कोल्हापूर, दि.२ : प्रतिनिधी : 'महिलांची प्रगती ही देशाच्या उन्नती आणि विकासामध्ये महत्त्वाची आहे. त्यामुळे महिलांच्या दैनंदिन जीवनात बदल होत आहे. आपल्यासोबत सर्व महिलांना या प्रगतिपथावर आणणे गरजेचे आहे. सहकारी संस्था बळकट करणे गरजेचे', असल्याचे प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केले. 'श्री वारणा महिला सहकारी विविध उद्योग समूहा' चा सुवर्ण सोहळा व वारणा विद्यापीठाच्या उद्घाटन समारंभ प्रसंगी त्या बोलत होत्या.
सोमवार, दि.२ रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या शुभहस्ते वारणा विद्यापीठाचा उद्घाटन समारंभ वारणानगर, कोल्हापूर येथे संपन्न झाला. यावेळी राष्ट्रपती मुर्मू यांनी उपस्थित विराट नारीशक्तीला आणि जनसमुदायाला संबोधित केले. यावेळी मा. राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री रक्षा खडसे, आ. डॉ. विनय कोरे, मंत्री हसन मुश्रीफ, मंत्री चंद्रकांतदादा पाटील, खा. धनंजय महाडीक, खा. धैर्यशील माने आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
यावेळी संबोधित करताना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या की, वारणा समूहाच्या सोहळ्याला येण्याचा आनंद आहे. लिज्जत पापड सारखे घराघरात जाणारे ब्रँडचे प्रॉडक्ट इथे बनवले जातात. दुग्ध उत्पादनात 'वारणा समूह' पुढे आहे. वारणामधील महिला समूहाचा सोहळा पार पडत आहे. महिलांनी सामाजिक स्थान वाढवणे गरजेचे असून सरकार यासाठी प्रयत्न करत आहे. अनेक संस्था देखील महिलांसाठी कार्यरत आहेत. आपल्यासोबत सर्व महिलांना या प्रगतिपथावर आणणे गरजेचे आहे, अशी भावनाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात महिला सन्मानासाठी सुरु असलेल्या योजनांची माहिती दिली. तसेच ते म्हणाले, 'सहकारमहर्षी स्व. तात्यासाहेब कोरे यांनी ५-६ दशकांपूर्वी विकासामधील महिलांचे योगदान समजून घेत सहकार, उद्योग आणि शिक्षणासारख्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर महिलांचा सहभाग वाढवला. याच कारणामुळे आज वारणा परिसरात समृद्धी आणि परिवर्तन पाहायला मिळत आहे.भविष्यात भारताचे नेतृत्त्व नारी शक्ती करणार यात कोणतीही शंका नाही, ज्याचे प्रतीक म्हणून आपण राष्ट्रपती महोदया श्रीमती द्रौपदी मुर्मूजी यांच्या जीवनप्रवासाकडे पाहू शकतो. एका शिक्षिकेपासून सुरु झालेला त्यांचा प्रवास गव्हर्नर आणि त्यानंतर राष्ट्रपती पद असा प्रेरणा देणारा आहे,' असेही फडणवीस यावेळी म्हणाले.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी घेतले श्री अंबाबाईचे दर्शन
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कोल्हापूर दौऱ्यात करवीर निवासिनी श्रीअंबाबाई देवीला कुंकुमार्चन अभिषेक करुन विधीवत पूजा केली. एकारती, पंचारती व कर्पुरआरती करुन देवीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासोबत त्यांची कन्या इतिश्री मुर्मू व भाऊ तारिणीसेन टुडू यांनीही देवीचे दर्शन घेतले.