माल्टा ते हंगेरी व्हाया तेहरान...

    29-Sep-2024
Total Views |
 
Olympiad Dommaraju Chess
 
ऑलिम्पियाड स्पर्धेमध्ये भारताच्या महिला आणि पुरुष संघाने सुवर्ण कामगिरी करत, भारताच्या शिरपेचात सन्मानाचा तुरा खोवला आहे. भारताची बुद्धिबळातील सुवर्ण कामगिरी ही आजचीच नाही, तर त्याला एक इतिहास आहे. मुळात हा खेळच भारतीय मातीतील आहे. या खेळाविषयी, ज्ञात आणि अज्ञात खेळाडूंविषयी या लेखात घेतलेला आढावा...
 
माल्टा, तेहरान, हंगेरी या राष्ट्रांतून क्रमाक्रमाने प्रवास करत आपल्या बुद्धीच्या बळावर, भारतीय युवकयुवतींनी बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये घेतलेली प्रचंड झेप आपल्याला अचंबित करते. आपण या लेखात तेच त्यांचे बुद्धीचे बळ जाणणार आहोत. चतुरंगसेना: तसे म्हटले तर, बुद्धिबळ हा क्रीडाप्रकार आपल्याकडे काही नवीन नाही. पौराणिक काळापासून जो चालत आलेला आहे, तो ’चतुरंग’ म्हणून जवळपास चार-पाच हजार वर्षांपासून तरी हिंदुस्थानात सतत खेळला जात आहे. काही तज्ज्ञांच्या मते, या खेळाला ज्याअर्थी ’सतरंज’ असे नाव होते व हा शब्द पर्शियन भाषेतील आहे, त्याअर्थी हा खेळ इराण अथवा, अरबस्तानमधून आला असावा. ही विचारसरणी मुख्यतः परद्वीपस्थांची आहे. परंतु, तो शब्दच मुळी संस्कृत ’चतुरंग’ शब्दापासून झालेला असल्याने, या तर्काची कल्पना त्यांच्याच अंगलट येऊन, हिंदुस्थान हेच बुद्धिबळाचे उगमस्थान ठरते. सांगलीचे व्यं. गो. उर्फ तमाण्णाचार्य पडसलगीकर यांच्या ’बुद्धिबळाचा खेळ’ या १९४१ सालच्या पुस्तकाच्या केवळ पहिल्याच प्रकरणातील काही ओळीतून, आपल्याला बुद्धिबळाचा इतिहास समजतो, आणि बुद्धिबळाच्या खेळाबद्दल जिव्हाळा वाढतो. आपल्या सगळ्यांच्या परिचयातील बुद्धिबळाचा डाव ऑलिम्पियाडच्या स्वरुपात परत स्वगृही घेऊन येण्याचे मोठे स्तुत्य कर्म, आपली आजची भारतीय मुलामुलींची युवापिढी करत आहे.
 
शतरंज की दुनियाके बादशाह: मागील आठवड्यात पटकावलेल्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडच्या विजयी सुवर्णपदकांची चव, तो सुगंध आठवडा उलटून गेल्यावरही आपल्या बुद्धिबळपटूंच्या अन् भारतीय क्रीडाप्रेमींच्या रंध्रारंध्रात भरुन राहिलेला आहे. मागील आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या अमेरिका दौर्‍यात, न्यूयॉर्कमध्ये अमेरिकेतील भारतीयांना संबोधित केले होते. त्यात आनंदाची बातमी सांगत बुद्धिबळ ऑलिम्पियाडच्या विजेत्यांना आवर्जून शुभेच्छा देताना,“चेस ऑलिम्पियाड में मेन्स और वुमेन्स दोनों में भारत को गोल्ड मिला है। ये लगभग सौ साल के इतिहास में पहली बार हुआ है।” असे म्हटले होते. नरेंद्र मोदींचा हा उद्देश जगाला संदेश पोहचवण्यास पुरेसा होता की, ’शतरंज की दुनियाके भी हम बादशाह है।’ दुनियेवर गारुड कसे करायचे, हे देखील नवभारताची ही बुद्धीमान युवाशक्ती क्रीडेच्या माध्यमातूनही दाखवून देत आहे. ज्यावेळेस ती बातमी भारतीयांच्या कानी पडताच सारे आनंदी होत होते, तेव्हाच तिकडे हंगेरीमधील बुडापेस्टच्या त्या सभागृहात अद्भूत विलक्षण वातावरणात आपले दोम्माराजू गुकेश, आर. प्रज्ञानंद, अर्जुन एरिगेसी, नाशिककर विदित गुजराथी, पेंटाला हरिकृष्णा ही मुले तर द्रोणावल्ली हरिका, आर. वैशाली, नागपूरची दिव्या देशमुख, वंतिका अग्रवाल आणि तानिया सचदेव या मुली ’आन-बान-शान’मध्ये भारताचा तिरंगा फडकत होते.
 
