नवी दिल्ली : काँग्रेसच्या प्रवक्त्या रागिनी नायक यांच्यावर भारतीय जनता पक्षाच्या प्रवक्त्या राधिका खेरा यांनी गंभीर आरोप केले आहेत. आज तक या वाहिनी वर त्या बोलत होत्या. राधिका खेरा म्हणाल्या, मी रागिनी नायक होऊ शकत नाही. मला पक्षातून निलंबित केलेलं नाही. रागिनी नायक एनएसयूआयच्या विद्यार्थींकडून, राहुल गांधी यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी १० हजार रूपये घेत असत. त्यांनी सांगावं की नॅशनल स्टूडेंट्स यूनियन ऑफ इंडिया ही काँग्रेसची विद्यार्थीशाखा आहे, असा टोला त्यांनी यावेळी लगावला.
राधिका खेरा या भारतीय जनता पक्षाच्या प्रवक्त्या आहेत. या वादाचा व्हिडिओ शेअर करत त्या म्हणाल्या, रागिनी नायक यांचे पती अशोक बसोया हे छत्तीसगड काँग्रेस सरकारमध्ये महाधिवक्ता होते.आता हिमाचल सरकारचेसुद्धा वकील आहेत. या सगळ्याशिवाय स्वतःच्या कुटुंबाला फायदा मिळवून देणाऱ्या, आणि स्वतःच्याच पक्षात भ्रष्टाचार करणाऱ्या प्रवक्त्या आता दुसऱ्यांवर खोटे आरोप करत आहेत, ज्याचा राजकारणाशी काहीही संबंध नाही, असेही त्यांनी सांगितले.
राधिका खेरा म्हणाल्या, राहुल गांधी यांनी आपल्या प्रवक्त्यांना संविधान वाचण्यास सांगावे. भारतीय संविधान हे प्रत्येक नागरिकाला हवे तिथे शिक्षण घेण्याचा अधिकार देतं. रागिणी नाईक उद्या, तुमची मुलं देखील शाळेत जातील, परंतु भाजप त्यावर कधीही प्रश्नचिन्ह उपस्थित करणार नाही. त्यांना त्यांच्या उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा.
त्या पुढे म्हणाल्या, जेव्हा त्यांनी सत्य जगासमोर आणलं, तेव्हा "डरो मत" म्हणणारे राहुल गांधी आणि जयराम रमेश यांनी घाबरून त्यांना "गाली वाली मॅडम" अशी उपमा दिली. हाच राहुल गांधी यांचा महिला न्याय आहे, असा घणाघात खेरा यांनी केला. खेरा यांनी आरोप केला की, जेव्हा काँग्रेसच्या लोकांनी त्यांना त्रास दिला, तेव्हा त्या देखील न्यायासाठी भटकत राहिल्या, ज्यावर आज रागिणी हसत आहेत.