मुंबई : ठाणे वर्तुळाकार मेट्रो प्रकल्पाच्या कामाला गती देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत सोमवारी मंत्रिमंडळ बैठक पार पडली. या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले.
१२ हजार २२० कोटींच्या सुधारित आराखड्यास मान्यता!
ठाणे वर्तुळाकार मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या कामास गती देण्यात येत असून त्यासाठी आवश्यक १२ हजार २२० कोटी १० लाख रुपयांच्या सुधारित आराखड्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. या मेट्रो रेल्वे मार्गाची लांबी २९ किलोमीटर्स असून २० उन्नत स्थानके व २ भुमिगत स्थानके आहेत.
हे वाचलंत का? - ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह भुयारी मार्गाच्या कामाला गती देणार! मंत्रिमंडळाचा निर्णय
या प्रकल्पामुळे २०२५ मध्ये दररोज ५ लाख ७६ हजार तर २०४५ मध्ये दररोज ८ लाख ७२ हजार प्रवाशांची वाहतूक करणे शक्य होणार आहे. नवीन ठाणे, रायला देवी, वागळे चौक, लोकमान्य नगर बस डेपो, शिवाई नगर, नीलकंठ टर्मिनल, गांधीनगर, डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह, मानपाडा, डोंगरीपाडा, विजय नगरी, वाघबिळ, वॉटर फ्रंट, पाटलीपाडा, आझादनगर बस स्थानक, मनोरमा नगर, कोलशेत औद्योगिक क्षेत्र, बाळकुम नाका, बाळकुम पाडा, राबोडी, शिवाजी चौक, ठाणे स्टेशन ही स्थानके यामध्ये प्रस्तावित आहेत.