तिरंगा फडकला त्रिवार: एके काळी रमणीय पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध असलेले बुडापेस्ट हे हंगेरीतले शहर आता आपली ओळख फक्त एक पर्यटनस्थळ अशी न ठेवता, क्रीडाक्षेत्रात विजयश्री खेचून आणण्याचे क्रीडाकेंद्र म्हणून उदयास येत आहे. त्यात भारतीय क्रीडापटूंचा मोठा सहभाग असल्याचे दिसून येत आहे. २०२३ सालच्या ऑगस्टमध्ये नीरज चोप्राने भालाफेकीत जागतिक अ‍ॅथलेटिक्स विजेतेपद स्पर्धेत सुवर्ण जिंकल्यानंतर, आता भारतीय महिला व पुरुष बुद्धिबळपटू ऑलिम्पियाड मध्ये आता तिथेच आपली पदके पटकावून आले आहेत. निरजच्या पावलावर पाऊल ठेवून, आपल्या बुद्धिबळपटूंमुळेही पुन्हा राष्ट्रगीत तिथेच गुंजत आहे. परत एक राष्ट्रगीत पुरुष विजेतेपद प्रदान करुन झाल्यावर, लगेचच महिलांच्या विजेतेपदाच्या सोहळ्याचे दुसरे राष्ट्रगीत सादर करण्यात आले होते.
 
विशी सरांची विरासत: एकेकाळी तेहरानमध्ये अंतिम सामना जिंकत, विश्वनाथन आनंदने विजेतेपद पटकावले होते. भारताचे ते पहिले पदक होते. त्या केलेल्या सुरुवातीपासून सगळ्यांना वाटू लागले की, भारतीय खेळाडू बुद्धिबळात बरच काही करुन दाखवू शकतात, आणि त्याचीच परिणीती आज आपल्याला दिसत आहे. आपल्या ज्येष्ठ व श्रेष्ठ असलेल्या विश्वनाथन आनंदला जे आपले गुरु मानतात, ते खेळाडू त्यांच्या ’विशी सरां’चा वारसा सांभाळण्यात यशस्वी होत आहेत. जागतिक स्तरावरचे बुद्धिबळातील जगज्जेते असलेले, गॅरी कॅस्पारोव्हसारखे दिग्गजदेखील आता स्वतःच्या तोंडाने कबूल करत आहेत की, आता भारत ही बुद्धिबळात सुपर पॉवर झालेली आहे. या प्रगतीवर सारे समाधान व्यक्त करीत असून, खेळाचे आणि देशाचे रुपडे बदलवून टाकण्याच्या तयारीत ’शह आणि मात’चा हा खेळ दिसत आहे.
 
