भाजप आमदार टी राजा सिंहच्या घरावर ४ कट्टरपंथींची पाळत

29 Sep 2024 20:18:52

T Raja Singh
 
हैदराबाद : भाजपचे आमदार टी राजा सिंह (T Raja Singh) यांच्या घराची ४ संशयितांनी रेकी केल्याची घटना आहे. खाजा आणि इस्माईल अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. या संशयितांनी टी राजा सिंह यांच्या घराचे फोटो आणि व्हिडिओ सोशल माध्यमाद्वारे पाठवले होते. ही घटना २७-२८ सप्टेंबरच्या मध्यरात्रीची आहे. आता याप्रकरणी चार पैकी दोघेजण ताब्यात आले आहेत.
 
टी राजा सिंह यांनी प्रसारमाध्यमावर शेअर केलेल्या माहितीनुसार, २७ सप्टेंबर रोजी पहाटे १.३० ते २ च्या दरम्यान चार संशयित त्यांच्या घराभोवती फिरताना दिसले. काही स्थानिक तरूणांना संशय आल्याने त्यांनी या चौघांना पकडण्याचा प्रयत्न केला. यावेळी दोघेजण तिथून पळत असताना पकडले गेले. तर इतर दोघेजण घटनास्थळावरून तुरी देऊन पळून गेले. यावेळी पकडलेल्या दोन अज्ञातांचे फोन तपासले असता, टी राजा सिंह यांच्या घराचे फोटो आणि व्हिडिओ आढळून आले.
 
 
 
हे व्हिडिओ आणि फोटो मुंबईतील अज्ञाताला पाठवल्याचा दावा टी राजासिंह यांनी केला. दरम्यान याप्रकरणात असलेले आरोपी मोहम्मद खाजा हा मूळचा कर्नाटकातील बिदरा जिल्ह्यातील रहिवासी आहे. तसेच इस्माईल शेख असे अटक करण्यात आलेल्या दुसऱ्या संशयिताचे नाव आहे. तो हैदराबाद येथील अल्लापूर बोराबांडा येथे राहत असून तो चालक म्हणून काम करत होता. याप्रकरणी मंगळहाट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. पोलिसांनी घटनेस्थळी पोहोचून दोन्ही संशयितांच्या मुसक्या आवळल्या आहेत.
 
याप्रकरणी टी राजा सिंह म्हणाले की, २९ सप्टेंबर रोजी त्यांनी अटक केलेल्या संशयितांबाबत पोलिसांशी चर्चा केली. त्यावेळी पोलीस अधिकाऱ्यांनी याप्रकरणात लक्ष घातले असून पुढील तपास सुरू आहे. याप्रकरणाला २४ तासांहून अधिक वेळ गेला असून पोलिसांनी याप्रकरणी कोणतीही माहिती दिलेली नाही.
 
 
Powered By Sangraha 9.0