जम्मू-काश्मीरमध्ये भाजप पूर्ण बहुमताचे सरकार स्थापन करणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विश्वास
28-Sep-2024
Total Views |
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरमधील दोन टप्प्यांच्या मतदानाने जनमत स्पष्ट झाले असून आता प्रदेशात भाजपचे पूर्ण बहुमताचे सरकार स्थापन होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी जम्मू येथे प्रचारसभेत व्यक्त केला.
जम्मू-काश्मीरमधील जनता काँग्रेस, नॅशनल कॉन्फरन्स आणि पीडीपी या तीन घराण्यांमुळे हैराण झाली आहे. ज्या व्यवस्थेत भ्रष्टाचार आणि नोकऱ्यांमध्ये भेदभाव होता, ती व्यवस्था लोकांना नको आहे. जम्मू-काश्मीरच्या जनतेला आता दहशतवाद, फुटीरतावाद आणि रक्तपात नको आहे. येथील लोकांना शांतता हवी आहे. गेल्या दोन टप्प्यात झालेल्या प्रचंड मतदानाने जम्मू-काश्मीरमधील जनतेचा मूड स्पष्ट झाला आहे. दोन्ही टप्प्यात भाजपच्या बाजूने प्रचंड मतदान झाले आहे. आता भाजप पूर्ण बहुमताने येथे पहिले सरकार स्थापन करणार हे निश्चित आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
सर्जिकल स्ट्राईकचा संदर्भ देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले, आजची काँग्रेस पूर्णपणे शहरी नक्षलवाद्यांच्या ताब्यात आहे. काँग्रेस हा असा पक्ष आहे ज्याने आमच्या लष्कराकडून सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे मागितले होते. काँग्रेस पक्ष आहे जो आजही सर्जिकल स्ट्राईकबाबत पाकिस्तानची भाषा बोलत असल्याचे दिसते. काँग्रेस-नॅशनल कॉन्फरन्स आणि पीडीपी हे राज्यघटनेचे शत्रू आहेत. त्यांनी संविधानाची हत्या केला आहे, असाही घणाघात पंतप्रधानांनी आपल्या भाषणात केला.