कदमांची कदमताल

30 Sep 2024 21:35:03
former mla anil kadam statement

 
आगामी विधानसभेसाठी उमेदवारी मिळविण्यासाठी सर्वपक्षीय इच्छुक झाडून तयारीला लागले आहेत. काहींचा दुसर्‍या पक्षांचा कानोसा घेऊन झाला, तर काही ऐनवेळी उडी मारण्याच्या तयारीत आहेत. पण, निफाडचे माजी आमदार अनिल कदम यांचा विषयच वेगळा. उद्धव ठाकरे यांच्यावर निष्ठा दाखवताना ते थकत नाहीत. पक्ष सांगेल तो आदेश म्हणत, कधी शरद पवारांशेजारी जाऊन बसतात, हे त्यांच्या दुसर्‍या हातालाही कळू देत नाहीत. एकीकडे स्वतःला ‘मातोश्रीचे पाईक’ म्हणत असले तरी, हळूच शरद पवारांबरोबर हवाई सफर करून येतात. त्यात निफाडचे विद्यमान आमदार दिलीप बनकर उपमुख्यमंत्री अजित पवारांबरोबर असल्याने ‘मातोश्री’ ते ‘सिल्व्हर ओक’ अशी त्यांची कदमताल नेहमीच सुरू असते. हा मतदारसंघ अनिल कदम यांचे चुलते रावसाहेब यांनी काँग्रेसच्या ताब्यातून हिसकावून घेत युतीचा झेंडा रोवला. सलग तीन वेळा आमदार राहिलेले मालोजी मोगल यांचा रावसाहेब कदम यांनी पराभव केला. परंतु, रावसाहेबांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या पत्नी मंदाकिनी कदम यांनी विधानसभेत बाजी मारली. पण, 2004 सालच्या निवडणुकीत मंदाकिनी कदम यांचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिलीप बनकर यांनी पराभव केला. 2009 साली जनतेने उलटे फासे टाकत शिवसेनेने उमेदवारी दिलेल्या अनिल कदम यांना निवडून दिले. निफाडच्या जनतेच्या बळावर ते दहा वर्षे आमदार म्हणून राहिले. पण, विकासाची वाट पाहून थकलेल्या निफाडकरांनी अनिल कदम यांना पाच वर्षांसाठी आराम करायला सांगत, पुन्हा दिलीप बनकर यांना निवडून दिले. आता बनकर अजित पवारांसोबत गेल्याने आयती संधी साधत पुन्हा आमदार होण्यासाठी अनिल कदम कदमताल करता आहेत. यासाठी त्यांचा एक पाय उबाठा गटात, तर दुसरा पाय शरद पवार गटात दिसून येतो. निफाडच्या जागेवर शरद पवार गटाने हक्क सांगितला आहे. पण, उबाठा गटाला ही जागा मिळावी यासाठी कदमांचा आटापिटा सुरू असून, दोन्ही गटांना ते खूश करत आहेत. लोकसभेला शरद पवारांचा उमेदवार असूनही घरचे कार्य असल्यासारखे कदम तोंडाला फेस येईपर्यंत पळत होते. आपली निष्ठा ते ठाकरे आणि पवार यांच्यापैकी कोणाच्या पायाशी वाहता आहेत हे जनतेला मात्र समजलेच नाही. त्यामुळे ठाकरेंचे की पवारांचे, कदम नेमके कोणाचे? हा प्रश्न निफाडकरांना पडला नसेल तर नवलच.

विकासाची गंगा


गत मनपा निवडणुकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकला दत्तक घेत नाशिकचा विकास केल्याशिवाय राहणार नाही, अशी भावनिक साद नाशिककरांना घातली. फडणवीस यांच्यावर विश्वास ठेवत नाशिककरांनी मनपात भाजपची सत्ता आणली. त्यानंतर विकास वेगाने होत असून, शहराचा चेहरामोहरा बदलू लागला. फडणवीसांवर विश्वास ठेवत, 2019 साली शहरातून तीन आमदार निवडून देत नाशिककरांनी फडणवीस यांचे हात बळकट केले. पुन्हा फडणवीस मुख्यमंत्री होऊन नाशिकचा कायापालट होईल, असे वाटत असताना उद्धव ठाकरे दगाबाजी करून मविआत जाऊन मुख्यमंत्री झाले. विकासाच्या रुळावर आलेल्या नाशिकच्या विकासाच्या गाडीला ब्रेक लागला. तब्बल अडीच वर्ष विकास रखडला. मात्र, नियतीने पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्या बाजूने फासे टाकले आणि सत्तेत आणून बसवले. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री, तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. या जोडगोळीने योजनांचा पाऊस पाडत नाशिकचा विकास रुळावर आणण्यास हातभार लावला. दोनच दिवसांपूर्वी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी नाशिकमध्ये एकाच दिवशी तब्बल नऊ विकासकामांचा शुभारंभ केला. यात मराठा व धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह, सारथीच्या मध्यवर्ती कार्यालयाची उभारणी, वन विभागाला नवीन कार्यालय, महिलांसाठी 100 खाटांचे रुग्णालय, इंदिरानगर बोगद्याचे विस्तारीकरण, आयटीआय पूल ते वावरेनगर रस्त्याचे काँक्रीटीकरण या विकासकामांचे भूमिपूजन तर, हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानाचे सुशोभीकरण, बाळासाहेब ठाकरे उद्यान आणि महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचे लोकार्पण करण्यात आले. नाशिकचे पालकत्व घेतलेल्या फडणवीस यांनी दिलेला शब्द खरा केला. तसेच, महायुतीचे सरकार सर्वसामान्यांचे सरकार असल्याचे दाखवून देण्यात फडणवीस यशस्वी झाले. शुभारंभ करण्यात आलेल्या विकासकामांचा महायुतीला जिल्ह्यातील सर्वच विधानसभा मतदारसंघात फायदा होणार आहे. तसेच पूर्वीपेक्षा अधिक जागा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. खर्‍या अर्थाने नाशिक जिल्ह्याला विकासाच्या मार्गावर आणणार्‍या देवेंद्र फडणवीस यांचे हात आगामी विधानसभा निवडणुकीत नक्कीच पूर्वीपेक्षा अधिक बळकट होतील, यात तिळमात्र शंका नाही.

विराम गांगुर्डे 
Powered By Sangraha 9.0