नवी दिल्ली: हिजबुल्ला या दहशतवादी संघटनेचा प्रमुख हसन नसराल्लाह ठार झाल्याची माहिती इस्रायली सैन्याने आपल्या X हँडल वरुन जगाला दिली. लेबनॉनची राजधानी असलेल्या बेरूत मध्ये झालेल्या हवाई हल्ल्यात नसराल्लाहला लक्ष्य करण्यात आले होते.
इस्रायलने केलेल्या दाव्यानुसार २७ सप्टेंबर रोजी करण्यात आलेल्या हल्ल्याचे लक्ष्य होते हिजबुल्लाच्या नेतृत्वाची बैठक, जी बेरूतच्या दहियेह या भागात आयोजीत करण्यात आली होती. नसराल्लाहने गेली ३० वर्ष हिजबुल्लाचे नेतृत्व केले होते. इस्रायली लष्करातील एका प्रवक्त्याने माहिती देताना म्हटले की अनेक वर्ष नसराल्लाहने इस्रायल विरोधी कारवायांचा धडाका लावला होता. याचा सोबत, इस्रायली समुदायांमध्ये घुसखोरी करुन इस्रायली नागरिकांची हत्या आणि अपहरण करण्याची योजना हिजबुल्लाने आखली होती. शनिवारी इस्रायलने बेरूतच्या दक्षिणेकडील उपनगरे आणि लेबनॉनच्या इतर भागांवर हवाई हल्ले सुरू केले. दहियाह म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दक्षिणी उपनगरांवर झालेल्या मोठ्या हल्ल्यानंतर हे हल्ले करण्यात आले. हिजबुल्लाने देखील प्रतिकार करत १२ रॉकेट इस्रायलच्या दिशेने सोडले.
हल्ल्यांनंतर, पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी इस्रायलला परतण्यासाठी अमेरिकेचा दौरा रद्द केला. हल्ल्याच्या काही तास आधी, नेतन्याहू यांनी संयुक्त राष्ट्रांना संबोधित केले आणि सांगितले की हिजबुल्लाह विरुद्ध इस्रायलची मोहीम सुरुच राहील, यामुळे युद्धविरामाची आशा धुसर झाल्याचे दिसून येते.
खामेनी सुरक्षित स्थळी दाखल.
हिजबुल्लाच्या नेत्याची हत्या झाल्यानंतर इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले असल्याची माहिती मिळाली आहे. इराण सातत्याने हिजबुल्लाच्या संपर्कात असल्यामुळे खबरदारी म्हणून हे पाऊल उचलण्यात आल्याचे सांगितले जात आहे. नेतन्याहू यांच्या भाषणानंतर पुढच्या कारवाईची दिशा कोणती हे ठरवण्यासाठी हिजबुल्लाच्या नेतृत्वासोबत, खामेनी संपर्कात होते.