घातली.

या शानदार कामगिरीसह टीम इंडियाने जुलै २०२४ मध्ये ट्रेंट ब्रिज येथे वेस्ट इंडिजविरुद्ध २६ चेंडूत सर्वात जलद अर्धशतक झळकावणाऱ्या इंग्लंडचा विक्रम मोडला आहे. सलामीवीर रोहित शर्माने अवघ्या ६ चेंडूत १९ धावा केल्या तर यशस्वी जयस्वालने १३ चेंडूत ३० धावा करत संघाला वेगवान सुरुवात करून दिली. मात्र, चौथ्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर रोहित मेहदी हसन मिराझच्या गोलंदाजीवर बोल्ड झाला. रोहित बाद झाल्यानंतरही भारताचा आक्रमक पवित्रा कायम होता. शुभमन गिल यशस्वी जयस्वालसोबत दोघांनी मिळून ७७ धावांची भागीदारी केली. यादरम्यान दोघांनी अवघ्या ४३ चेंडूत भारताची धावसंख्या १०० धावांपर्यंत नेत आणखी एक विक्रम रचला.




Powered By Sangraha 9.0