कोल्हापूर : राज्य सरकारने देशी गायीला 'राज्यमाता' म्हणून घोषित करण्याचा निर्णय घेतला असून आता यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे. देशी गोमाता शेतकऱ्यांचं भाग्य बदलू शकतात, असे ते म्हणाले. त्यांनी कोल्हापूरमध्ये माध्यमांशी संवाद साधला.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "देशी गायींचं संवर्धन व्हावं, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. देशी गोमाता शेतकऱ्यांचं भाग्य बदलू शकते. ती जन्मापासून तर शेवटपर्यंत केवळ आपल्याला देत असते. गोशाळांना देशी गोवंशाकरिता ५० रुपये प्रति गाय अनुदान देण्याचाही निर्णय आम्ही घेतला आहे," असे त्यांनी सांगितले. तसेच महाराष्ट्राच्या विकासाकरिता आम्ही अनेक महत्वाचे निर्णय घेतले आहेत. त्यामुळे हे निर्णय घेणारं सरकार आहे, असेही ते म्हणाले.
हे वाचलंत का? - रमाबाई आंबेडकर नगर आणि कामराजनगरच्या पुनर्वसन प्रकल्पांबद्दल महत्वाचा निर्णय!
उद्धव ठाकरेंनी आरसा बघावा!
उद्धव ठाकरेंनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांवर टीका केली होती. यावर प्रत्युत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "ज्या कलमामुळे काश्मीर भारतापासून रद्द झालं होतं ते कलम रद्द करणारे मोदीजींसोबतच अमित शाह आहेत. आज देशात सांस्कृतिक पुनरुत्थान पाहायला मिळतंय. त्यामुळे हिंदू म्हणून आमची ओळख पुसण्याचा झालेला प्रयत्न ५०० वर्षांनंतर आमच्या नेत्यांनी मोडून काढला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे अशा प्रकारे त्यांचं संबोधन करत असतील तर त्यांनी एकदा आपला चेहरा आरशात पाहावा," असे ते म्हणाले.