मागील लेखात आपण बाह्य कृमिंबद्दल सविस्तर माहिती जाणून घेतली. आजच्या लेखात आभ्यंतर कृमिंविषयी जाणून घेऊयात. आभ्यंतर कृमिंचे तीन उपप्रकार होतात - कफज, पुरीषज आणि रक्तज. कफज म्हणजे कफाच्या दुष्टीमुळे उत्पन्न होणारे, पुरीषज म्हणजे पुरीष-शरीरातील मल भाग, ज्याचा शरीरातून निचरा होतो तो घटक आणि त्यात उत्पन्न होणारे कृमि आणि तिसरा उपप्रकार म्हणजे रक्तज. रक्तात उत्पन्न होणारे व रक्ताच्या दुष्टीमुळे उत्पन्न होणारे कृमि म्हणजे रक्तजकृमि होय. यांतील कफज कृमिंबद्दल (त्यांची शरीरातील उत्पत्तीची स्थाने, कारणे आणि लक्षणे) आपण मागील लेखात वाचली. आता अन्य उपप्रकारांबद्दल जाणून घेऊया...
शरीरात आहाराचे पचन झाल्यावर त्याचे मुख्य दोन भाग होतात - पोषक भाग, जो शरीरपोषणाचे कार्य करतो आणि मल भाग ज्याचे शरीरातून बाहेर निष्कासन केले जाते. आमाशयात मुख्यत्वे करुन ही पचनप्रक्रिया होते. पचनाची संपूर्ण प्रक्रिया पक्वाशयात पूर्ण होते. म्हणजे मलनिर्मितीचे कार्य पक्वाशयात होते आणि जर या ठिकाणी पुष्टी झाली, तर पुरीषज कृमिंची उत्पत्ती पक्वाशयात होऊन त्यांचा संचार वर व खाली अशा दोन्ही दिशांनी होतो. म्हणजेच, आमाशय व गुद (rectal part) पुरीषज कृमिं उत्पन्न होण्याची बरीचशी कारणे कफज कृमिंप्रमाणेच आहेत. म्हणजे अति प्रमाणात दूध व दुग्धजन्य पदार्थांचे सेवन, गुळापासून बनविलेले पदार्थ, तिळाचा अत्याधिक वापर, मासे अतिप्रमाणात भक्षण करणे, कच्चे व व्यवस्थित न शिजलेले अन्न खाणे, अति मांसाहाराचे सेवन करणे इ. याचबरोबर, अति प्रमाणात पिष्टान्नांचे सेवन, उडदाचे अति सेवन, पालेभाज्यांचे अति सेवन इ. कारणेही आहेत.
पुरीषज कृमिंमुळे सर्वात अधिक त्रास हा ओटीपोटात व पचनसंस्थेत होतात. गुद भागी कण्ड (खाज) सुटणे, गुदभागी वेदना होणे, मलाची निर्मिती अव्यवस्थित होणे (बांधून न होणे) अंगाला कोरडेपणा जाणवणे, खाल्लेले अंगाला न लागणे व त्यामुळे बारीक होत जाणे, भूक मंदावणे, गळून गेल्यासारखे वाटणे, तोंडाला चव नसणे व लाळ अधिक तयार होणे, शरीर फिके पडणे इ. लक्षणे उत्पन्न होतात. लहान मुलांमध्ये अति दुग्धाहार (वय वर्षे एक ते पाच) व गोड खाल्ल्याने पुरीषज कृमि वारंवार होताना दिसतात. या उपप्रकारामुळे वारंवार पोट बिघडणे, जुलाब होणे, त्वचेवर fungal infection होणे ताप-अंगदुखी-मलुलता इ. लक्षणे उत्पन्न होऊ शकतात.
