नवी दिल्ली, दि. २ : विशेष प्रतिनिधी : भारतीय जनसंघापासून भाजपपर्यंतच्या प्रवासात लाखो निष्ठावान कार्यकर्ते हेच भाजपचे बळ आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी केले आहे.
भाजपच्या देशव्यापी सदस्यत्व मोहिमेस २ सप्टेंबरपासून प्रारंभ झाला आहे. या मोहिमेचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पक्षाच्या विस्तारित मुख्यालयात झाला, यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिले सदस्यत्व घेतले. यानंतर भाजप अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यासह भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी पुन्हा पक्षाचे सदस्यत्व घेतले.
भाजपच्या सदस्यत्व मोहिमेची आणखी एक फेरी सुरू होत आहे. भारतीय जनसंघापासून आतापर्यंत आम्ही देशात नवी राजकीय संस्कृती आणण्याचा प्रयत्न केला आहे. आम्ही ते लोक आहोत ज्यांनी मोठ्या भक्तिभावाने भिंतींवर कमळ रंगवले. भिंतींवर रंगवलेले कमळ कधीतरी हृदयावरही रंगेल, असा आमचा विश्वास होता. आमच्या कार्यकर्त्यांबद्दल असे म्हटले जात होते की त्यांचा एक पाय ट्रेनमध्ये आणि दुसरा तुरुंगात आहे. कारण कार्यकर्ते सातत्य़ाने रेल्वेने प्रवास करत असत आणि तुरुंगातही जात असत. कारण त्यावेळच्या राज्यकर्त्यांनी आपल्याला मिरवणूकही काढू दिली नाही. ते आम्हाला तुरुंगात टाकायचे. सत्तेतील अशा लोकांचा जुलूम सहन करून आम्ही इथपर्यंत पोहोचलो आहोत, अशी आठवण पंतप्रधानांनी सांगितली.
कार्यकर्ते हेच भाजपचे बळ असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, आम्ही फक्त निवडणूक यंत्र नाही. आपल्या देशवासियांच्या स्वप्नांचे पोषण करणारे आहोत. देशाची स्वप्ने आणि संकल्पपूर्तीच्या प्रवासात स्वतःला झोकून देणारी पिढी तयार करण्याचे काम भाजप कार्यकर्ता करत असतो. आज देशातील गरीबांना आपली धोरणे, निर्णय आणि आपण स्वीकारलेल्या मार्गांवरून निघणाऱ्या परिणामांवर सर्वाधिक विश्वास आहे. त्यामुळे ही सदस्यत्व मोहीम मागील सर्व विक्रम मोडेल, असा विश्वासही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी व्यक्त केला आहे.