मुंबई, दि. २७ : (MHADA)‘म्हाडा’ मुंबई मंडळाच्या २०३० घरांच्या विक्रीसाठी संगणकीय सोडत प्रक्रियेला अर्जदारांचा उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला असून १ लाख, ३४ हजार, ३५० अर्ज संगणकीय सोडत प्रणालीमध्ये प्राप्त झाले आहेत. यापैकी १ लाख, १३ हजार, ८११ अर्जदारांनी अद्यापपर्यंत अनामत रकमेचा भरणा करून सोडत प्रक्रियेतील सहभाग निश्चित केला आहे. दरम्यान, शुक्रवार, दि. २७ रोजी म्हाडाची प्राप्त अर्जांची प्रारूप यादी ‘म्हाडा’च्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली. रविवार, दि. २९ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत प्रारूपयादी प्रसिद्ध झाल्यापासून ऑनलाईन दावे-हरकती अर्जदारांना दाखल करता येणार आहेत.
मुंबई मंडळातर्फे अर्जभरणा करण्याची मुदत दि. १९ सप्टेंबर रोजी रात्री ११.५९ वाजता संपुष्टात आली व अर्जदारांना अनामत रकमेचा ऑनलाईन भरणा करण्यासाठी देखील रात्री ११.५९ वाजेपर्यंत मुदत देण्यात आली होती.
शुक्रवार, दि. २७ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता सोडतीसाठी प्राप्त अर्जांची प्रारूपयादी ‘म्हाडा’च्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली. त्यानंतर रविवार, दि. २९ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत प्रारूपयादी प्रसिद्ध झाल्यापासून ऑनलाईन दावे-हरकती अर्जदारांना दाखल करता येणार आहेत. दि. ३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता सोडतीसाठी स्वीकृत अर्जांची अंतिम यादी ‘म्हाडा’च्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे.
मुंबईतील ‘म्हाडा’च्या सोडतील अर्जदारांच्या प्रतिसादाचा ओघ पाहता मुंबईतील परवडणार्या दरातील घरांची गरज अधोरेखित होते. सदनिकांच्या वितरणाकरिता प्राप्त अर्जांची संगणकीय सोडत दि. ८ ऑक्टोबर रोजी दक्षिण मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे काढण्यात येणार आहे.