संतापजनक! शाळेची प्रगती व्हावी म्हणून विद्यार्थ्याचा दिला बळी

हाथरस जिल्ह्यात काळ्याजादूचा प्रकार; मुख्याध्यापकासह पाच जण अटकेत

    30-Sep-2024
Total Views |

hathras black magic

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Hathras Black Magic)
उत्तर प्रदेशच्या हाथरस जिल्ह्यात एका खासगी शाळेच्या संचालकाने ११ वर्षीय विद्यार्थ्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शाळेच्या प्रगतीसाठी आणि प्रसिद्धीसाठी आपल्या विद्यार्थ्याचा बळी दिल्याचा अघोरी प्रकार याठिकाणी घडल्याची माहिती मिळत आहे. याप्रकरणी पोलिसांनी शाळेच्या मुख्याध्यापकासह पाच जणांना अटक केली असून शवविच्छेदन अहवालात गळा दाबून हत्या झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

हे वाचलंत का? : धारावीतील मशिदीचे अतिक्रमित बांधकाम पाडण्यास सुरुवात

जिल्ह्यातील एका खासगी शाळेच्या वसतिगृहात राहून हा विद्यार्थी शिक्षण घेत होता. सोमवारी शाळा व्यवस्थापनाने त्याच्या कुटुंबीयांना फोन करून मुलाची तब्येत खराब असल्याची माहिती दिली आणि त्यांना लवकर शाळेत पोहोचण्यास सांगितले. कुटुंबीय आल्यावर त्यांना बराच वेळ मुलाला भेटू दिले नाही. दिशाभूल करण्यासाठी विद्यार्थ्याला रुग्णालयात नेण्यात आल्याचे सांगण्यात आले. याबाबत पोलिसांना कळवले असता त्यांना तपास सुरु केला.

त्यादरम्यान सादाबाद भागात शाळेच्या व्यवस्थापकाला त्याच्या कारसह ताब्यात घेण्यात आले. यावेळी पोलिसांना विद्यार्थ्याचा मृतदेहदेखील सापडला. याप्रकरणी विद्यार्थ्याच्या वडिलांनी व्यवस्थापकासह पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे. काळ्या जादूमुळे विद्यार्थ्याची हत्या झाल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. शाळेच्या व्यवस्थापकाचे वडील तांत्रिक आहेत, त्यांनी सुचवले होते की मुलाचा बळी दिल्यास शाळेची प्रगती होईल. सध्या पोलिसांनी या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक केली असून या प्रकरणाचा सविस्तर तपास सुरू आहे.