नवी दिल्ली, दि. २८ : (Himachal Pradesh) शिमला तसेच हिमाचल प्रदेशातील एकूण १२ जिल्ह्यांमध्ये मशिदींच्या बेकायदेशीर बांधकामाबाबत हिंदू संघटनांनी निदर्शने केली. या निदर्शनात अनेक ठिकाणी सर्वसामान्य नागरिकही सहभागी झाले होते.
शिमल्यातील मशिदीच्या आत बेकायदेशीर बांधकामाचा मुद्दा पुन्हा एकदा जोर धरताना दिसत आहे. मशिदीतील बेकायदा बांधकामाचा मुद्दा शिमल्यापासून सुरू होऊन आता संपूर्ण हिमाचल प्रदेशात पसरत असल्याचे दिसत असून या मुद्द्यावरून शनिवारी पुन्हा एकदा हिंदू संघटनांनी रस्त्यावर उतरून निदर्शने केली. मशिदींच्या बेकायदेशीर बांधकामाविरोधात शिमल्यासह राज्यातील १२ जिल्ह्यांमध्ये आंदोलने झाली आहेत. या संपूर्ण प्रकरणाकडे राज्य सरकारचा दृष्टिकोन योग्य नसल्याचा आरोप हिमाचल देवभूमी संघर्ष समितीने केला आहे.
बेकायदेशीर मशीद प्रकरणी शिमला महापालिका आयुक्त न्यायालयात ५ ऑक्टोबर रोजी सुनावणी होणार आहे. देवभूमी संघर्ष समितीचे अध्यक्ष मदन ठाकूर यांनी निदर्शनाच्या माध्यमातून न्यायालयाकडे मशिदीबाबत लवकरात लवकर निर्णय देण्याची मागणी करण्यात येणार असल्याचे सांगितले. याप्रकरणी ५ ऑक्टोबर रोजी निर्णय न घेतल्यास याप्रकरणी लोक रस्त्यावर उतरतील, असा इशारा संघर्ष समितीने यापूर्वीच दिला आहे. यापूर्वी ११ सप्टेंबर रोजी संजौली मशीद प्रकरणी हिंदू संघटनांनी शिमल्यात आक्रमक आंदोलन केले होते. यावेळी आंदोलकांवर लाठीचार्ज आणि पाण्याचा मारा तोफांचा वापर करण्यात आला. यानंतर राज्यातील बहुतांश शहरांमध्ये निदर्शने करण्यात आली. व्यापारी समुदायानेही २ ते ३ तास बाजार बंद ठेवून व्यापाऱ्यांनी संताप व्यक्त केला.