मानव-अस्वल संघर्षाची नांदी

30 Sep 2024 21:38:11
south california man-bear conflict
 

अमेरिकेच्या दक्षिण कॅलिफोर्नियात मानव-अस्वल यांच्यातील परस्पर संघर्ष वाढताना दिसतो. सिएरा माद्रेसारख्या शहरांमध्ये अस्वले अंगणात, रस्त्यावर आणि घरांजवळ आढळून आली आहेत. जंगल आणि नैसर्गिक भागांजवळ माणसाने वस्ती विस्तारल्यामुळे संघर्षाची ही वेळ ओढवली आहे. हिवाळा जवळ येत असल्याने अस्वल अन्न, पाणी आणि निवार्‍याच्या शोधात मानवी वस्तीत प्रवेश करतात. ‘लॉस एंजेलिस नॅशनल फॉरेस्ट’च्या काठावर असलेल्या सिएरा माद्रे, अल्ताडेना आणि मोनरोव्हिया यांसारख्या परिसरात अस्वलांचे दर्शन अलीकडे वाढले आहे.

तेथील नागरिकांनी जंगलाच्या जवळ घरे बांधल्यामुळे अस्वलांच्या उपस्थितीचे प्रमाणही वाढलेले दिसते. हिवाळ्याची तयारी म्हणून चरबी साठवण्यासाठी अस्वल शक्य तितक्या अन्नाच्या शोधात असतात. सिएरा माद्रेसारख्या शहरांमध्ये कचरापेट्या, फळझाडे आणि पाळीव प्राण्यांचे अन्न अस्वलांना आकर्षित करते. रहिवाशांनी अस्वलांना कचरापेट्या उकरताना, चक्क अंगणात बिनदिक्कतपणे फिरतानाही पाहिले आहे. या अस्वलाने कोणतेही नुकसान केलेले नाही. पण, यावरुन हे स्पष्ट होते की, अस्वल मानवी जागेत किती सहजपणे वावरू शकते.

स्थानिक सरकारी अधिकारी अस्वलांचा मानवी वस्तीत वावर कमी करण्यासाठी उपाययोजना करत आहेत. सिएरा माद्रेमध्ये अस्वल-प्रतिरोधक कचरापेट्या उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत, ज्यामुळे अस्वलांना कचर्‍यातून अन्न शोधणे अवघड होते. मात्र, या उपायांनी अस्वलांचा प्रादुर्भाव कमी होईल की नाही, याबाबत शंका आहे.

दुसरीकडे कॅलिफोर्नियातील काळ्या अस्वलांची संख्यादेखील गेल्या काही वर्षांत वाढली आहे. 1980च्या दशकात राज्यात दहा ते 15 हजार अस्वले होती, तर 2024 सालापर्यंत ही संख्या 25 ते 30 हजारांपर्यंत पोहोचली आहे. लोकसंख्या वाढल्यामुळे आणि जंगलाजवळील वस्त्यांच्या विस्तारामुळे अस्वलांचे दर्शन वाढले आहे. उदाहरणार्थ, लॉस एंजेलिस काऊंटीमध्ये अस्वल आढळून येण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. 2017 साली फक्त 28 अस्वलांच्या दर्शनाची नोंद झाली होती. परंतु, 2024 मध्ये हा आकडा 455 वर पोहोचला आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, मानवच निसर्गात घुसखोरी करीत असल्यामुळे अस्वलांसह इतर वन्यजीवदेखील मानवी वस्तीत दिसू लागले आहेत.

वन्यजीव अधिकार्‍यांनी स्पष्ट केले की, मानव जंगलाच्या जवळ घरे बांधत असल्याने, ते या प्राण्यांच्या नैसर्गिक अधिवासात शिरत आहेत. अस्वल मानवी उपस्थितीशी जुळवून घेत असल्यामुळे, त्यांचा मानवी वस्तीत वारंवार प्रवेश होत आहे. एकदा अस्वलांना अन्नाचा किंवा निवार्‍याचे ठिकाण सापडले की, ते वारंवार तिथे येतात. कचर्‍याचे डबे, कारचे दरवाजे आणि घराचे दरवाजे उघडण्याची कला त्यांना लवकर अवगत होते. त्यांची घ्राणेंद्रिये ‘ब्लडहाऊंड’च्या तुलनेत सातपट अधिक कार्यक्षम असतात, त्यामुळे त्यांना दूर अंतरावरुनही अन्नाचा शोध घेणे सोपे जाते.

अस्वलांचा सामना झाल्यास शांत राहणे महत्त्वाचे आहे. पळून जाणे अस्वलाच्या पाठलाग करण्याच्या नैसर्गिक प्रवृत्तीला चालना देऊ शकते, म्हणून हळूहळू मागे हटणे उचित ठरते. अस्वल सामान्यतः आक्रमक नसतात, पण त्यांना धोका वाटल्यास ते हल्ला करू शकतात. तथापि, काळ्या अस्वलांचा मानवांवर हल्ला होणे अत्यंत दुर्मिळ आहे. सिएरा माद्रेच्या रहिवाशांनी अस्वलांच्या अनेक घटनांचा सामना केला आहे. एका कुटुंबाने त्यांच्या घरात येणार्‍या अस्वलाला दोन आठवडे सहन केले होते. अस्वलाने त्यांच्या घराच्या मोकळ्या जागेत आश्रयच घेतला होता. वन्यजीव अधिकार्‍यांच्या मदतीने कुटुंबाने अस्वल-प्रतिरोधक मेटल स्क्रीन वापरून क्रॉल स्पेस बंद केले.

स्थानिक अधिकारी नागरिकांना अस्वलांच्या उपस्थितीशी कसे जुळवून घ्यावे, याविषयी सूचना देत आहेत. दरवाजे-खिडक्या व्यवस्थित बंद ठेवणे, उघड्यावर अन्न ठेवण्याचे टाळणे यासारखे उपाय नागरिकांना सूचित करण्यात आले आहेत. स्थानिक अधिकार्‍यांनी हेही नमूद केले आहे की कोयोट, हरीण आणि पर्वतीय सिंह यांसारखे इतर वन्यजीवही परिसरात दिसतात. पण, अस्वलांच्या वाढलेल्या संख्येमुळे त्यांचे दर्शन अधिक होत आहे. कॅलिफोर्नियात अस्वलांची लोकसंख्या वाढत असल्याने मानव आणि वन्यजीव यांच्यातील नात्याचे व्यवस्थापन करणे आवश्यक ठरणार आहे.




Powered By Sangraha 9.0