पुरीषज कृमिंची वाढ ही झपाट्याने होते आणि त्यावर चिकित्सा वेळोवेळी करावी लागते. याचे निष्कासन पुरीषावाटे (Through faecal matter) होते. लहान मुलांमध्ये बरेचदा व मोठ्यांमध्ये क्वचित कृमिनिष्कासन होताना आढळतात. कृमि हा विचार आयुर्वेदशास्त्रातील खूप व्यापक आहे. फक्त जंत (worms) एवढाच अर्थ आयुर्वेदात अभिप्रेत नाही. विविध जीवाणू (bacteria, fungh viruses) इ.चाही समावेश कृमि यातच होतो. यामध्ये शरीरात निर्माण होणार्या विविध व्याधि या संसर्गजन्य स्वरुपाच्या असू शकतात व दुषित पाणी, हवा, जमीन इ. कारक कारणांनी ते होतात व पसरतात. म्हणजे शौच, शुद्धि, शुचिता, उत्तम आहार व व्यायाम हे जर असेल, तर शरीराची प्रतिकारक्षमता उत्तम राहते व प्रतिबंधात्मक कार्य करण्यास ते सक्षम राहते. आपण हेपण बघतोच की, एकाला सर्दी झाली, तर ती घरातल्यांना होते. किंबहुना, होऊ शकते. पण, त्याची तीव्रता कमी असते. याचे कारण प्रत्येकाची असलेली भिन्न भिन्न प्रतिकारशक्ती.
आभ्यंतर कृमिंमधील तिसरा उपप्रकार म्हणजे रक्तज कृमि. जे कृमि रक्तदुष्टीमुळे आणि रक्तवाहिन्यांमध्ये उत्पन्न होतात. शरीरात रक्त सर्वव्यापी प्रसरण सतत करत असते. त्यामुळे रक्तज कृमिंचा सर्व शरीरात प्रसार पटकन होऊ शकतो. आयुर्वेदाप्रमाणे विविध त्वचाविकारांचा समावेश ‘कुष्ठ’ या योगात केला गेला आहे. आयुर्वेदातील कुष्ठ संकल्पना ही ‘लेप्रसी’ या व्याधिपुरती सीमित नाही. त्यात विविध प्रकारच्या, चिरकारी व स्रावी (चिघळणार्या) त्वचाविकारांचा समावेश तसेच शरीरात सर्वव्यापी लक्षणे निर्माण करणार्या त्वचाविकारांचा समावेश कुष्ठ या व्याधीत होतो. रक्तज कृमिंमधील लक्षणे आणि त्यामुळे होणार्या व्याधींची श्रृंखला ही कुष्ठव्याधींशी खूप साम्य दाखविते.
रक्तज कृमिचे व्याधि केसांवर (डोके-दाढी-मिशीचे-शरीरावरचे) उत्पन्न होतात. यात केस झडणे, डोळ्यांच्या पापण्यांचे केस गळणे इथपर्यंत त्याचे परिणाम दिसू शकतात. शरीर वारंवार शहारणे, सर्वांगावर तीव्र खाज येणे, जेथे जेथे रक्तज कृमिंची विकृति निर्माण होते, तेथे तेथे तीव्र वेदना व या कृमिंमुळे त्वचा, रक्तवाहिन्या-स्नायू व अन्य Soft Tissueपर्यंत कुजणे ही प्रक्रिया घडू लागते. याजागी जखमा होणे, चिघळणे हेदेखील होते. रक्तज कृमिंमधील त्वचाविकार ही लहान मुलांमध्ये, वृद्घांमध्ये व अन्य co morbidities (मधुमेह, उच्च रक्तदाब इ.) असलेल्या व्यक्तींमध्ये अधिक चिरकारी व चिकित्सेसाठी अधिक काळ लागणारे असू शकतात. म्हणून रक्तज कृमि ज्या कारणांनी होतात, ती कारणे टाळणे अधिक महत्त्वाचे आहे. प्रतिबंधात्मक उपाय जर केले, तर हे व्याधि होणार नाहीत आणि जर झाल्या, तर ते आटोक्यात आणण्यासाठी अधिक सोपे होऊ शकते. ही कारणे कोणती, जी टाळल्यास प्रतिबंधात्मक (Preventive) उपाय होऊ शकतात, तर ते खालीलप्रमाणे आहेत -
आहारातील अचानक केलेला बदल उदा. : जिमला जायला लागल्यावर शाकाहारी व्यक्तीने अंडी (मोठ्या प्रमाणात) खायला सुरू करणे किंवा मांसाहार सुरू करणे किंवा एका शहरातील-देशातील आहार बदलून दुसर्या प्रदेशातील आहार सुरू करणे (जसे विद्यार्थीदशेत, नोकरीला लागल्यावर हॉस्टेल, मेस व त्या त्या गावातील-राज्यातील आहाराचे सेवन सुरू करणे) व्यंजने बनविण्याची पद्धत, त्यासाठी लागणारी सामग्री, त्यांतील मसाले हे सर्व भिन्न भिन्न असल्याने त्याचा परिणाम होतो. अजून एक महत्त्वाचे कारण, ज्याने रक्तज कृमि उत्पन्न होऊ शकतात, ते म्हणजे गरम पदार्थ आणि थंड पदार्थ एकावर एक खाणे (गरमवर थंड किंवा थंड पदार्थावर गरम) किंवा वातावरणातील अशा तीव्र बदलास सामोरे जाणे. अजून एक कारण म्हणजे, Wrong Combinations in Diet. याला ‘विरुद्धाहार’ असे म्हटले जाते. ही आयुर्वेदातील एक Wrong Concept आहे.