वाढता वाढता वाढे: वैयक्तिक सुवर्णपदके, सांघिक विजेतेपद, आशियात वर्चस्व, जागतिक विजेतेपद, भारतीय बुद्धिबळाला हे दशक या स्वप्नपुर्तीचे ठरत असल्याचे दिसून येत आहे. चीन आणि रशियानंतर भारतच असा देश आहे की, ज्याने दोनही म्हणजे महिला व पुरुष ग्रॅण्डमास्टरपद बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये मिळवले आहेत. भारतीय ग्रॅण्डमास्टरची संख्या ज्याप्रकारे दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे, त्याने हे सिद्ध होत आहे की, बुद्धिबळाचा खेळ आता झपाट्याने लोकप्रिय होत आहे. विश्वनाथन आनंदने १९८८साली जेव्हा ग्रॅण्डमास्टर पद मिळवले होते, तेव्हा तो पहिला भारतीय ग्रॅण्डमास्टर ठरला होता. विश्वनाथन आनंदने चार वर्षांपूर्वी आपली जी अकादमी चालू केली आहे, त्यात घडलेले आर. वैशाली, प्रज्ञानंद, अर्जुन एरिगेसी, गुकेश असे चार तारे आज या ऑलिम्पियाडमध्ये आपली चमक दाखवून आले आहेत. बुडापेस्ट, हंगेरी येथे झालेल्या बुद्धिबळाचे आंतरराष्टीय स्तरावर नियमन करणार्‍या ’फेडरेशन ऑफ इंटरनॅशनल ऑफ दि चेस’ अर्थात फिडे चेस ऑलिम्पियाडच्या ४५व्या स्पर्धेत मुलांप्रमाणेच मुलींनीही सुवर्णपदक मिळवले आहे.
 
पुणेकरांना अभिमान: पुण्याचे अभिजित कुंटे यांच्या मार्गदर्शनाखाली, भारतीय महिला संघाने गतवेळी चेन्नई ऑलिम्पियाडमध्ये ब्राँझपदक जिंकले होते. तेच पुणेकर असलेले ग्रॅण्डमास्टर अभिजित कुंटे हे बुडापेस्ट इथे हिंदुस्थानी महिला बुद्धिबळ संघाचे प्रशिक्षक होते. २४ सप्टेंबरच्या मंगळवारी सगळे भारतीय बुद्धिबळपटू जेव्हा स्वगृही परतले, तेव्हा पुण्याच्या लोहगाव विमानतळावर अभिजित कुंटेंचेही जल्लोषात स्वागत करण्यात आले. त्याप्रसंगी इंटरनॅशनल आर्बिटर असलेली बुद्धिबळ पंच दीप्ती शिदोरे ही ज्यांची कन्या आहे, ते राजेंद्र शिदोरे जे फिडे मान्यताप्राप्त आंतरराष्ट्रीय पंचही आहेत. तसेच, अभिजित कुंटे यांचे कुटुंबीय, मित्रपरिवार आणि त्यांचे वडील, तसेच, बुद्धिबळ संघटक प्रकाश कुंटे, त्यांची बहीण आंतरराष्ट्रीय महिला मास्टर मृणालिनी कुंटे औरंगाबादकर,असे अनेक बुद्धिबळातील पुणेकर उपस्थित होते. कुंटेंनी चार वेळा बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यांना २००० सालामध्ये ‘ग्रॅण्डमास्टर’चा किताब मिळाला होता.
 
