वंगभूमीतील महिषासुर

29 Sep 2024 23:54:30

Durga Pooja Bangladesh
 
दुर्गापूजेला सुरुवात होण्यापूर्वीच बांगलादेशमध्ये काही कट्टरपंथीय गटांमुळे दुर्गापूजेला ग्रहण लागायला सुरुवात झाली आहे. एका वृत्तवाहिनीने दिलेल्या बातमीनुसार, बांगलादेशातील काही कट्टरपंथी इस्लामिक गटांनी तेथील हिंदू अल्पसंख्याकांना दुर्गापूजा उघडपणे साजरी करू नका, मूर्तिपूजा किंवा विसर्जनात सहभागी होऊ नका, अशी धमकी दिली आहे.
 
दुर्गापूजेला सुरुवात होण्यापूर्वीच बांगलादेशमध्ये काही कट्टरपंथीय गटांमुळे दुर्गापूजेला ग्रहण लागायला सुरुवात झाली आहे. एका वृत्तवाहिनीने दिलेल्या बातमीनुसार, बांगलादेशातील काही कट्टरपंथी इस्लामिक गटांनी तेथील हिंदू अल्पसंख्याकांना दुर्गापूजा उघडपणे साजरी करू नका, मूर्तिपूजा किंवा विसर्जनात सहभागी होऊ नका, अशी धमकी दिली आहे.
 
‘दुर्गापूजेत सहभागी होऊन रस्त्यांवर गर्दी करू नका’, ‘मूर्ती विसर्जन करून जलप्रदूषण करू नका’ आणि ‘पूजा नाही मूर्ती नाही’ अशी वाक्ये लिहिलेले फलक हातात घेऊन , या गटांनी दुर्गापूजेला विरोध दर्शविला आहे. विरोध करणार्‍या या कट्टरपंथीय गटांकडून, दुर्गापूजेत अडथळे निर्माण करण्यासाठी १६ मागण्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीमध्ये त्यांनी पर्यावरणाचे नुकसान होऊ नये, आणि सरकारी निधीचा वापर धार्मिक कार्यासाठी केला जाऊ नये, आणि देशात घडणार्‍या इतर कार्यांमध्ये व्यत्यय येऊ नये म्हणून दुर्गापूजा साजरी केली जाऊ नये, अशी मागणी केली आहे. या कट्टरपंथीय गटांकडून आणखी एक मुद्दा उपस्थित केला आहे तो असा की, देशाच्या एकूण लोकसंख्येत हिंदूंची संख्या कमी असताना, दुर्गापूजेच्या दिवशी राष्ट्रीय सुटी का दिली जाते? दुर्गापूजेमुळे बांगलादेशातील मुस्लीम बहुसंख्याकांना त्रास होतो. त्यामुळे मुस्लिमांनी या सणाला पाठिंबा देऊ नये, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे. कहर म्हणजे बांगलादेशच्या जमिनीवर बांधली गेलेली मंदिरे हटवली जावीत, बांगलादेशातील हिंदूंनी त्यांची देशभक्ती सिद्ध करण्यासाठी भारताविरोधात घोषणा द्याव्यात, आणि तसे फलकही घेऊन उभे राहावे, अशा विकृत मागण्यांचाही समावेश त्यांच्या या यादीत आहे, असेही या वृत्तसंस्थेने दिलेल्या बातमीतून समोर आले आहे.
 
बंगाली समाजात ‘दुर्गापूजा’ हा खूप महत्त्वाचा सण मानला जातो. फाळणीपूर्वी आताचा बांगलादेश हा भारतातील बंगाल राज्याचा भाग होता. विभाजनामुळे त्या भागात राहणारी हिंदू कुटुंबे आधी पाकिस्तानात गेली, आणि मग पाकिस्तानची फाळणी झाल्यावर बांगलादेशात गेली. पण त्यांनी आपली संस्कृती मात्र सोडली नाही. त्यामुळेच दरवर्षी भारतात जशी नवरात्र आणि दुर्गापूजा साजरी होते, त्याचप्रमाणे ती बांगलादेशातसुद्धा साजरी होत आली आहे.
 
बांगलादेशातील एकूण लोकसंख्येच्या तुलनेत हिंदूंची संख्या कमी आहे. पण, तरीही बांगलादेशात अनेक ठिकाणी दुर्गापूजा होते. दुर्गापूजेला सुरुवात होण्यापूर्वी, देवी मूर्ती तयार करणे, मंडप उभारणे अशी तयारी भारताप्रमाणे बांगलादेशातही होते. पश्चिम बंगाल राज्याप्रमाणेच, बांगलादेशातील लोकही पाच दिवस दुर्गापूजा साजरी करतात. नवरात्रीच्या सहाव्या दिवशी, दुर्गादेवीचे मंडपात वाजत-गाजत आगमन होते. हा दिवस ‘महाषष्टी’ म्हणून ओळखला जातो. सातव्या, आठव्या आणि नवव्या दिवशी मंडपात विविध विधी पार पडतात. देवीला विविध पदार्थांचा भोग चढवला जातो. या दिवसांना अनुक्रमे ‘महासप्तमी’, ‘महाअष्टमी’ आणि ‘महानवमी’ म्हणून ओळखले जाते. शेवटच्या म्हणजेच ‘बिजोयादशमी’च्या दिवशी देवीला साश्रू निरोप दिला जातो. असा हा पाच दिवसांचा दुर्गापूजा उत्सव, बांगलादेशातील हिंदू अनेक वर्षांपासून साजरा करत आहे. बांगलादेशात काही हिंदू देवींची मंदिरेही आहेत. त्या मंदिरांमध्येही दुर्गापूजेच्या दिवसांत हिंदू बांधव एकत्र जमतात, आणि हा उत्सव साजरा करतात. बांगलादेशाची राजधानी असलेल्या ढाका शहरात, प्रसिद्ध आणि भव्य ढाकादेवीचे मंदिर आहे. या मंदिरातही दरवर्षी दुर्गापूजेसाठी मोठ्या संख्येने हिंदू भाविक जमतात. या सणाच्या दिवसांत अनेक सांस्कृतिक कार्यक्रम, पारंपरिक कलांचेसुद्धा सादर होतात. बंगाली संस्कृतीतील धुपाचे भांडे हातात किंवा तोंडात घेऊन केले जाणारे ‘धुनुची नृत्य’सुद्धा या दिवसांत सादर केले जाते.
 
बांगलादेशात राहूनसुद्धा तेथील हिंदू लोकांनी त्यांची दुर्गापूजेची परंपरा प्राणप्रणाने जपली आहे. पण गेल्या काही महिन्यांत बांगलादेशात झालेल्या राजकीय उलथापालथीमुळे धार्मिक तेढ वाढीस लागली आहे, आणि त्यामुळे त्या देशात राहणार्‍या अल्पसंख्याक हिंदू समजाला खूप अत्याचार सहन करावा लागत आहे. याच अत्याचाराचा भाग म्हणजे, दुर्गापूजेवर आलेले हे विघ्नाचे सावट. दुर्गापूजेपूर्वी दिल्या जाणार्‍या या धमक्यांमुळे, तेथील हिंदू समाजात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे आता दुर्गामाताच पुन्हा एकदा महिषासुरमर्दिनीचे रूप धारण करून या महिषासुर वृत्तीचा विनाश करो, हीच जगदंबे चरणी प्रार्थना.

लेखिका - दिपाली कानसे
Powered By Sangraha 9.0