मुंबई : ई-गव्हर्नन्स म्हणजे केवळ तंत्रज्ञान नव्हे, तर ते आपल्या विचारसरणीत बदल आणण्याचे एक प्रभावी साधन आहे, असे वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केले आहे. मंगळवारी मुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते २७ व्या राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स परिषदेचा शुभारंभ पार पडला. यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "ई-गव्हर्नन्स म्हणजे केवळ तंत्रज्ञान नव्हे, तर ते आपल्या विचारसरणीत बदल आणण्याचे एक प्रभावी साधन आहे. महाराष्ट्रातील नागरिकांना आता कोणत्याही उपनिबंधक कार्यालयात जाऊन घराच्या खरेदी-विक्रीची नोंदणी करणे शक्य झाले आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या 'किमान सरकार, कमाल प्रशासन' या धोरणाचे अनुसरण करत भविष्यात मालमत्ता खरेदी विक्रीची प्रक्रिया ऑनलाईन करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ई-गव्हर्नन्सचा उपयोग करून, महाराष्ट्र सरकारने 'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजनेच्या पहिल्या दोन हप्त्यांची रक्कम अतिशय कमी वेळेत लाभार्थ्यांच्या खात्यात पोहोचवली आहे." असे ते म्हणाले.
हे वाचलंत का? - "मटण खात नाही पण...;" सूरज चव्हाणांची शरद पवार गटावर खोचक टीका
ते पुढे म्हणाले की, "मुख्यमंत्री सचिवालयातील फायलिंगची कामे आता पूर्णपणे ई-ऑफिस प्रणालीद्वारे होत असून सेवा अधिकारांतर्गत सर्व सेवा ऑनलाईन पुरविल्या जात आहेत. मंत्रालयाच्या प्रवेशद्वाराजवळील केंद्रीय नोंदणी केंद्रामुळे नागरिकांचे श्रम आणि वेळ वाचवण्यात यश मिळाले आहे. याच दिशेने, मुंबई आणि नवी मुंबईतील डेटा सेंटर हब उभारण्याची वाटचाल सुरू असून तंत्रज्ञान ग्रामीण भागापर्यंत पोहोचवायचे आहे. एआय तंत्रज्ञानाचा वापर करून उद्योग, कृषी, आरोग्य या क्षेत्रात नवीन उद्योगधंद्यांना चालना देण्याची आमची योजना आहे," असेही त्यांनी यावेळी सांगितले.