‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ चित्रपट ऑस्करच्या शर्यतीत स्वतंत्ररित्या पुढे जाणार

28 Sep 2024 11:24:56

sudhir phadke 
 
रसिका शिंदे-पॉल
 
मुंबई : योगेश देशपांडे दिग्दर्शित ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ चित्रपटाने महाराष्ट्रातच नाही तर जगभरात आपली छाप उमटवली आहे. आनंदाची बाब म्हणजे ऑस्कर २०२५ च्या फॉरेन लॅगवेज फिचर फिल्म या कॅटेगरीत स्वतंत्रपणे हा चित्रपट पाठवण्यात आल्याची माहिती 'दै. मुंबई तरुण भारत'शी बोलताना दिग्दर्शक योगेश देशपांडे यांनी दिली. संगीत क्षेत्रातील अजरामराची ऑस्कर वारी खरंच प्रत्येक बाबूजींच्या चाहत्यांसाठी सुखावणारी आहे.
 
ऑस्करवारी निश्चित झाल्यानंतर आपल्या भावना 'दै. मुंबई तरुण भारत'शी व्यक्त करताना दिग्दर्शक योगेश देशपांडे म्हणाले की, “इंडियन फिल्म फेडरेशनच्या २९ चित्रपटांच्या यादीत ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ हा चित्रपट सामील होता. परंतु, एका देशाकडून केवळ एकच चित्रपट इंडियन फिल्म फेडरेशन ऑस्करला पाठवू शकत असल्यामुळे लापता लेडिज या चित्रपटाला ती संधी मिळाली. मात्र, बाबूजींचा मान सन्मान जागतिक पातळीवर व्हावा यासाठी चित्रपटाच्या टीमने इंडियन फॉरेन लॅंगवेज फिचर फिल्म या कॅटेगरीत स्वतंत्रपणे ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ हा चित्रपट ऑस्करला पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. ऑस्करला कोणत्याही चित्रपटांचे स्वतंत्र स्क्रिनिंग आणि पुढची प्रक्रिया पार पाडण्यासाठी आर्थिक बळ फार असावं लागतं. मराठी चित्रपटांचा मुळातच आर्थिक अडचण असते. पण सुधीर फडकेंच्या जीवनावर आधारित या चित्रपटाला योग्य न्याय मिळवून देण्यासाठी ऑस्करवारी आम्ही पुरण करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, आनंदाची बाब म्हणजे ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ या चित्रपटाला ऑगस्टमध्ये झालेल्या स्विडन फिल्म फेस्टिवलमध्ये सर्वोत्कृष्ट भारतीय चित्रपट आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा पुरस्कार मिळाला आहे”.
 
तर, चित्रपटात बाबूजींची भूमिका साकारलेले अभिनेते सुनील बर्वे 'दै. मुंबई तरुण भारत'शी बोलताना म्हणाले की, “भारतात चांगले चित्रपट तयार होत असतातच. पण बाबूजींच्या आजवरच्या संगीत कारर्किर्दीला मानवंदना देणारा ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ या चित्रपटाची ऑस्करसाठी स्वतंत्रपणे पुढे जाण्याचा निर्णय मला अत्यानंदित करणारा आहे. बाबूजींना आपण प्रादेशिक पातळीवरच महत्व आजवर दिले आहे. कारण, मराठी माणसं आपली कलाकृती किंवा आपल्या माणसांबद्दल ओरडून बोलत नाही पण आता हे चित्र बदललं पाहिजे. आणि आपल्या महाराष्ट्राचा मान असणाऱ्या बाबूजींचा आपल्याला अभिमान वाटलाच पाहिजे आणि त्यांची प्रतिमा ही ऑस्करच्या निमित्ताने जागतिक पातळीवर पोहोचलीच पाहिजे”.
 
सौरभ गाडगीळ प्रस्तुत रिडिफाईन प्रॉडक्शन्स निर्मित या चित्रपटाचे सौरभ गाडगीळ आणि योगेश देशपांडे निर्माते आहेत. तर चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन योगेश देशपांडे यांचे आहे. 'स्वरगंधर्व सुधीर फडके' या चित्रपटात सुनील बर्वे, मृण्मयी देशपांडे, सागर तळाशीकर, मिलिंद फाटक, आदिश वैद्य, सुखदा खांडकेकर, अपूर्वा मोडक, अविनाश नारकर, शरद पोंक्षे, उदय सबनीस, चिन्मय पटवर्धन, निखिल राऊत, विभावरी देशपांडे, धीरेश जोशी, परितोष प्रधान यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
 
 
Powered By Sangraha 9.0