मुंबई : सणासुदीच्या काळात ई-कॉमर्स कंपन्यांकडून सेल ऑफर जाहीर केली जाते. दसरा सणाच्या मुहूर्तावर ई-कॉमर्स कंपनी मीशोला 'सीझन सेल'च्या पहिल्या दिवशीच ६.५ कोटी लोकांनी भेट दिली आहे. तसेच, या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरील ऑर्डरदेखील दुप्पट झाल्या आहेत. ई-कॉमर्स साईटवरील ऑनलाईन खरेदीला ग्राहकांकडून मोठा प्रतिसाद मिळताना दिसून येत आहे.
मीशो सीईओ विदित अत्रे म्हणाले, सीझन सेलपूर्वीच कंपनीचे अॅप सुमारे १.५ कोटी लोकांनी डाऊनलोड केले. विक्रीच्या पहिल्याच दिवशी खरेदी ऑर्डरची संख्या मागील सत्राच्या तुलनेत दुप्पट झाली आहे. त्याचबरोबर, सणासुदीच्या काळात मीशो मेगा ब्लॉकबस्टर सेलच्या माध्यमातून पहिल्याच दिवशी सुमारे ६.५ कोटी लोकांनी पोर्टलला भेट दिली आहे.
काल दुपारी २ वाजेपर्यंत गेल्या वर्षीच्या तुलनेत पहिल्या दिवशी दिलेल्या ऑर्डरची सर्वाधिक संख्या अधिक होती. दिवसअखेरीस ही संख्या दुपटीने वाढली होती. पहिल्या दिवशी सुमारे ६.५ कोटी ग्राहकांनी मीशो मोबाइल ॲपला भेट दिली आहे. दरम्यान, आगामी २०२७ पर्यंत संपूर्ण भारतात ऑनलाईन खरेदीदारांची संख्या सुमारे २५ कोटी असेल, असा अंदाज एका अहवालात वर्तविण्यात आला आहे.