'माझी वसुंधरा अभियाना'त ठाणे महापालिकेला तिसरा क्रमांक

28 Sep 2024 17:14:31

tmc
 
ठाणे, दि.२८ : (Majhi Vasundhara Abhiyan 4.0) राज्य सरकारतर्फे स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी घेण्यात येणाऱ्या 'माझी वसुंधरा अभियान'मध्ये ठाणे महापालिकेस राज्यस्तरीय अमृत गटात तिसरा क्रमांक मिळाला आहे. या क्रमांकासाठी असलेले सहा कोटी रुपयांचे पारितोषिक ठाणे महापालिकेला जाहीर झाले आहे.या स्पर्धेचा अंतिम निकाल नुकताच जाहीर झाला. त्यात, १० लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या गटात, पहिला क्रमांक पिंपरी चिंचवड तर दुसरा क्रमांक नवी मुंबई महापालिकेला मिळाला.
 
राज्य सरकारच्या पर्यावरण वातावरणीय बदल विभागातर्फे पृथ्वी, वायू, जल, अग्नी आणि आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्वावर आधारित 'माझी वसुंधरा अभियान' हे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राबविण्यात येते.
 
'माझी वसुंधरा अभियान ४.०' हे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये दिनांक १ एप्रिल २०२३ ते दिनांक ३१ मार्च २०२४ या कालावधीत राबविण्यात आले. त्यात राज्यातील ४९४ नागरी स्थानिक संस्था २२,२१८ ग्राम पंचायती अशा एकूण २२,६३२ स्थानिक स्वराज संस्थांनी सहभाग घेतला होता.
 
ठाणे महापालिका क्षेत्रात राबवलेले पर्यावरणस्नेही उपक्रम, मुख्यमंत्री हरित अभियान यांच्यामुळे ही कामगिरी करणे शक्य झाले. यात, ठाणेकर नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा आहे. त्यामुळे हे यश त्यांचेच आहे, असे प्रतिपादन ठामपा आयुक्त सौरभ राव यांनी केले. तसेच या पारितोषिकाचा विनियोग पर्यावरण पूरक कामे करण्यासाठी करणार असल्याचे राव यांनी स्पष्ट केले.
 
 
 
Powered By Sangraha 9.0