याबद्दल सविस्तर पुढील लेखात बघूया. हल्ली ’Fad Dieting’ची खूप क्रेझ दिसते. लग्नसराईच्या काळात, नवरात्रीत किंवा अन्य समारंभामध्ये आपण सुंदर दिसावे म्हणून ‘क्रॅश डाएटिंग’ केले जाते. यात बरेचदा एखादा अन्नपदार्थ संपूर्ण वर्ज्य केला जातो आणि काही अन्नपदार्थांचा अतिरेकी वापर केला जातो. यामुळे समतोल बिघडतो. तसेच कृश व्यक्तींना पुष्ट व्हावे असे वाटते. यासाठी विविध उपाय ते वापरतात, जे अशास्त्रीय असतात. असा असंतुलित आहार घेणे रक्तज कृमि उत्पन्न करु शकतात. काही विशिष्ट कॉम्बिनेशन्स आहारातून घेणे टाळावे. हल्ली साखरेऐवजी मधाचा वापर बर्याच अन्नपदार्थांमध्ये केला जातो. शिजवताना मध घालणे, गरम पाण्यात मध घालणे हे चुकीचे आहे. वजन कमी करण्यासाठी सकाळी उठल्या उठल्या गरम पाणी, मध आणि लिंबू पिणारे बरेचजण आहेत. अति प्रमाणात कुळथाचे सेवन, उडदाचे सेवन, मासे आणि दही हे एकत्र खाणे ही सर्व रक्तज कृमि उत्पन्न होण्याची कारणे आहेत.
याचबरोबर आयुर्वेदशास्त्रात अजून एक विशिष्ट कारण सांगितले आहे. ते म्हणजे, उल्टीची संवेदना असताना ती थांबविणे. उल्टी ही संवेदना खूप तीव्र असू शकते. ती थांबविणे ही त्याच्या प्रकृतीच्या विरुद्ध आहे. त्यामुळे शरीरातील दोषांची दुष्टी वाढते आणि रक्तज कृमि उत्पन्न होतात. तसेच, विविध त्वचा, नखे व केसांच्या व्याधी उत्पन्न होतात.
कृमिची चिकित्सा करतेवळी सर्वप्रथम निदान परिवर्तन सांगितले आहे. निदान म्हणजे कारण. ज्या कारणामुळे विविध कृमि उत्पन्न होतात, ती कारणे नाहीशी केल्यास निम्मा आजार असाच नाहीसा होतो. याबरोबर काही आभ्यंतर चिकित्सा तज्ज्ञ वैद्यांच्या मार्गदर्शनाखाली करावी. सर्वांग स्वेद (ताप येणे), सर्वांग स्नेहन, अभ्यंग (अंगाला तेल लावणे), गरम लेप लावणे इ. चिकित्साप्रकार आयुर्वेदात नमूद आहेत. त्यांचा उत्तम परिणाम बघावयास मिळतो. (क्रमशः)
वैद्य कीर्ती देव
(लेखिका आयुर्वेदिक कॉस्मॅटोलॉजिस्ट व पंचकर्मतज्ज्ञ आहेत.)
9820286429