हंगेरीचा हंगर: आज आपल्या युवकांनी जागवलेली हंगेरीमधली सुवर्णांची भूक अशीच वाढती राहिली पाहिजे. हंगेरीचा हंगर टिकून राहिला पाहिजे. हे विचार व्यक्त केले होते, अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाचे अध्यक्ष नितीन नारंग यांनी. खेळाडूने विजयाच्या दिशेने सतत मार्गक्रमण करीत राहायला हवे. अशानेच तो यशस्वी खेळाडू म्हणून नावलौकिक मिळवू शकतो, आणि त्यामुळेच स्वतःचा आणि पर्यायाने देशाचा क्रीडाक्षेत्रात विकास होऊ शकतो. यासाठी खेळाडूला आर्थिक पाठबळ देण्याची जबाबदारी उचलणारे, आज अनेकजण पुढे येत असतात. त्यात त्या खेळाडूचे राज्यसरकार, क्रीडा संघटना तत्पर असतातच. त्यानुसार, ऑलिम्पियाड विजेत्या भारतीय खुल्या आणि महिला बुद्धिबळ संघांना, अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाने ३.२ कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. संघातील सगळ्या खेळाडूंना प्रत्येकी २५ लाख रुपये, तर त्यांच्या प्रशिक्षकांना प्रत्येकी १५ लाख रुपये मिळणार आहेत. तामिळनाडूतील दोम्माराजू गुकेश, प्रज्ञानंद व वैशाली या भावंडांना त्याच्या राज्यसरकारने प्रत्येकी २५ लाख रुपये देण्याचे जाहीर केले आहे.
 
विस्मृतीत गेलेला उस्ताद: आज आपला खेळाडूंकडे बघण्याचा दृष्टीकोन अमुलाग्र बदललेला दिसत असला, तरी काही वर्षांपुर्वी तसे नव्हते. खेळाडू स्वतःचा खेळ सांभाळत, दुसरीकडे आर्थिक विवंचनेला सामोरे जात असत. मग, जर तो यशस्वी झाला, तर मग त्याला आर्थिक मदत देण्यात येत असे. पण आधी ते सिद्ध करुन दाखवावे लागे. बुद्धिबळातदेखील काही खेळाडू असे होते की, ज्यांना आज फार कमी लोक जाणत असतील. तशांपैकी विस्मृतीत गेलेल्या मोहम्मद रफिक खान या एका बुद्धिबळातील मोहर्‍याची आठवण मला या निमित्ताने येते. विश्वनाथन आनंदच्या आधीच जागतिक स्तरावर भारत बुद्धिबळात प्रसिद्ध झाला होता.
 
१९२७ सालामध्ये सुरु झालेल्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये भारताने एकावेळेस दोन सुवर्णपदक मिळवून जगाला हे दाखवून दिले आहे की, हिंदुस्थान या खेळात सुपर पॉवर आहे. येथपर्यंत भारताला घेऊन जायला बुद्धिबळपटूंना मेहेनत घ्यावी लागली आहे. आज सारे जग बुद्धिबळातील या ’सूरमां’ना सलाम करत आहे. पण, हे यश सिद्ध करायला सर्वप्रथम प्रारंभ केला होता तो, १९८०साली झालेल्या माल्टा येथील ऑलिम्पियाडमध्ये यश मिळवून दाखवायची मुहूर्तमेढ रोवणार्‍या मोहम्मद रफिक खानने. गरीब घरचा, अशिक्षित असलेला, सुतारकामात आपल्या वडिलांना मदत करणारा, भोपाळचा युवक एक दिवस अचानक भारताचा राष्ट्रीय विजेतेपद पटकावतो, आणि आपल्या देशासाठी पहिला बुद्धिबळ ऑलिम्पियाड पदक विजेता ठरतो. अशा मोहम्मद रफिक खान यांची ही कहाणी सर्वांनी जाणून घेण्यासारखीच आहे. त्याकाळी पाच वेळा विश्वविजेतेपद मिळवणारा विश्वनाथन आनंद हा फक्त अकरा वर्षांचाच होता. तेव्हा रफिक खानने रौप्यपदक पटकावून सर्वांच्या तोंडी स्वतःचे आणि देशाचे नाव झळकवले होते. बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये भारताला पदक जिंकून देणारा तो पहिला ठरला होता.
 
तोपर्यंत आपल्या आयुष्यात तो ना कधी इंटरनॅशनल मास्टर ना ही ग्रॅण्डमास्टर बनला होता. वडिलांना त्यांच्या सुतारकामात मदत करणारा खान व्यावसायिक बुद्धिबळपटू नव्हता. पण, त्याच्या पोटापाण्याच्या, सुतारकामाच्या व्यवसायासमवेत त्याची बुद्धिबळाप्रती असलेल्या त्याच्या उत्कट भावनेने, त्याला या खेळाकडे ओढले होते. त्याने ना कधी बुद्धिबळावरची पुस्तक बघितली, ना कधी बुद्धिबळाचे रितसर प्रशिक्षण घेतले होते. भोपाळचे सर्वजण त्याला ‘उस्ताद’ म्हणून संबोधत असत. १९७६ सालामध्ये तो बुद्धिबळ क्षेत्रात चर्चेत आला होता. कारण, त्यांनी तेव्हा राष्ट्रीय विजेतेपद पटकावले होते. १९ जुलै २०१९साली७३ वर्षाचा रफिक हे जग सोडून गेला. विलक्षण प्रतिभावंत रफिक खानने या खेळात जी उंची गाठली होती, तशी उंची गाठणारे फार कमी असतात. भोपाळ महानगर पालिकेने काही काळ त्याला आपल्या सेवेत घेतले होते. १९७७ सालामध्ये भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडमध्ये त्याला नोकरी मिळाली, ज्यामुळे त्यांना आर्थिक स्थैर्य आणि बुद्धिबळ खेळण्याचे स्वातंत्र्य मिळाले. १९८४, १९८६ आणि १९९२ सालामध्ये प्रतिष्ठित ‘पिलू मोदी स्पर्धा’ रफिक खानने जिंकली होती. तसेच, १९८२ मध्ये लुसान ऑलिम्पियाड आणि १९८३ साली नवी दिल्ली आशियाई टीम चॅम्पियनशिपमध्ये तो भारतीय संघाचा सदस्य असला तरी, माल्टा ऑलिम्पियाडमधील कामगिरीची पुनरावृत्ती त्याला करता आली नाही. ८० च्या दशकात, तो बुद्धिबळपटू म्हणून अकाली निवृत्त झाला, आणि कालांतराने तो विस्मृतीत गेला. आणि आजही फार कमी लोकांना तो ज्ञात असेल.
 
विशीतला चमू: हंगेरीतला हा विजय भारतीय संघातील युवा लक्षात घेता, एका क्रीडापत्रातील अहवालावरून आपल्याला असे आढळून येईल की, तेथील दहा भारतीय चमूंपैकी सहा खेळाडू २३ वर्षांखालील आहेत, चार सुवर्णपदक विजेत्यांची सरासरी २० वर्षांखालील आहे.
 
आता २५ नोव्हेंबर ते १३ डिसेंबर या कालावधीत बुद्धिबळ जगज्जेतेपदाची लढत खेळवली जाणार आहे. त्यामध्ये विश्वविजेत्या चीनच्या डीन लिरेन याला भारताचा १८ वर्षांचा दोम्माराजू उर्फ डी. गुकेश आव्हान देत आहे. सिंगापूर येथे होणार्‍या त्या लढतीकडे सार्‍या बुद्धिबळविश्वाचे लक्ष लागून राहिले आहे.
 
तर असा हा युवा भारत, क्रीडाक्षेत्रात अग्रेसर होताना दिसत असेल, तर आपण सगळ्या क्रीडाप्रेमींनी आपल्या बुद्धीचे बळ सुपर पॉवर होण्याच्या या कार्याला दिलेच पाहिजे. हेच आपले खर देशप्रेम असेल. चला तर मग आपण डी. गुकेशला आतापासूनच आपल्या शुभेच्छा देत, त्याला आणि बाकी बुद्धिबळपटूंना त्यांच्या आगामी लीग स्पर्धांसाठी आपले आशीर्वाद देत म्हणूया, भारतमाता की जय.
 
(लेखक माजी खेलकूद आयाम प्रमुख, पश्चिम महाराष्ट्र प्रांत, जनजाती कल्याण आश्रम आणि माजी हॉकीपटू आहेत.)

लेखक - श्रीपाद पेंडसे